कचरा वर्गीकरण, पाणंदमुक्ती, बंदिस्त सांडपाणी, शिबिरे करतात आरोग्यसंवर्धन
पुणे - एखादं टुमदार खेडं म्हटलं की, डोळ्यासमोर हिरवीगार शेती, घरासमोर सारवलेलं अंगण, नीटनेटके रस्ते, वाहता ओढा अणि रस्त्याच्या कडेनं हिरवीगर्द झाडी असं चित्र समोर येतं. काळ बदलला आणि विकास आणि रहाणीमानाच्या संकल्पना, गरजा बदलल्या तशी गावाचीही ठेवण बदलली. गावाच्या रस्त्यावरील उकिरडा, झाडांवर अडकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, तुंबलेली गटारं, बुजलेले ओढे-नाले समोर येतात. यातून गावाचं चित्र बदललं आणि आरोग्य समस्याही वाढल्या. हे सगळं होतंय ते चुकीच्या सवयींमुळं. पुन्हा एकदा गावकरी निरोगी होण्यासाठी प्रत्येकानं स्वतःच्या घरापासून स्वच्छतेबाबत जागरूक होणं गरजेचं आहे. तशी पावले काही गावांनी उचलली आहेत.
घरातला केर अंगणात टाकतो आणि अंगणातला रस्त्यावर फेकतो.
प्लास्टिक पिशव्या कळत-नकळत उघड्या गटारी किंवा उकिरड्यावर जातात. तंबाखू, गुटखा किंवा पानविडा यांच्या पिचकाऱ्यांनी रस्ता रंगतो. अजुनही बऱ्याच जणांकडे शौचालये नाहीत. यातूनच गावात दुर्गंधी वाढते, पाणी प्रदुषीत होते. आजार फैलावतात. गरज आहे प्रत्येकाची मानसिककता बदलण्याची आणि गावकऱ्यांच्या सामुहिक प्रयत्नांची.
स्वच्छता अन् आरोग्याला प्राधान्य
वातावरणातील बदलाप्रमाणे साथीचे रोग डोके वर काढतात. हे लक्षात घेऊन ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयोगशील ग्रामपंचायती विविध उपक्रम राबवतात. यापैकी एक भालगुडी (ता. मुळशी, जि. पुणे) ग्रामपंचायत. येथील सरपंच कु. ऋतुजा साठे म्हणाल्या की, गावकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृतीसाठी सकाळ माध्यम समुहाच्या तनिष्का उपक्रमांतर्गत आम्ही दोनदा आरोग्य शिबिर घेतले. एक शिबीर महिलांसाठीच होते. डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. गावकऱ्याला आरोग्य कार्डही दिले. पावसाळ्यापुर्वी प्रत्येक घरात ग्रामपंचायतीतर्फे पाणी निर्जंतुकीकरणाचे द्रावण देतो. लोकसहभागातून गावातील पाण्याच्या टाक्यांची ठराविक महिन्यांनी स्वच्छता करतो. प्रत्येक घरी बायोटॉयलेट आहेत. परिणामी साथीच्या आजारांवर नियंत्रण आले.
कोरटेक झाले पाणंदमुक्त
कोरटेकच्या (जि. परभणी) गावकऱ्यांनी कुटुंबासाठी स्वच्छतागृह बांधले आहे. गाव पाणंदमुक्त केलंय. पर्यावरण संतुलनासाठी गावच्या लोकसंख्येच्या तिप्पट झाडे गावशिवारात लावलीत. रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारी बांधल्या. चार ठिकाणी शोषखड्डे केल्याने रस्ते चिखलमुक्त झाले. या गावाला निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय पुरस्कारही मिळालाय.
जेठभावडा प्लास्टिकमुक्त
जेठभावडा (जि. गोंदिया) गावचे सरपंच जितेंद्र रहांगडाले यांना सकाळ-ऍग्रोवनच्या सरपंच महापरिषदेतून ग्रामविकासाची दिशा मिळाली. परिषदेनंतर त्यांनी ग्रामविकासाच्या उपक्रमाच्या अंमलबजावणींचे व्हिजन ग्रामस्थांसमोर मांडले. ग्रामस्वच्छतेपासून सुरवात केली. रहांगडाले दर शनिवारी हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छतेला सुरवात करतात. आता ती ग्राम चळवळ झालीय. गावाने प्लास्टिकबंदीचा सामुदायिक निर्णय घेतलाय. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे काढलेत. तीनशे कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये आहेत, त्यामुळे गाव हागणदारीमुक्त झाले. शेती विकासातही गावाची आघाडी आहे.
तरुणांच्या व्यसनमुक्तीवर भर
कळंबवाडीने (ता. बार्शी, जि. सोलापूर) लोकसहभागातून विकासाची दिशा पडकली. सरपंच ऍड. विकास जाधव म्हणाले की, लोकसहभागातून ग्रामविकास, शेती विकासाच्या बरोबरीने आरोग्याकडेही लक्ष दिले. तरूणांसाठी व्यसनमुक्ती शिबिरे घेतली. महिलांचे ग्राम आणि आरोग्य विकासात महत्वाचे स्थान आहे. महिलांचे बचतगट विविध उपक्रम राबवतात. शेती, आरोग्य, शिक्षणाबाबत गावात जागरुकता आली.
बनवडीत कचऱ्यावर प्रक्रिया
ग्रामीण भागातही कचऱ्याच्या समस्येने अनारोग्य वाढत आहे. बनवडी (जि. सातारा) गावाने कचरामुक्तीचा पॅटर्न राबवलाय. ग्रामपंचायत ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करून त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावते. ओल्या कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती होते. यातून उत्पन्नाचे साधन तयार होणार आहे. गावात स्वच्छता आहे. याबरोबरीने गावातील सांडपाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली जाते.
थोडक्यात, राज्यातील अनेक गावे ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छतेचे उपक्रम राबवत आहेत. त्यातील प्रयोगशिलता इतरांसाठी अनुकरणीय आहे. गावात आरोग्य वाढीस लागल्याने प्रगती आणि विकासाला चालना मिळाली आहे.
|