कोथरुड : बऱ्याच दिवसानंतर थिएटर हाऊस फुल्ल पाहून धन्य वाटले. ड्रामा फीक्स आहे. जे घडायचे ते घडणार पण आहे तोपर्यंत समाधानात रहायचे. ८७ वर्षाचा झालोय पण कसला त्रास नाही. बीपी नाही. डायबेटीस नाही. आत्मशक्तीवर विश्वास आहे. आई बाबांची कृपा. माय बाप प्रेक्षकांचे आशिर्वाद यामुळेच इथवरचा प्रवास झाला. जीवन गौरव पुरस्कार दिला जातोय याबद्दल मी शतःशा आभारी आहे. अशा शब्दात स्वरुप कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाच्यावतीने ज्येष्ठ रंगकर्मी स्वरुप कुमार यांना जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक दीपक मानकर, अभिनेत्री सविता मालपेकर, विजय डाकले, अभिनेते गिरीश परदेशी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वरुप कुमार म्हणाले की, पुण्याचा प्रेक्षक अतिशय सुज्ञ आणि जाणकार आहे. त्यांनी ज्या नाटकाची वाहवा केली ते नाटक महाराष्ट्राने उचलून धरले. माझ्या प्रत्येक नाटकाचे हजार बाराशे प्रयोग झाले.
आपल्यातील मिश्किल पणाची झलक दाखवत स्वरुप कुमार म्हणाले की, सास-याच्या जीवावर म्हातारा झालोय. माझे सासरे म्हणायचे, आम्ही एकदा मुलगी दिली की संपले. तुम्ही काम करा नाहीतर रस्त्यावर डोंबा-याचा खेळ करा आम्हाला काही प्रश्न नाही. पत्नीकडे पहात म्हणाले की, तुला पस्तावा तर नाही ना गं. स्वरुप कुमार यांच्या या सवालाला सभागृहातील प्रेक्षकांसह त्यांच्या पत्नीनेही हसत आणि टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
दीपक मानकर म्हणाले की, कोरोना काळाचा सामना करणे अनेकांना अवघड झाले. अजूनही त्यातून अनेक जण सावरले नाहीत. स्वरुप कुमार यांच्यासारख्या कलाकारांमुळे लोक स्वतःचे ताण तणाव विसरतात. पण कलाकार संकटात आल्यावर त्यांना साथ देण्याची जबाबदारी समाजाची आहे. संकट काळाचा मुकाबला करता यावा म्हणून कलाकारांनी पतसंस्था स्थापावी. जेणेकरुन त्यांना आर्थिक अडचणींतून सावरता येईल. त्यासाठी आम्ही अवश्य मदत करु.
नाट्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. त्याचे परिक्षण अभिनेते सिध्दार्थ झाडबुके, विनोद खेडेकर यांनी केले. आभार संकेत शिंदे यांनी आभार मानले.
प्रभाकर मेहंदळे यांना ज्येष्ठ रंगकर्मी बाबुराव गोखले यांनी स्वरुप कुमार हे नाव दिले. ही आठवण जागवताना स्वरुप कुमार म्हणाले की, मी किर्लोस्कर मध्ये सेल्सचे काम करत होतो. नाटकात आपले नाव दिसले तर नोकरीवर परिणाम होईल म्हणून माझे नाव लावू नका असे मी बाबुराव गोखले यांना सांगितले. ते म्हणाले काळजी करु नको. त्यांनी मला जे नाव दिले ते कायम स्वरुपी राहीले. नंतर माझ्या नाटकाचे इतके प्रयोग होवू लागले की मी स्वतःच नोकरी सोडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.