पुणे - पुणे महापालिकेच्या ट्विटर हँडल, ई-मेल यांसह इतर माध्यमांतून ऑनलाइन तक्रार केल्यानंतर योग्य ती कार्यवाही न करता परस्पर तक्रार बंद करून टाकल्याचे प्रकार वारंवार घडत असतात. आता मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या तक्रारींकडेही महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
मुख्यमंत्री सचिवालयाकडून पुणे महापालिकेकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारी प्रलंबित ठेवल्या जात असल्याने त्याबाबत महापालिकेला पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये ७९ तक्रारींचा समावेश आहे. यात अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम, पथ विभागाच्या प्रलंबित तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे.
महापालिकेसह काही नागरिक हे मुख्यमंत्री कार्यालयाकडे अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, खड्डे, कचरा समस्या, मलनिस्सारण, आरोग्य, मिळकतकर, होर्डिंग, फ्लेक्स यासह इतर तक्रारी करतात. मुख्यमंत्री सचिवालयाकडून या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पुणे महापालिकेकडे पाठविल्यानंतर त्याच्यावर लगेच कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
मात्र, अनेक विभाग या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या अर्जाचा निपटारा झाला नाही अशी आठवण महापालिकेला करून देण्याची नामुष्की मुख्यमंत्री सचिवालयावर येत आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी लेखी आदेश काढून सर्व खातेप्रमुखांना तक्रारींचा निपटारा करावा, असे लेखी आदेश दिले आहेत.
लेखी आदेश
मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात खाते प्रमुखांनी संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आदेश द्यावेत. या कामात हलगर्जीपणा, उशीर होणार नाही याची दक्षता खातेप्रमुखांनी घ्यावी, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी लेखी आदेशात म्हटले आहे.
वडगाव शेरी भागात सांडपाणी वाहिन्या तुंबत असल्याने तक्रार केली होती. गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य खाते एकमेकांवर जबाबदारी ढकलून काम करत नाही.
- संकेत गलांडे, नागरिक
काय आहे व्यवस्था?
पुणे शहरात गेल्या सहा वर्षांत ३४ गावांचा समावेश झाला आहे.
हद्दवाढीसोबतच प्रशासकीय कामाचा व्यापही वाढलेला आहे.
शहरात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जातो.
नागरिकांनीही त्यांच्या तक्रारी, समस्या महापालिकेला कळवाव्यात आणि प्रशासनाकडून सोडविल्या जाव्यात यादृष्टीने कामे केले जाते.
यासाठी पुणे महापालिकेने ‘पुणे कनेक्ट’ नावाचे ॲप विकसित केले आहे.
त्याचप्रमाणे ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियावरून देखील महापालिका नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांची नोंद घेते.
नेमके काय होते?
नागरिकाने केलेल्या तक्रारीचे नंतर काय झाले हे देखील त्याला कळविणे आवश्यक असल्याने ऑनलाइन त्याबाबत पडताळणी करता येते.
महापालिकेने अशी व्यवस्था लावून दिलेली असतानाही संबंधित विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून काम न करता, तक्रारी तशाच ठेवून तक्रार बंद केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.