पुणे - वेळ सकाळी नऊ-दहाची... एकामागोमाग पालक आणि मुले मैदानावर जमली. पालकांनी गोष्टीचे पुस्तक हातात घेतले अन् मोठ्या उत्सुकतेने त्यातील गोष्ट आपल्यासमोर बसलेल्या मुलांना वाचून दाखविली. याप्रकारे एकाच वेळी तीन ते पाच मिनिटे एकत्रित पुस्तक वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ उपक्रमात तब्बल तीन हजार ६६ पालक सहभागी होते. पालक आणि विद्यार्थ्यांच्या साक्षीने भारताने चीनचा विश्वविक्रम मोडून नवा विश्वविक्रम नोंदविला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त पुणे महापालिकेने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ उपक्रम गुरुवारी (ता. १४) आयोजित केला होता. उपक्रमाच्या विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर ढोल-ताशांचा गजर आणि देशभक्तीपर गीते सादर करून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास तीन हजारांहून अधिक पालक आणि पाल्य मैदानावर आले होते. पालकांनी पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या ‘निसर्गाचा नाश करू नका’ पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले. त्यानंतर मैदानावर जल्लोष झाला.
उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. प्राजक्ता माळी यांनी मुले-मुली आणि पालकांना वाचन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला. डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
चीनचा रेकॉर्ड मोडला...
‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ उपक्रमाचा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर गुरुवारी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर तीन हजार ६६ पालकांनी एकत्रित येत, पाल्यांना गोष्ट वाचून चीनचा विक्रम मोडीत काढून नवा विश्वविक्रम नोंदविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.