Pune L3 Pub Case Sakal
पुणे

Pune L3 Pub Case : ‘एल ३’ बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन; तिघांचे रक्तनमुने, इतरांची होणार चौकशी

‘एल ३’मध्ये मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा मिळून आला आहे. या व्यतिरिक्त आरोपीकडे इतर ठिकाणीसुद्धा अवैध मद्याचा साठा असण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय) असलेल्या ‘लिक्विड लीजर लाउंज’ (एल ३) पब, बारमध्ये पार्टीसाठी आलेल्यांना अमली पदार्थासारखा पदार्थ दिला. त्याअनुषंगाने अटक आरोपींपैकी तिघांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत.

त्याचा अहवाल आल्यानंतर इतरांचीही चौकशी होणार आहे. त्यानुसार गुन्ह्यात कलमवाढ करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. २४) न्यायालयात दिली. गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.

बारच्या जागेचा मालक संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रंजनीगंध अपार्टमेंट शिवाजीनगर), बार चालविण्यासाठी घेतलेला उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. फ्लॅट नं. ३०२, साईप्रसार अपार्टमेंट लेन नं. १० मुंजाबा वस्ती धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. दवन सोसायटी, श्रीराम स्वीट मार्ट, भूगाव),

रवी माहेश्‍वरी (रा. एच १००६, ३८२ पार्क, मॅजिस्ट्रीक, उंड्री), पार्टीचे आयोजन केलेला अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डीजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ); तर पार्टीच्या आयोजनात सहभागी झालेला रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस पस्कूल मल्लिक (वय ३३, रा. फ्लॅट नं. ४२ जयजवान नगर, राम मंदिराजवळ, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

‘एल ३’मध्ये मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा मिळून आला आहे. या व्यतिरिक्त आरोपीकडे इतर ठिकाणीसुद्धा अवैध मद्याचा साठा असण्याची शक्यता आहे. कारवाई केल्यानंतर तिघांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. या ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही अमली पदार्थ दिल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कराराचे पालन होत आहे की नाही, हे पाहणे बारच्या जागामालकाची जबाबदारी होती. त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

मागच्या दाराने प्रवेश

कारवाईच्या दिवशी झालेल्या पार्टीचे आयोजन अक्षय कामठे याने केले होते. सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांना अमली पदार्थांचे सेवन आणि धूम्रपान करण्यासाठी बारमध्ये बोलाविल्याचे प्रथमदर्शनी तपासामध्ये दिसून आले आहे. कामठे याने आयोजित केलेल्या पार्टीची एन्ट्री फी ऑनलाइन; तसेच रोख स्वरूपात स्वीकारली आहे.

बार बंद करण्याची वेळ झाल्याने पार्टीला आलेल्यांना मागच्या दाराने प्रवेश दिला होता. गायकवाड तिथे थांबलेला होता, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयास दिली.

शनिवारपर्यंत कोठडी

पार्टीला आलेल्या ग्राहकांबाबतची माहिती आरोपींकडून घ्यायची आहे; तसेच पार्टीत अमली पदार्थ कोणी व कुठून आणले, याबाबत अधिक माहिती व पुरावे हस्तगत करायचे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील मुलांचा आरोपींच्या मदतीने शोध घ्यायचा आहे.

पार्टीला आलेल्यांमध्ये कोणाचा अमली पदार्थ पुरवठ्यामध्ये सक्रिय सहभाग आहे, याचा तपास करायचा आहे. पार्टीच्या आयोजनात कोणाचा वरदहस्त आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे. गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य मोठ्या स्वरूपाचे असून, अटक आरोपींकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे.

त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. आरोपींच्यावतीने जी. एन. अहिवळे, राजेश कातोरे, विक्रम नेवसे, मनीष पडेकर आणि तौसिफ शेख यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी आरोपींना शनिवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावली.

परवाना तळमजल्याचा

‘एल ३’च्या शौचालयात काही तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बारचा मालक, बार चालविणारे आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे. बारचा परवाना तळमजल्यासाठी असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मद्याची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपींचा असहकार

अटक आरोपींपैकी दोघांवर यापूर्वी गुन्हा दाखल आहे. संतोष कामठे याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांनुसार; तर रवी महेश्‍वरी याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

त्यामुळे त्यांना पोलिसांच्या तपासाची माहिती आहे. असे असतानाही त्यांनी तपासात असहकार्य केले. आरोपींना तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले; मात्र त्यांनी माहिती दिली नाही, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावंत यांनी न्यायालयास सांगितले.

सहा कर्मचाऱ्यांनाही पोलिस कोठडी

पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी (ता. २३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘एल ३’ बारमध्ये छापा टाकून सव्वातीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला. तसेच तेथील सहा कर्मचाऱ्यांना अटक करून सोमवारी (ता. २४) न्यायालयात हजर केले.

त्यांनाही न्यायालयाने २९ जूनपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मोहित राजेश शर्मा (वय २९, मूळ रा. सेमरा रोवा, मध्य प्रदेश), अमीर असफ अली हुसैन (वय २७, मूळ रा. नागाव, आसाम), सौरभ शेखर बिस्वास (वय २५, मूळ रा. २४ परगणा, पश्चिम बंगाल), खैरूल इस्लाम समसुलहक (वय २२, मूळ रा. होजाई, आसाम),

कोहिमुद्दीन इलाम शेख (वय ३०, मूळ रा. नाडिया, पश्चिम बंगाल) आणि नुरूल इस्लाम ताहिरुद्दीन (वय २२, मूळ रा. नागाव, आसाम, सर्व सध्या रा. शिवाजीनगर) अशी कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. ‘एल ३’मध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टीतील ग्राहकांना आरोपींनी बेकायदा मद्य दिले होते. त्यांची चौकशी करून अन्य आरोपींनाही अटक करायची आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT