पुणे

‘स्पोर्टस हब’ बनलेल्या पुण्याचे दुखणे!

नंदकुमार सुतार

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित ‘स्कूलिंपिक’ स्पर्धा गेल्या महिन्यापासून सुरू आहे. या स्पर्धेत तब्बल १७ हजारांवर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पुण्यात क्रीडा संस्कृती किती रुजली आहे, याचेच हे द्योतक आहे. हे अधोरेखित करणारी आणखी उदाहरणे देता येतील. डेक्कन जिमखान्यावर किंवा तशा मैदानावर सकाळ- संध्याकाळ जाऊन पाहा, पाय ठेवायला जागा नसते. हजारो उभरते खेळाडू मोठी स्वप्ने उराशी घेऊन अशा ठिकाणी सराव करताना दिसतात. पुण्याचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर ती संख्या काही हजारांवर जाते आणि क्रीडा संस्कृतीचा मुद्दा मनामध्ये आणखीनच ठसतो.

आताच्या परिभाषेत मांडायचे तर पुणे शहर कधीच ‘स्पोर्टस हब’ बनले आहे. ‘एज्युकेशन हब’, ‘आयटी हब’, ‘इंडस्ट्री हब’ आदी बिरुदे शिरपेचात मिरवणारे पुणे महानगर ‘स्पोर्टस हब’ म्हणूनही परिचित झाले आहे. एकीकडे खेळांबाबत पुणेकर जागरूक होत असताना दुसरीकडे सरकार, त्यांच्या यंत्रणा, महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज संस्था यांच्या अजेंड्यावर हा विषय पुरेशा प्रमाणात दिसत नाही. म्हणजेच क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत गांभीर्य दिसत नाही. आपल्याकडे चांगले खेळाडू तयार होत नाहीत, असा दोषारोप सरकारने करायचा आणि त्याचवेळी ‘स्पोर्टस हब’ बनलेल्या पुण्यासारख्या शहराकडे आणि तेथील उभरत्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे क्रीडा संस्कृतीचे प्रचंड नुकसान होत आहे. 

पुण्यामध्ये सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांना आश्रयस्थान मिळाले आहे. ते पुण्यात चांगल्या प्रकारे रुजले आणि फुलले आहेत. क्रिकेट विश्‍वात नाव कमावणारे सुरेंद्र भावे, हृषीकेश कानिटकर, मिलिंद गुंजाळ ते अलीकडचा उमदा खेळाडू केदार जाधव यांच्यासह इतर क्रीडा प्रकारांतील किशोरी शिंदे, पूजा शेलार, दीपिका जोसेफ, पृथा वर्टीकर, पूर्वा बर्वे, सिद्धांत बांठिया आदी अनेक तारे पुणे शहराने देशाला दिले आहेत. ऑलिंपिकवीर दत्तू भोकनळही पुण्याचेच प्रतिनिधित्व करतो. पुढच्या वाटचालीसाठी त्याने पुण्याचीच निवड केली आहे. क्रिकेटव्यतिरिक्त बुद्धिबळ, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती आदी सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांतील दिग्गज खेळाडू पुण्याने दिले आहेत. मामासाहेब मोहोळ, बुवा घुमे, रघुनाथ पवार, हिरामण बनकर, विजय बनकर, अंकिता गुंड, अमोल बराटे, योगेश दोडके आदींची मोठी कुस्ती परंपरा आहे.

ही देदीप्यमान परंपरा अभिमानाने मिरवण्यासारखी आहे; परंतु त्याचवेळी या परंपरेला साजेसे काम सरकार किंवा अन्य संबंधित यंत्रणा करतात का? त्यांची परंपरा याप्रमाणे झगमगती का नाही? भारतात क्रीडा क्षेत्राचे नाव निघाले की हरियाना, कर्नाटक, गुजरात, पंजाब, झारखंड आदी राज्यांची नावे समोर येतात. तेथील पायाभूत सुविधांची चर्चा होते; त्याचवेळी महाराष्ट्रातील क्रीडा असुविधांची चर्चा होताना दिसते. ‘यूथ कॉमनवेल्थ गेम्स’ पुण्यात यशस्वीपणे पार पडल्या, तेव्हापासून पुण्याचे नाव जागतिक क्रीडा क्षितिजावर चमकू लागले. त्यातून पुण्यातील अनेक पालकांनी आणि युवा मंडळींनी प्रेरणा घेतली आणि क्रीडा क्षेत्राचा करिअर म्हणून विचार केला. अलीकडच्या काळात येथील चित्र पूर्णपणे पालटले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये क्रीडा क्षेत्राकडचा ओढाही तेवढाच वाढला आहे. आता गरज आहे त्याला चालना देणारी पावले उचलण्याची. ‘पुणे स्पोर्टस हब’ म्हणून अधिक वेगाने विकसित होण्यासाठी निर्णय घेण्याची. 

युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर बालेवाडी क्रीडा संकुलावर हळूहळू मळभ चढत गेले. तेथील सुविधांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. सरकारने तिकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत छोटी क्रीडा संकुले उभी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पालिकेने आपल्या आराखड्यात याला प्राधान्य द्यावे. एका अंदाजानुसार विविध क्रीडा प्रकार लक्षात घेतले तर त्यात करिअर करू इच्छिणारे आणि हौशी खेळाडूंची संख्या सुमारे पाच लाखांच्या घरात असेल आणि पायाभूत सुविधा सर्वांसमोर आहेत. त्या अत्यंत अपुऱ्या आहेत.

पुण्यामध्ये खेळाडूंसाठी तातडीने ‘सपोर्ट सिस्टिम’ उभी करण्याची गरज आहे. कारण, पुणे ‘स्पोर्टस हब’ बनले आहे. राज्यातील कोणत्याही शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रीडा चळवळ पाहायला मिळणार नाही. म्हणून मूलभूत सुविधांबरोबरच विदेशी दर्जाच्या अत्याधुनिक सुविधांचीही येथे गरज आहे. ज्या काही थोड्या सुविधा आहेत, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बालेवाडी क्रीडा संकुलात काही कोटी रुपये खर्चून बायोमेकॅनिक लॅब उभी करण्यात आली, ती सध्या धूळ खात पडून आहे. फिजिऑलॉजी लॅबही आहे. पुनर्वसनाची उपकरणे, तसेच डायनोमेट्रीचीही सुविधा आहे. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. 
- डॉ. अजित मापारी,  महाराष्ट्रातील पहिल्या खासगी स्पोर्ट क्‍लिनिकचे संस्थापक

उपचारांचीही वानवा
सक्रिय खेळाडूंना वारंवार दुखापती होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पायाभूत सुविधांनंतर दुसरी महत्त्वाची गरज आहे ती खेळाडूंवर शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार करणारी, शिवाय प्रतिबंधात्मक प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी करण्याची. या आघाडीवर तर आणखी अनास्था आहे. जगभर ‘स्पोर्ट मेडिसीन’ नावाची शाखा चांगली विकसित झाली आहे. त्यामुळे तेथील खेळाडूंची कामगिरी आपल्या खेळाडूंच्या तुलनेत चांगली होते. नव-नवी तंत्रं आपल्याकडे खूप उशिरा येतात. पुण्यामध्ये प्रभात रस्त्यावर पहिले स्पोर्ट क्‍लिनिक ‘फिट टू स्पोर्ट’ सुरू करणारे डॉ. अजित मापारी म्हणतात, ‘‘स्पोर्ट सायन्स आणि स्पोर्ट मेडिसीन खूप विकसित झाले आहे; पण आपल्या खेळाडूंना त्याचा लाभ मिळत नाही. खेळाडूंच्या दुखापतींवर अस्थिरोग तज्ज्ञ उपलब्ध चांगल्या पद्धतीद्वारे उपचार करतात; परंतु त्यांचा दृष्टिकोन सर्जिकल असतो. जागतिक स्पर्धेला तोंड देणारे खेळाडू निर्माण करायचे असतील, तर शारीरिक क्षमतेबरोबरच बौद्धिक, मानसिक, नैतिक क्षमताही वाढवाव्या लागतात.’’ डॉ. मापारी यांच्याकडे दत्तू भोकनळसह मिहीर आम्रे, अंकिता रैना, सिद्धार्थ कांबळे आदी खेळाडू सल्ला आणि उपचारासाठी येत असतात. सुविधांअभावी अशा मोठ्या खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पायाभूत सुविधा आणि स्पोर्टस सायन्स यांची चांगली सांगड घातल्यास ‘स्पोर्टस हब’ला नक्कीच बळकटी येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT