पुणे : शहरातील लोहगाव विमानतळावरील कार्गोसाठी २. ५ एकरचा भूखंड अवघ्या वार्षिक १ एक रुपया भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे रखडलेला कार्गोचा प्रश्न आता सुटण्याच्या दिशेने पावले पडली आहेत.
पुणे विमानतळावर कार्गोची सुविधा निर्माण करण्याची उद्योग क्षेत्रातून सातत्याने मागणी होत आहे. परंतु, त्यासाठीचा विमानतळावरील २. ५ एकरचा भूखंड हवाई दलाच्या ताब्यात आहे. हा भूखंड भाडेतत्त्वावर देण्यासाठी त्यांना वार्षिक १ कोटी ३८ लाख ३० हजार ७८७ रुपयांची मागणी केली होती. एवढे भाडे देणे शक्य नसल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले होते. खासदार गिरीश बापट यांनी याबाबत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांना ८ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून भाडे कमी करण्याची विनंती केली होती.
विमानतळ विकास हा विषय सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित असल्यामुळे नाममात्र भाडे आकारणी करावी, असेही त्यांनी म्हटले होते. सिंधीया आणि बापट यांनी या बाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यानुसार विमानतळाच्या आवारातील बीएसओ यार्डमधील २. ५ एकर जागा वार्षिक १ रुपया भाडेतत्त्वावर देण्यात येत असल्याचे सिंधीया यांनी बापट यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
विमानतळ सल्लागार समितीची बैठक शहरात गेल्यावर्षी २४ नोव्हेंबर रोजी झाली होती. त्या बैठकीतही हवाई दलाने आकारलेल्या भाडे अवाजवी असून ते कमी करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला होता. आता ही जागा विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात आल्यावर कार्गो संकुलाच्या कामाला प्रारंभ होईल.
कार्गो विमानतळ शहरासाठी आवश्यक आहेच. त्यासाठी पाठपुरावा केला. येत्या काही दिवसांत आता प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होई शकतो. कार्गो विमानतळ आता शहरासाठी प्राधान्याचा विषय झाला आहे.
- खासदार गिरीश बापट
संरक्षण मंत्रालयाने हा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला कार्गो विमानतळ आता मार्गी लागू शकतो. आता प्रत्यक्ष कामाला लवकर प्रारंभ व्हावा, हीच अपेक्षा आहे.
- सुधीर मेहता (अध्यक्ष, एमसीसीआयए)
पुरंदर विमानतळाच्या बैठकीची प्रतीक्षा
पुरंदर विमानतळाच्या दोन जागांमधून एक जागा निश्चित करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यासमवेत विविध घटकांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. त्यातून पुरंदर विमानतळाची जागा निश्चित होईल. ही बैठक अल्पावधीत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष आता पुरंदर विमानतळासाठीची बैठक केव्हा होणार, याकडे लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.