पीएमपी सेवा सुधारली; काही प्रश्न कायम
पुणे - अपेक्षित थांब्यावर बस थांबवली नाही म्हणून जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चालकाने मारहाण केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर थांब्यावर अपेक्षित ठिकाणी बस थांबतात का, यासह पीएमपी सेवेबाबत ‘सकाळ’ने गुरुवारी पाहणी केली. यात अनेक ठिकाणी बस थांब्यापासून लांबच उभ्या राहत असल्याचे दिसले. गाड्यांच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे, मात्र वेळापत्रक न पाळणे, महिलांच्या राखीव जागांवर बसणारे पुरुष प्रवासी यासारखे प्रश्न असल्याचे आढळले.
शेवटचा प्रवासी येईपर्यंत थांबा
शेवटचा प्रवासी चढेपर्यंत बस थांब्यावर थांबविणे अपेक्षित आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बसचालक आणि ठेकेदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचे ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी यांनी सांगितले.
प्रत्येक बस थांब्यांवरच उभी राहिली पाहिजे. त्यासाठी आखणी (पांढऱ्या रंगाचे पट्टे) करण्यात आली असल्याचे सांगून मुंढे म्हणाले, ‘‘प्रवाशांना बसमध्ये सहजरीत्या चढता आणि उतरता यावे, याकरिता चालक, वाहक आणि ठेकेदारांसाठी नियम ठरविले आहेत. प्रवासी नसलेल्या थांब्यांवर पाच सेकंद, तर प्रवासी आहेत त्या थांब्यावर शेवटचा प्रवासी बसमध्ये येईपर्यंत थांबविणे आवश्यक आहे. तसेच बीआरटी मार्गांवरील थांब्यावर किमान आठ
सेकंद बस थांबविण्याचा नियम आहे.’’
विविध रस्त्यांवरील पीएमपी थांब्यांची पाहणी
कर्वे रस्ता - थांब्यापासून दूर अंतरावर बसगाड्या
कर्वे रस्त्यावरील काही बसथांब्यांवर संमिश्र निरीक्षणे आढळली. एकीकडे मिनिटा-मिनिटाला येणाऱ्या गाड्या आणि त्यात प्रवाशांना बसायला बऱ्यापैकी जागा असल्याच्या काही सकारात्मक गोष्टी आढळून आल्या; मात्र दुसरीकडे महिलांसाठी असणाऱ्या राखीव आसनांवर बिनदिक्कतपणे बसलेले पुरुष प्रवासी आणि थांब्यांपासून लांब थांबत असलेल्या बसगाड्या. अशा गैरसोयीच्या काही गोष्टीही ठळकपणे दिसून आल्या. अर्थात, काही थांब्यांच्या जवळच रिक्षा आणि दुचाकी-चारचाकींनी केलेले ‘पार्किंग’ हे बसगाड्या थांब्यापासून दूर थांबत असल्याचे एक कारण दिसून आले. बसेस अनेकदा नादुरुस्त असतात. ही परिस्थिती तातडीने बदलायला हवी. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना बसता यावे, यासाठी थांब्यावर बस पुरेसा वेळ थांबवाव्यात, अशा काही प्रतिक्रिया प्रवाशांनी नोंदवल्या.
शिवाजी रस्ता - बस अन् जागेसाठी महिलांना प्रतीक्षाच
शिवाजी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या थांब्यावर सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. पण बहुतांशी बसगाड्या उशिराने येत होत्या. त्याही प्रवाशांच्या प्रचंड गर्दीसह. चालक थांब्यापासून लांब अंतरावर गाडी थांबवत होते. त्यामुळे प्रवासी धावपळ करत असल्याचे दिसून आले. काही मोजक्या प्रवाशांनाच आणि विद्यार्थ्यांनाच बसमध्ये चढणे शक्य होत होते. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अनेकदा ताटकळत उभे राहावे लागल्याचे दिसून आले; मात्र काही बसगाड्या प्रवाशांसाठी थांबत होत्या. महिलांच्या राखीव जागांवर पुरुष प्रवासी बसलेले दिसून आले. त्यामुळे आधीच थांब्यावर ताटकळलेल्या महिलांना बसमध्येही उभे राहावे लागत असल्याचे दिसून आले. या मार्गावरील बसगाड्यांची संख्या पुरेशी होती. मात्र, त्या थांब्यावर जेमतेम तीन ते चार सेकंदच थांबत होत्या. प्रवाशांना रोजच हा अनुभव येत असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवले.
