pune metro Vanaj Garware College Metro passengers Metro tourism pune  Sakal
पुणे

प्रवाशांत घट : प्रकल्पपूर्तीसाठी लागणार किमान दहा महिने

मेट्रोच्या पुढील टप्प्यांसाठी प्रतीक्षा

- मंगेश कोळपकर

पुणे - वनाज-गरवारे महाविद्यालय मेट्रोमार्गाचे उद्‍घाटन झाले असले तरी, पुढच्या टप्प्यांसाठी पुणेकरांना आणखी पाच महिने वाट पाहवी लागणार आहे. ‘कनेक्टिव्हिटी’ उपयुक्त नसल्यामुळे ‘मेट्रो टुरिझम’चा बहर ओसरला असून प्रवासी संख्याही रोडावली आहे. तुलनेत शनिवार-रविवारी मेट्रोची प्रवासी संख्या काहीशी वाढत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वनाज-गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी - फुगेवाडी मेट्रो मार्गाचे उद्‍घाटन ६ मार्च रोजी झाले. दोन्ही शहरांत मेट्रो पहिल्यांदाच आल्यामुळे सुरवातीला नागरिकांनी गर्दी केली. मेट्रोतील प्रवासाचे सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झळकले.

सुमारे २० हजार प्रती दिनपर्यंत पोचलेली प्रवासी संख्या परीक्षांच्या काळात सुमारे ६ हजारांपर्यंत रोडावली होती. त्यामुळे मेट्रोची वारंवारिता सुमारे ३० ते ४० मिनिटांपर्यंत केली आहे. गरवारे महाविद्यालयानंतर मेट्रो डेक्कन जिमखाना स्थानकापर्यंत जून महिन्यात धावेल, असे फेब्रुवारीमध्ये महामेट्रोने प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले. मात्र, तीन महिन्यांनतर आता मेट्रो डेक्कन जिमखाना नव्हे तर, शिवाजीनगर न्यायालय स्थानकापर्यंत सप्टेंबरपर्यंत धावेल, असे महामेट्रोने स्पष्ट केले.

अशी होणार कामे

  • डेक्कन जिमखाना स्थानक - जुलै

  • संभाजी उद्यान स्थानक - जुलैअखेर

  • महापालिका स्थानक - ऑगस्ट

  • शिवाजीनगर न्यायालय - सप्टेंबरअखेर

  • शिवाजीनगर ते रामवाडी - डिसेंबरअखेर

  • फुगेवाडी - रेंजहिल्स - डिसेंबरअखेर

वनाज - रामवाडी आणि पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गांचे काम - मार्च २०२३ अखेरीस पूर्ण होईल

शनिवार-रविवारी प्रतिसाद

  • प्रतिदिन प्रवासी - १५,७८४

  • पिंपरी-फुगेवाडी मार्ग - ४,४०९

  • वनाज-गरवारे मार्ग - १०,८५९

मार्च महिन्यात एका दिवसात पुण्यात मेट्रोचे सर्वाधिक प्रवासी हे ९ मार्च रोजी २० हजार ३२३ होते. तर एप्रिल महिन्यात ६ हजारांपर्यंत कमी झाले. (दर शनिवार - रविवारी प्रवासी संख्येत सुमारे २० टक्क्यांनी वाढ होत आहे)

दोन स्थानकांची कामे प्राधान्याने

गरवारे महाविद्यालयापासूनची पुढच्या चार स्थानकांची येत्या पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. महापालिका आणि शिवाजीनगर न्यायालय स्थानकाचे काम सुमारे ५० टक्के तर, डेक्कन जिमखाना, संभाजी स्थानकाचे काम ३५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे महापालिका, शिवाजीनगर स्थानकांचे काम वेगाने पूर्ण करून गरवारे ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान मेट्रो प्राधान्याने धावेल. त्या दरम्यान डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यानाचे काम पूर्ण होईल, अशीही शक्यता महामेट्रोने वर्तविली आहे. तर शिवाजीनगर ते रामवाडी दरम्यानचा मार्ग डिसेंबर अखेरीस तयार होणार आहे.

दोन्ही शहरांतील मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही ठिकाणी सुमारे ६,५०० कामगार काम करीत आहेत. मेट्रोचा ३१ किलोमीटरचा प्रकल्प पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. परीक्षांमुळे प्रवासी घटले असले तरी, रोज १० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.

- हेमंत सोनवणे, महासंचालक, महामेट्रो

मेट्रो किमान डेक्कनपर्यंत तरी सुरू झाली, तर तिचा वापर करता येईल. आता अर्धवट मेट्रो सुरू झाली आहे. त्यामुळे तिचा वापर करता येत नाही. वनाज- डेक्कन दरम्यान मेट्रो सुरू झाल्यावर तिचा उपयोग होईल.

- राजश्री गांधी, शिवतीर्थनगर

बीएमसीसी महाविद्यालयात मी शिकतो. रोज दुचाकी घेऊन कॉलेजला जातो. काही दिवस गरवारे महाविद्यालयापर्यंत मेट्रोने गेलो. प्रवास चांगला आणि आरामदायी आहे. परंतु, मेट्रो डेक्कनपर्यंत सुरू झाली तर, कॉलेजला जाण्यासाठी तिचा वापर करता येईल.

- अभिजित दाते, वनाज

पिंपरीतही हीच स्थिती

पिंपरी : महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत सुरू केलेल्या मेट्रोची नव्याची नवलाई संपली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांवर गेल्या २४ दिवसांत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. आता खर्चाचा हा डोलारा केंद्र व राज्य दोन्ही सरकारांना सोसावा लागणार आहे. मेट्रोच्या उद्‌घाटनानंतर सर्वाधिक प्रवाशांची संख्या १३ मार्च २०२२ रोजी ६७ हजारांपर्यंत गेली होती. तर; सर्वात कमी प्रवासी १९ एप्रिल रोजी ४ हजार २३५ होती.

अनेकांनी ‘टूर’, ‘मनोरंजन’ म्हणून या मेट्रोचा सहकुटुंब प्रवास केला. मार्चनंतर एप्रिल महिन्यातही प्रवाशांची संख्या केवळ शनिवार-रविवारी वाढत आहे. उद्‌घाटनावेळी ‘ई-रिक्षा’, ‘ई-बाइक आणि सायकलीचा नुसता फार्सच ठरला. सध्या केवळ दोन स्थानकांबाहेरच बाइक आणि सायकली दिसत आहेत. मात्र, त्याही कार्यान्वित नसल्याचे दिसून येते. मेट्रो सुरू झाल्यानंतरदेखील वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी यादरम्यान स्थानकांची कामे अपूर्णच आहेत. साधे जिने, सरकते जिने आणि लिफ्टची कामे, रंगरंगोटी, डागडुजी आदी संदर्भातील कामे अर्धवट असल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवासी घटण्याची कारणे

  • पिंपरी ते फुगेवाडीवाडी हा केवळ सहा किलोमीटरचा मार्ग

  • वनाज ते गरवारे महाविद्यालय हा केवळ ४.३५ किलोमीटरचा मार्ग

  • पिंपरी ते शिवाजीनगर असा लांब पल्ल्याचा मार्ग पूर्ण नाही

  • नव्याची नवलाई, पर्यटन संपले

  • कामासाठी, शिक्षणासाठी अद्याप पुरेसा वापर नाही

दृष्टिक्षेपात मेट्रो (दिवस ५०)

उत्पन्न (रुपयांत) - १,०५,६३,१७०

प्रवासी संख्या - १२,४५,०२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT