एकीकडे पुणे महापालिका प्रशासन शहराचा तब्बल सात हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडते, तर दुसरीकडे महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. त्याशिवाय खास महिलांसाठीच्या ‘ती’ या मोबाईल टॉयलेटची वानवा आहे.
एकीकडे पुणे महापालिका प्रशासन शहराचा तब्बल सात हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडते, तर दुसरीकडे महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. त्याशिवाय खास महिलांसाठीच्या ‘ती’ या मोबाईल टॉयलेटची वानवा आहे. शहरात केवळ पाच ठिकाणीच ‘ती’ मोबाईल टॉयलेटस् आहेत, काही ठिकाणचे मोबाईल टॉयलेटस् विविध कारणांमुळे काढले आहेत. तर नवीन मोबाईल टॉयलेटला मुहूर्त मिळालेला नाही. बस, एसटी, रेल्वे स्थानक, महाविद्यालये, मैदाने अशा असंख्य सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी महिलांची लक्षणीय गर्दी असूनही मोबाईल टॉयलेट पुरविणे महापालिका प्रशासनाला शक्य झालेले नाही.
सार्वजनिक ठिकाणचे स्वच्छतागृहे कमालीचे अस्वच्छ असल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होता. त्यामुळे अनेकदा महिलांना विविध प्रकारच्या आजारांनाही सामोरे जावे लागते. या सर्व प्रश्नांचा विचार करून पुणे महापालिका, स्मार्ट सिटी व साराप्लास्ट या संस्थेने महिलांसाठी ‘ती’ मोबाईल टॉयलेट प्रकल्प पुढे आणला. पीएमपीच्या जुन्या बसचे रूपांतर ‘मोबाईल टॉयलेट’मध्ये करून या बस गर्दीच्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली होती. सध्या जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान, शनिवारवाडा, शिवाजीनगर न्यायालय, औंध व वानवडी या ठिकाणीच ‘ती’ बस उपलब्ध आहेत.
शहरात सध्या पाच ठिकाणी ‘ती’ मोबाईल टॉयलेट सुरु आहेत, त्यासमवेत एकूण ११ ठिकाणी या बस ठेवणार आहे. विविध प्रकारच्या कामांमुळे काही ठिकाणांवर ‘ती’ बस उभ्या करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पर्यायी ठिकाणांचा शोध सुरु आहे. याबरोबरच कार्यक्रमांच्या ठिकाणी महिलांसाठी सिंगल, पोर्टेबल मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिली जात आहेत.
- आशा राऊत, घनकचरा विभाग प्रमुख, महापालिका
‘ती’ मोबाईल टॉयलेटमुळे अनेकदा महिलांची समस्या सुटते. मात्र, या बस मोजक्याच व कमी ठिकाणी आहेत. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा बस उपलब्ध करून दिल्यास महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
- पल्लवी सोनटक्के, नोकरदार
‘ती’ मोबाईल टॉयलेट व बहुपयोगी ठिकाण
भारतीय व पाश्चात्त्य टॉयलेट
पाणी बचत तंत्रज्ञानाचा वापर
पिण्याचे पाणी, पॅनिक बटन, वायफायची व्यवस्था
डिजिटल फीडबॅक सिस्टीम
सॅनिटरी नॅपकिन नष्ट करण्याचे मशिन
प्रशिक्षित महिला कर्मचारी व सुरक्षिततेला प्राधान्य
‘ती’ बस हलविल्या!
शहरात मेट्रो, बीआरटी, उड्डाणपूल, पदपथ व अन्य कामे सुरू आहेत. त्याचा परिणाम ‘ती’ मोबाईल टॉयलेटवर झाला. संबंधित ठिकाणच्या कामांमध्ये या बसचा अडथळा ठरू लागल्याने तेथून बस हलविल्या आहेत. संबंधित ठिकाणची कामे संपली आहेत का, याची चाचपणी महापालिका प्रशासन करत आहे.
‘हिरकणी कक्षा’ची हेळसांड!
महापालिकेमध्ये विविध कामानिमित्त येणाऱ्या तसेच विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या हजारोंच्यावर आहे. मात्र, याच हजारो महिला, स्तन्यदा मातांसाठी आवश्यक ‘हिरकणी कक्षा’ची हेळसांड सुरू आहे. ‘हिरकणी कक्ष’ तिसऱ्या मजल्यावर हलविल्याचे कागदोपत्री दाखवून महिलांच्या भावनेशी खेळ मांडला जात आहे, तर दुसरीकडे पूर्वीच्या हिरकणी कक्षाच्या जागेत दिव्यांग कक्ष सुरू केल्याने महिलांची गैरसोय होत आहे.
महापालिकेने २०१६ मध्ये मुख्य इमारतीत हिरकणी कक्षाची स्थापना केली. त्यादृष्टीने महिलांकडून या कक्षाचा वापर केला जात होता, तर काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या समाजविकास विभागाने ‘हिरकणी कक्ष’ तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारी (जुने कॅन्टीन) स्थलांतरित केल्याचे पत्र दिले आहे. तर हिरकणी कक्षाच्या पूर्वीच्या ठिकाणी दिव्यांग कक्ष सुरु केल्याने महापालिकेत हिरकणी कक्ष नावालाच उरला आहे.
दरम्यान, महापालिकेतील हिरकणी कक्ष स्थलांतर केल्याची तक्रार सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी राज्य महिला आयोगाकडेही केली होती. या पत्राची दखल घेऊन महिला आयोगाने हा कक्ष पुन्हा कार्यान्वित करावा, त्याबाबतचा अहवाल तत्काळ महिला आयोगास पाठविण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. मात्र अद्यापही अंमलबजावणी झाली नाही.
महापालिकेतील हिरकणी कक्षाचा मोठा गोंधळ आहे. या कक्षामध्ये कुठलीही व्यवस्था नाही, सुरक्षिततेचा अभाव आहे. आता दिव्यांगांसाठीच या कक्षाचा वापर होतो. त्यामुळे महिला, स्तनदा माता यांच्यासाठी हिरकणी कक्ष आहे कुठे? असा प्रश्न पडतो.
- वैशाली शेलार
हिरकणी कक्ष त्याच्या पूर्वीच्याच ठिकाणी आहे, तो कुठेही हलविला नाही. त्याच ठिकाणी दिव्यांग कक्ष आहे. हिरकणी कक्षामध्ये येणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी आहे, त्यातही स्तन्यदा माता तेथे येत नाहीत. याउलट दिव्यांग व्यक्ती या कक्षामध्ये येऊन बसतात.
- रामदास चव्हाण, समाजविकास अधिकारी, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.