पुणे : ‘तुम्हाला चंद्रावरील स्थितीचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही गणेशखिंड रस्त्यावर जा,’ असे उपरोधिकपणे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे, त्याभोवती खडी व माती पडलेली आहे. महापालिकेने केलेल्या खड्डे दुरुस्तीच्या दाव्याची हा रस्ता पोलखोल करत आहे.
शहरात जोरदार पाऊस झाला. पुराच्या पाण्याचा नदीकाठच्या भागाला फटका बसला. गेले काही दिवस मंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरबाधितांचे सांत्वन केले, त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही दिले. त्याचबरोबरच पुराला जबाबदार कोण? यावरून एकमेकांवर चिखलफेकही केली. मात्र यादरम्यान सगळ्यांनाच खड्ड्यांचा विसर पडला. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना होणार त्रास, वाहतुकीवर होणारा परिणाम या गंभीर समस्येकडे प्रशासानासह नेत्यांनी सोईस्कर डोळेझाक केली.
गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खडीचे ढिगारे ओतून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न पावसाने धुवून काढला. आता त्याच खड्ड्यांतील पाणी व खडीच्या ढिगाऱ्यांमध्ये दुचाकींची चाके रुतून अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. सेनापती बापट रस्ता जंक्शन, रेंजहिल्स कॉर्नर, खैरेवाडी, सेंट्रल मॉल अशा विविध ठिकाणच्या खड्ड्यांमुळे पिंपरी-चिंचवड व पुण्यातील नागरिकांना वाहने चालविणे अवघड झाले आहे. रेंजहिल्स कॉर्नर येथे केलेल्या खोदाईमुळेही खड्डे तयार झाले असून, वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कृषी महाविद्यालयातून केलेल्या नवीन पर्यायी रस्त्याचीही दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खड्डे दुरुस्तीचे काम पथ विभागाकडून केले जात आहे. वेगवेगळ्या भागांत महापालिकेच्या पथ विभागाची पथके खड्ड्यांचा शोध घेत आहेत. त्यानंतर संबंधित खड्डे शास्त्रीय पद्धतीने दुरुस्त करण्यावर भर दिला जात आहे.
- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका
या रस्त्यांची दुरुस्ती केव्हा होणार?
बाणेरमधील पाषाण फाटा, सकाळनगर, महाबळेश्वर हॉटेल ते नवीन पासपोर्ट कार्यालय, बालेवाडी, पाषाण रस्ता, खडकी ते औंध रस्ता, बोपोडी ते हॅरिस पूल, कोथरूड, वनाज परिसर, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, स्वारगेट, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), पुणे-बंगळूर रस्ता, कात्रज, कोंढवा, फुरसुंगी, हडपसर, येरवडा, विश्रांतवाडी यासह वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. महापालिकेकडून खड्डे दुरुस्तीचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात प्रमुख रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे कायम आहेत. प्रमुख रस्त्यांचीच अशी दुरवस्था आहे, तर अंतर्गत रस्त्यांची अवस्था यापेक्षा अधिक बिकट असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.