हिवाळयात दाट धुक्यामुळे लोहगाव विमानतळावर उतरणारी अनेक विमाने रद्द झाली तर काही विमाने मुंबई व हैदराबादला उतरली.
- प्रसाद कानडे
पुणे - हिवाळयात दाट धुक्यामुळे लोहगाव विमानतळावर उतरणारी अनेक विमाने रद्द झाली तर काही विमाने मुंबई व हैदराबादला उतरली. पावसाळ्यात जर मोठा पाऊस झाला तर याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, कमी दृश्यमानतेत वैमानिकांना सुरक्षितपणे विमाने धावपट्टीवर उतरविण्यास अत्यंत उपयोगी ठरणारी ‘कॅट थ्री बी’ ही यंत्रणाच नाही. त्यामुळे कमी दृश्यमानतेत वैमानिक पुणे विमानतळावर विमान उतरविण्यास तयार नसतो. परिणामी, विमाने रद्द होतात तर काही विमाने अन्य विमानतळांवर उतरतात. याचा थेट फटका प्रवाशांना बसतो.
विमानांचे लँडिंग करण्याच्या दोन पद्धती आहेत. यात आधुनिक यंत्राचा वापर करून लँडिंग करणारी यंत्रणा म्हणजे आयएलएस (इंस्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम). यात देखील खराब हवामानात सुरक्षित लँडिंगसाठी कॅट ३ बी ही यंत्रणा फार मोलाची ठरते. सध्या देशभरातील महत्त्वाच्या विमानतळावर याच प्रणालीचा वापर केला जात आहे. पुणे हे देशांतील १० महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक आहे. तरीही येथे ही प्रणाली बसविलेली नाही. त्यामुळे खराब हवामान तयार झाल्यावर त्याचा थेट फटका प्रवाशांना बसतो. विमाने रद्द होणे, उशिराने उतरणे, दुसऱ्या विमानतळावर उतरणे आदी प्रकारांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते.
‘कॅट ३ बी’ म्हणजे काय?
रेडिओ नेविगेशनल एड्सचे विविध प्रकार असून यातील सर्वात अद्ययावत व उच्च दर्जाचा प्रकार म्हणून ‘आयएलएस’ला ओळखले जाते. हे रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून वैमानिकांना संदेश देतात. पुणे विमानतळावर ‘आयएलएस’ ही यंत्रणा आहे. मात्र, सर्वात प्रगत मानले जाणारे ‘कॅट ३ बी’ ही प्रणाली नाही. ‘कॅट ३ बी’ ही अत्युच्च दर्जाची संदेश वहन प्रणाली आहे. यात मार्कर्स, ऍप्रोच लायटिंग, आरव्हीआर म्हणजेच रनवे व्हिजवल रेंज, ग्ल्याडस्कोप आदींचा समावेश असतो. या सर्वांमुळे खराब हवामानात विमान सुरक्षित लँडिंग करू शकतो.
प्रवाशांना काय फायदा?
५० फुटांपेक्षा कमी दृश्यमानता असली तरीही ‘कॅट ३ बी’च्या मदतीने वैमानिक विमान सुरक्षितपणे उतरू शकतो. हिवाळयात पुणे विमानतळावरील विमाने जेव्हा रद्द झाली, तेव्हा दृश्यमानता ही १०० फूट इतकी होती. वैमानिकांना विमान उतरविताना १०० फुटांच्या पुढचे काही दिसत नव्हते. तेव्हा कॅट ३ बी ही यंत्रणा असती तर विमाने रद्द झाली नसती. याचा दुसरा फायदा म्हणजे विमानांना उशीर होणार नाही आणि दुसऱ्या शहरात उतरावे लागणार नाही.
पुणे विमानतळाची धावपट्टी ही हवाई दलाच्या नियंत्रणाखाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे, आयएलएस ही प्रणाली आहे. मात्र, कॅट ३ बी ही प्रणाली आहे की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
- संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ.
पुणे विमानतळावरील नेव्हिगेशन प्रणाली ही अद्ययावत हवी. जर प्रणाली अद्ययावत असेल तरच आंतरराष्ट्रीय विमाने पुणे विमानतळावर दाखल होतील. शिवाय खराब हवामान असतानाही प्रवासी वाहतुकीचे संचालन सुरक्षित व विनाअडथळा पार पडण्यास मदत होईल. त्यामुळे पुणे विमानतळावर ‘कॅट ३ बी’ ही प्रणाली असणे गरजेचे आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ
‘कॅट’चे प्रकार व त्याची क्षमता
कॅट १ - २०० फुटांपेक्षा जास्त
कॅट २ - १०० फुटांपेक्षा जास्त
कॅट ३ - १०० फुटांपेक्षा कमी
कॅट ३ बी - ५० फुटांपेक्षा कमी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.