पुणे : राजकीय हस्तक्षेप आणि मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी केलेल्या दाबावतंत्रामुळे पथ विभागाला निविदा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे मध्यवर्ती पेठा, कोथरूड, बावधन, विमाननगर, धानोरी, कात्रज कोंढवा, फुरसुंगी, धायरी यासह इतर भागातील रस्त्यांची कामे मंजूर करण्यास सुमारे तीन महिने उशीर झाला आहे.
त्याचा फटका पुणेकरांना बसणार असून, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका प्रशासनाने १११ कोटी १६ लाख रुपयांच्या दोन निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर केल्या आहेत. त्यातून ४१ किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत.
शहरातील सर्वच भागात समान पाणी पुरवठा योजना, पावसाळी गटारे, सांडपाणी गटारे, मोबाईल केबल, विद्युत वाहिनी टाकण्यासह विविध कारणांनी खोदकाम केले होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात पुणेकरांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.
त्यामुळे काही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली. पण पुणेकरांना चांगले रस्ते कधी मिळणार असा प्रश्न कायम होता. त्यातच शहरात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेमुळे रस्त्यांचे कामे हाती घेतले जातील असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात विमानतळ ते सेनापती बापट रस्ता हा रस्ताच सुशोभित करण्यात आला.
शहरातील रस्ते डांबरीकरण करणे, समपातळीमध्ये आणणे याकामासाठी ३०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये पाच पॅकेजमध्ये शहरातील रस्त्यांची विभागणी केली आहे. पॅकेज एक हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे आहेत तर उर्वरित चार पॅकेज हे रस्ते डांबरीकरणाचे आहेत. पहिल्या टप्प्यात तीन पॅकेजमध्ये ५० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. पण याची कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. त्यानंतर कामाला गती आली असून, आता सुमारे ३० किलोमीटरची कामे झाली आहेत.
पॅकेज चार साठी राबविलेल्या निविदेत मे.डी.जी. बेल्हेकर ॲण्ड कंपनीची सर्वात कमी खर्चाची ५६ कोटी ६७ लाख ७६ हजार रुपयांची निविदा मान्य केली. तर पॅकेज ५ मधील कामासाठी मे.श्री. असोसिएटस यांची ५४ कोटी ४९ लाख ७७ हजार रुपयांची निविदा स्थायी समितीने मान्य केली.
चौथे पॅकेज ठरले होते वादग्रस्त
रस्ता डांबरीकरणाचे पॅकेज चार हे राजकीय हस्तक्षेप, माजी नगरसेवक, माजी सभागृहनेते, विद्यमान आमदार यांच्याकडून आपल्याच ठेकेदाराला काम मिळाले पाहिजे यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरवात केली. खोटी कागदपत्र जोडणे, डांबराचा प्लांट शहराच्या हद्दीबाहेर असणे या यासह इतर अटींचे उल्लंघन केले जात असल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर ही निविदा प्रशासनाने रद्द केली. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता, त्यानंतर राबविलेली निविदा प्रक्रियायामुळे वेळ गेला. त्याचा फटका २९ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामांना बसला.
‘‘शहरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी पॅकेज चार आणि पाचचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्यामातून ४१ रस्त्यांची कामे होतील.’’
- व्हि. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग
पॅकेज चार मधील प्रमख रस्ते
हांडेवाडी रस्ता
एनआयबीएम चौक ते पॅलेस आॅर्चिड
कौसरबाग रस्ता
काळेपडळ गजानन महाराज मंदिर रस्ता
फुरसुंगी ते खुटवड चौक
आंबेगाव येथील दरी पूल जवळील रस्ता पावसाळी गटारांसह
आंबेगाव खुर्द मधील रस्ता पावसाळी गटारांसह
कात्रज, वडगाव खुर्द, वडगाव बुद्रूक, धायरीतील अंतर्गत रस्ते
कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते
वानवडीतील सनग्रेस शाळा
कोंढवा मिठानगर येथील रस्ते
पॅकेज पाच मधील प्रमख रस्ते
गरवारे महाविद्यालय ते कर्वे पुतळा
राहुलनगर रस्ता जलसंपत्ती भवन ते गोसावी वस्ती
वारजे हायवे रस्ता लागतचे रस्ते
बालेवाडी रस्ता
भांडारकर रस्ता
भांडारकर, प्रभात रस्त्यावरील अंतर्गत रस्ते
डेक्कन जिमखाना
धानोरी गावठाण
सोकारे नगर
विमान नगर
सर्किट हाऊस
सावित्री निवास, साई एन्टप्राएझेस बावधन
शिवाजी पुतळा ते भेलेकनगर चौक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.