पुणे - शहरात पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.
मॉन्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयात गुरुवारी (ता. ३१) आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच महामेट्रो, टाटा मेट्रो, पी.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, कॅन्टोन्मेंट मंडळ, पी.एम.पी.एम.एल.चे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
शहरात मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे सुरू असल्याने त्याचा राडारोडा रस्त्यावर आहे. तसेच, उड्डाणपुलांची कामे आणि स्मार्ट सिटींतर्गत सुरु असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांच्या उपाययोजनांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.
वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त वॉर्डन -
गटारे, नालेसफाईची कामे गतीने पूर्ण करावीत. गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत. पावसाळी पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यात पडलेला राडारोडा काढून घेण्यात याव्यात. वाहतूक नियमनासाठी पुणे महापालिका, महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेस अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले.
आंबिल ओढा, कोळेवाडी नाला, दळवी नगर चौक, आंबेगाव नाला, जांभूळवाडी नालेसफाईबाबत चर्चा करण्यात आली. पीएमपीएमएल बसेस नादुरुस्त होऊ नयेत, यासाठी दक्षता घ्यावी. वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तत्काळ काढावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नियंत्रण कक्ष तयार करणार
अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय राहावा, यासाठी सर्व स्वायत्त संस्थांच्या कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार आहे. जलद प्रतिसादासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये तातडीने संदेशाचे आदान-प्रदान करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.