पुणे - शहरातील मेट्रोच्या प्रकल्पांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गेले सहा महिने महापालिकेची मनधरणी करणाऱ्या ‘महामेट्रो’ला अखेर यश मिळाले आहे. पेशवे पार्कमध्ये मेट्रो इन्फॉर्मेशन सेंटर स्थापन करण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. संभाजी उद्यानाची जागा मात्र त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे आता मंजुरी मिळालेल्या ठिकाणी महामेट्रो किती तत्परतेने हालचाल करते, यावर या सेंटरची उभारणी अवलंबून असेल.
मेट्रो प्रकल्पाची माहिती देणारे मेट्रो इन्फॉर्मेशन सेंटर महामेट्रोने नागपूरमध्ये उभारले आहे. मेट्रोचा डबा (कोच) प्रत्यक्षात कसा असेल, त्यातील आसनव्यवस्था कशी असेल, प्रवाशांना उभे राहण्यासाठी अंतर किती असेल, डब्यात पुढील स्थानकांची माहिती कशी मिळेल आदींची अनुभूती देणारा डबा नागपूरमध्ये प्रवाशांसाठी सादर करण्यात आला आहे. त्याच डब्यात काही कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत मेट्रो प्रकल्पाची माहिती आणि मेट्रो प्रकल्पात रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यास त्याबद्दलही तपशील तेथून पुरविला जातो. मेट्रोची अलाइनमेंटही तेथे ठेवली आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांना त्याबाबत माहिती मिळत आहे.
या केंद्राच्या धर्तीवर पुण्यातही मेट्रो इन्फॉर्मेशन सेंटर उभारण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी संभाजी उद्यानातील जागा मागितली होती; परंतु हे उद्यान सकाळी दहा ते दुपारी चार बंद असते, असे उद्यान विभागाने त्यांच्या निदर्शनास आणून दिले; तसेच त्यांना पेशवे पार्क आणि पुणे स्टेशनच्या आवारातील जागा सुचविली; तसेच रूबी हॉल हॉस्पिटलसमोरील माता रमाई आंबेडकर उद्यानालगतही असे केंद्र उभारता येईल, असे त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितले; परंतु संभाजी उद्यानातच जागा मिळावी, यासाठी महामेट्रोचे अधिकारी ठाम होते. गेले सहा महिने त्यांचा याबाबत पाठपुरावा सुरू होता; परंतु त्यांना ती जागा मिळालीच नाही. महापालिकेने त्यांना पेशवे उद्यानातील जागा मंजूर केल्याच्या वृत्ताला महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे. आता महामेट्रोच्या तत्परतेवर या केंद्राची उभारणी अवलंबून असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.