किरकटवाडी: कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने एका बाजूला प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केलेले असताना दुसरीकडे मात्र पुणे महानगरपालिकेतील पथ विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याची ठेकेदारांसोबत मुंबई व पुण्यातील काही तरुणींसह खडकवासला धरणाच्या उजव्या बाजूला कुडजे गावच्या हद्दीत लबडे फार्म येथे रंगीत ओली पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तम नगर पोलिसांनी छापा टाकून सदर अभियंता, तीन कॉन्ट्रॅक्टर, फार्म हाऊस मालक व इतर 4 अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
विवेकानंद विष्णू बडे (रा. समर्थनगर, नवी सांगवी, पुणे), मंगेश राजेंद्र शहाणे(संतनगर, अरण्येश्वर, पुणे), ध्वनीत समीर राजपूत ( पुरंदर हाउसिंग सोसायटी, पुणे-सातारा रोड.), निलेश उत्तमराव बोर्धे (पुरंदर हौसिंग सोसायटी, म्हाडा कॉलनी पुणे.) ,निखिल सुनिल पवार (पर्वती दर्शन, पुणे), सुजित किरण आंबवले(बालाजीनगर, पुणे), आदित्य संजय मदने (निजामुद्दीन चाळ, अंधेरी पूर्व, मुंबई), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (आगळंबे फाटा, कुडजे,ता.हवेली, पुणे.) व मुंबई येथील एक महिला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या पैकी विवेकानंद बडे हा पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे.
दरम्यान बुधवार दिनांक 28 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास कुडजे गावातील लबडे फार्म येथे डान्स पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक चांदगुडे यांच्या पथकाने सदर डान्स पार्टीवर छापा टाकला असता अभियंत्यासह ठेकेदार मद्यधुंद अवस्थेत मुंबई येथील चार व पुणे येथील एका तरुणीसह डीजे च्या तालावर नृत्य करताना आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. पोलिसांनी रिकाम्या मद्याच्या बाटल्या व इतर काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करून फार्म हाऊसच्या मालकासह इतर सर्वांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे तर यातील तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्यासह पोलीस हवालदार शिवाजी दबडे, अमोल भिसे, धनंजय बिटले, किरण पाटील, संभाजी कोंडावळे व रेश्मा वरपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
"मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून सदर पार्टीत सहभागी असणाऱ्यांसह फार्म हाऊसच्या मालकावरही गुन्हा दाखल करून अटक केली आहे. लॉकडाऊन सुरू असताना अशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य कोणीही करु नये. पुढील तपास सुरू असून कायद्यानुसार सर्वांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे."
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.