येत्या गुरुवारपासून (ता. १८) सकाळ नाट्य महोत्सवाला प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी सादर होणारे नाटक आहे, ‘सारखं काहीतरी होतंय’.
पुणे - संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्त देशमुख अशा तरुण लेखकांचे ताज्या दमाचे भिडणारे लेखन... चंद्रकांत कुलकर्णी, केदार शिंदे, अद्वैत दादरकर या अनुभवी दिग्दर्शकांचे बांधीव आणि कल्पक दिग्दर्शन... आणि प्रशांत दामले, भरत जाधव, वर्षा उसगावकर, कविता मेढेकर अशा प्रस्थापित कलाकारांचा परिपक्व अभिनय... असा सुरेख मेळ जमून येत आहे. आशयघन, सकस आणि खुसखुशीत नाटकांचा असा सुंदर मिलाफ झाला आहे, तो ‘सकाळ नाट्य महोत्सवा’त. एकाच महोत्सवात ही सगळी पर्वणी अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांना मिळणार आहे.
येत्या गुरुवारपासून (ता. १८) या महोत्सवाला प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी सादर होणारे नाटक आहे, ‘सारखं काहीतरी होतंय’. या नाटकाच्या निमित्ताने प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर ही जोडी तब्बल ३६ वर्षांनंतर एकत्र आली आहे. दोन पिढ्यांच्या विचारांतील तफावत आणि त्यातील गमतीजमती उलगडणारे हे नाटक प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडते. युवा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने हे नाटक लिहिले असून त्यानेच दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे.
शुक्रवारी (ता. १९) ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सादर होणार आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’ या प्रचंड गाजलेल्या नाटकाचा हा पुढचा भाग आहे. प्रशांत दामले आणि कविता मेढेकेर यांची ‘मन्या आणि मनी’ची लोकप्रिय जोडी या नाटकात पुन्हा एकदा एकत्र आली आहे. अद्वैत दादरकर यांनी या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. शनिवारी (ता. २०) ‘संगीत देवबाभळी’ हे मराठी रंगभूमीला नवी झळाळी प्राप्त करून देणारे नाटक सादर होणार आहे. पाच वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या संगीत नाटकाने पुरस्कारांची लयलूट करत नवनवे विक्रम तर रचलेच, पण रसिकांसह नाट्य-चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या पसंतीची पावतीही मिळवली.
प्राजक्त देशमुख या तरुण लेखक-दिग्दर्शकाचे हे नाटक असून शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी नाटकातील दोन भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, या नाटकाचे हे शेवटचे काही प्रयोग असून त्यानंतर त्याचे प्रयोग थांबणार आहेत. त्यामुळे आजवर हे नाटक न पाहिलेल्या रसिकांसाठी आणि ज्यांनी पाहिले आहे, त्यांना हे नाटक पुन्हा अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
महोत्सवात रविवारी (ता. २१) ‘नियम व अटी लागू’ या नव्याकोऱ्या आणि खुसखुशीत नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. आशयाचा ‘नियम’ आणि मनोरंजनाची ‘अट’ पाळणारे हे नाटक मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय तरुण जोडप्यांच्या समस्यांवर बोट ठेवत मार्मिक भाष्य तर करतेच, त्यासोबतच रसिकांचे पुरेपूर मनोरंजनही करते. नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडे याचे आणि दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे आहे. संकर्षण कऱ्हाडेसह अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे यांनी अभिनय केला आहे.
अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. २२) ‘तू तू मी मी’ हे ‘सिनेमॅटिक नाटक’ सादर होणार आहे. १९९८ मध्ये रंगभूमीवर आलेले हे नाटक खूप गाजले होते. केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित या नाटकाचे आता पुन्हा प्रयोग केले जात आहेत. प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव या नाटकात प्रमुख भूमिकेत असून ते एक नाही तर, तब्बल १४ भूमिका या नाटकात साकारणार आहेत. त्यांच्यासह कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, ऐश्वर्या शिंदे आणि रुचिरा जाधव यांनी या नाटकात काम केले आहे.
कधी रंगणार महोत्सव?
येत्या १८ ते २२ मे दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे दररोज रात्री ९.३० वाजता हा नाट्य महोत्सव रंगणार आहे. विशेष म्हणजे, २० टक्के सवलतीत या नाटकांची तिकिटे उपलब्ध आहेत. ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर तसेच बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे या महोत्सवाच्या तिकिटांची विक्री सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.