Manjari: गेली दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हडपसर मांजरी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक बैठी घरे, सोसायट्या व चाळीमध्ये पाणी शिरले आहे. सखल भागात पाण्याची तळी साचली आहेत. वाहतूककोंडी होत आहे. तर दोन्ही मांजरी गावांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला असून नुकतीच वाहतूक सुरू झालेल्या नवीन पूलावरील वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली आहे.
मांजरी खुर्द व बुद्रुक गावाला जोडणारा मुळा मुठा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. या पुलाशेजारीच नव्याने पूल उभारण्यात आला आहे. नुकतीच त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र, याही पुलाला पाणी धडकू लागल्याने हडपसर व लोणीकंद पोलिस तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.
पाण्याची पातळी वाढल्याने येथील स्मशानभूमी व परिसरातील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. नवीन पुलाला पाणी धडकत असल्याने येथील पुलावरील वहातुक लोणीकंद पोलीस स्टेशन व मांजरी खुर्द ग्रामपंचायतीने बंद केली आहे. नागरिकांनी घरी किंवा सुरक्षित ठिकाणी थांबावे. अत्यंत गरजेचे असेल तरच प्रवाशांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलिस पाटील भारती उंद्रे यांनी केले आहे.
ससाणेनगर येथील गल्ली क्रमांक १४ व सय्यद नगर येथील गल्ली क्रमांक १५ मधील घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली. येथील सांडपाणी वाहिनी बदलून त्याची क्षमता वाढवावी असे अनेक वेळा बालिका प्रशासनाला सांगितले आहे याशिवाय येथील चेंबर्स बदलून दुरुस्ती करावी, अशी मागणी ही वारंवार केली आहे.
मात्र पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे वारंवार पावसाळ्यात आम्हावर ही परिस्थिती ओढवत असते असा आरोप येथील कार्यकर्ते महेश ससाणे, रहिवासी अजय दळवी, संभाजी जाधव, अमोल डेगसकर, इम्रान मणियार, शिवाजी दळवी, योगिनी दळवी, दिशा सुतार, कौशल्या दळवी, संगीता गायकवाड, वैशाली वाडेकर, मीना दळवी आदींनी केला आहे.
हांडेवाडी रस्त्यावरील सातव नगर येथील यशराज प्रिमो हाउसिंग सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवून राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मगरपट्टा चौक, मगरपट्टा रस्ता, माळवाडी रस्ता, एस. एम. जोशी कॉलेज व साने गुरुजी रुग्णालयासमोर, गाडीतळ, मगरपट्टा पश्चिम गेट, मुंढवा रेल्वे भुयारी मार्ग, ससाणे नगर, हिंगणे मळा, काळेपडळ, महंमदवाडी, कृष्णा नगर, अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समिती, मांजरी रेल्वे उड्डाणपूल लगत, मांजरी मुंढवा रोड, डीपी रोडवरील स्टेडियम, कुमार पिकासो सोसायटी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साठले आहे. त्यातून प्रवास करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. गोंधळेनगर जवळील गंगानगर स्मशानभूमी जवळ मोठे झाड व विजेचा खांब तुटून पडला आहे.
"सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे काही घरे सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवर पाणी साठले आहे. पुराच्या पाण्यानेही पातळी ओलांडली आहे. धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी राहावे. पालिका, पोलिस, विद्युत, अग्निशमन प्रशासनाला उपाय योजनेच्या सूचना दिलेल्या आहेत. काही धोका जाणवल्यास नागरिकांनी लगेच प्रशासकीय यंत्रणेला माहिती देऊन मदत मागावी.'
"क्षेत्रीय कार्यालयातील सर्व विभागांचे अभियंता, आरोग्यनिरिक्षक यांना परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी व्यवस्थापन कक्ष सुरूकेला आहे. त्या नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेटींग मशीन मागविल्या आहेत. उपायुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती हाताळली जात आहे.'
सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.