स्वारगेट, कात्रज, भारती विद्यापीठ, धनकवडी, अपर, पर्वती, मार्केट यार्ड, सिंहगड रस्ता, कोंढवा, हडपसरकडे जाणाऱ्या बसगाड्यांना गर्दी होती. काही रस्त्यांवरील बसगाड्या तासभर उशिराने आल्या. वैशाली शिंदे म्हणाल्या, ‘‘पर्वती पायथ्याकडे जाणाऱ्या बसमधून मी प्रवास करते. या मार्गावर बसला एक तास उशीर होतो. रस्त्याच्या मध्यभागीच बस थांबते. त्यामुळे बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते.’’
विद्यापीठ रस्ता - बसमागे धावण्याची महिलांवर वेळ
वेळ सकाळी दहाची. बसथांब्यावर नोकरदार महिला व विद्यार्थिनींची गर्दी होती. एकापाठोपाठ एक बस येत होत्या; पण आधीच गर्दी असल्यामुळे महिला-तरुणींना बसमध्ये चढणे शक्य होत नव्हते. अशात थांब्याच्या पुढे जाऊन बस थांबत होती. अनेक विद्यार्थिनींना वेळेत बस मिळाली नाही. या परिस्थितीचा महिलांना रोजच त्रास होत असल्याची त्यांची तक्रार आहे. नियोजित वेळेत न येणाऱ्या बस, त्यातील गर्दी, भरीस भर म्हणजे बहुतेक बसगाड्या थांब्याच्या पुढे जाऊनच थांबणार !... त्यामुळे महिला आणि विद्यार्थिनींना बस गाठण्यासाठीची धावपळ रोजचीच झाली आहे.
महापालिका भवन, डेक्कन, स्वारगेट, कात्रज, मंडई आदी ठिकाणी जाण्यासाठी बसगाड्या येत होत्या; पण त्या वेळापत्रकानुसार नव्हत्या. आधीच गर्दी असल्याने चालक बस थांबवत नसल्याचेही आढळून आले. ज्या काही बस थांबत होत्या, त्याही थांब्यापासून काही अंतरावर. त्यामुळे ज्येष्ठांसह सगळ्यांनाच बसच्या मागे धावावे लागत होते. त्यात शिवाजीनगर व महापालिकेकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले. थांब्यावर रोजच अशा अडचणी येत असल्याचे बहुतांशी प्रवाशांबरोबर चर्चा करताना जाणवले.
अर्धा तास थांब्यावर ताटकळत असलेली अपर्णा मोरे म्हणाली, ‘‘मी मॉडर्न महाविद्यालयात शिकते. महापालिकेकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करावा लागतो; पण गर्दीमुळे बसगाड्या थांबत नाहीत. आधीच उशिराने येणाऱ्या बसमुळे अडचणी येतात. बस मिळाली नाहीतर काही वेळेला रिक्षाने प्रवास करावा लागतो.’’
सोलापूर रस्ता - बस बंद पडण्याचे प्रमाण जास्त
आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजजवळच्या थांब्यावर बसगाड्या थोड्या अंतरावर थांबतात. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढणे व उतरणे अवघड होते. पावसाळ्यात रस्त्यावर साचलेले पाणी व चिखलामुळे तर बसपर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडते. हडपसर, उरुळी कांचन, साडेसतरानळी या भागात जाण्यासाठी या मार्गावरील बसगाड्यांची वारंवारिता बस बंद पडण्याचे प्रमाण जास्त वाढली असल्याचे निरीक्षण प्रवाशांनी नोंदविले. मात्र, बसथांब्यांवर थांबण्याचा कालावधी हा सात सेकंदांपेक्षा कमी असल्याचेही प्रवाशांनी सांगितले. बस बंद पडण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे एका महिला प्रवाशाने सांगितले.
‘‘सायंकाळी खूप वाहतूक असते व त्या वेळी बसमध्ये चढण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. खासगी वाहनचालक सातत्याने हॉर्न वाजवत असल्यामुळे बसचालक काही क्षणांतच बस पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. त्यातच बसमध्ये चढण्यासाठी असलेली पायरीची उंची अधिक असल्याने खूप अडचणी येतात,’’ असे महिला प्रवाशांनी सांगितले.
मोबाईल ॲपवर करा तक्रार
पीएमपीची सेवा आणि प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याकरिता पीएमपी व्यवस्थापनाने PMP E- connect हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्यात तक्रारी नोंदविण्यासाठी पर्याय उपलब्ध असून, त्यावरील तक्रारींची चोवीस तासांत दखल घेतली जाते. त्यानंतर कार्यवाहीच्या स्वरूपाची माहितीही प्रवाशांना दिली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.