शिरूर - पावसाने ताण दिल्याने शिरूर तालुक्यातील ओढे नाले कोरडे पडले असून, अनेक गावांतील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. खरिपाच्या बहुतांश पेरण्या वाया गेल्या असतानाच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. दोन गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावे लागले असून, ऐन पावसाळ्यात आजपासून इतर काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी ११ टॅंकर सुरू केले आहेत.
शिरूर तालुक्यात जूनच्या सुरुवातीला काहीशी समाधानकारक हजेरी लावलेला पाऊस नंतर मात्र गायब झाला. तुरळक सरींनी जमिनीत ओल टिकत नसल्याने खरिपातील बाजरी व मुगाची उगवण झालेली रोपे कोमेजून चालली आहेत.
केंदूर, पाबळ, खैरेवाडी, शास्ताबाद या दुष्काळी पट्ट्यातील गावांबरोबरच बागायती पट्टा समजल्या जाणाऱ्या पूर्व भागातील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, कोळगाव डोळस, निर्वी या गावांमध्ये तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जनावरांना दूर नदीवर नेऊन पाणी पाजावे लागत आहे.
परंतु, या भागातील इनामगाव, शिरसगाव येथील घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे पडले आहेत. नदीपात्रातील डबक्यात साठलेले काहीसे दूषित पाणी जनावरांना पाजावे लागत आहे.
पावसाने ओढ दिल्याने अनेक गावांत पिण्याच्या प्रश्न उभा राहिल्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने विविध गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी बुधवारपासून ११ टॅंकर तैनात केले. केंदूर गावची लोकसंख्या आठ हजार ७१० असून, या गावच्या १४ वस्त्या आहेत. त्याकरिता चार टॅंकरच्या प्रत्येकी तीन खेपा होणार आहेत.
नऊ हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या पाबळसाठी सहा टॅंकरच्या चार खेपा; तर एक हजार २६० लोकसंख्या असलेल्या खैरेवाडीसाठी एक टॅंकर दोन खेपांद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. या टॅंकरमधून गावातील सार्वजनिक विहिरींमध्ये पाणी टाकले जाणार असल्याची माहिती पंचायत समितीतील पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली. शास्ताबाद, चिंचोली मोराची व हिवरे कुंभार येथे यापूर्वीच टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला.
या व्यतिरिक्त रांजणगाव गणपती, कान्हूर मेसाई, कोंढापुरी या मोठ्या गावांमध्येही पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, या गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे स्रोतच आटल्याने पाणीयोजना बंद पडल्या आहेत. इतर पर्यायी योजनांतून पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, ते अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
मूग हे खरीप हंगामातील मुख्य नगदी पीक असून, बहुतांश क्षेत्रात पाऊस व पाण्याअभावी किरकोळ उगवण झाली आहे. नेहमीच्या तुलनेत वीस टक्केसुद्धा मूग हाती लागेल की नाही, याबद्दल शेतकरी वर्गातून साशंकता व्यक्त केली जात आहे. शिरूर तालुक्यात खरीप बाजरीचे वीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र असताना यंदा केवळ चार हजाराच्या आसपास हेक्टरवरच पेरणी झाली असून, येत्या महिनाअखेरपर्यंत पाऊस न झाल्यास उरली-सुरली बाजरी सुद्धा हाती लागेल की नाही, ही शंका आहे.
भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर, नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. भोर तालुक्याच्या नीरा-देवघर धरण खोऱ्यात पावसाचा सर्वाधिक जोर आहे. या वर्षी आतापर्यंत नीरा-देवघर खोऱ्यातील नीरा नदीचा उगम असलेल्या शिरगाव येथे १ हजार ७१० मि.मी. पाऊस पडला.
त्याखालोखाल शिरवली येथे १ हजार ५९३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भाटघर धरण खोऱ्यातील भूतोंडे येथे १ हजार ५९० मि.मी.; तर पांगारी येथे १ हजार ३६६ मि.मी. पाऊस झाला. मंगळवारी (ता. १८) दुपारी भोर शहरातून भोलावडे गावाला जोडणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. भाटघर धरण ३६.१३ टक्के; तर नीरा-देवघर धरण ३३.२७ टक्के भरले आहे.
भोर तालुक्यातील महसूल विभागाच्या मंडलांच्या ठिकाणी सोमवारी (ता. १८) दुपारपासून ते मंगळवारी (ता. १९) सकाळी सहा वाजेपर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- भोर (१७ मि.मी.), भोलावडे (३७ मि.मी.), संगमनेर (२७ मि.मी.), किकवी (८ मि.मी.),नसरापूर (१३ मि.मी.), आंबवडे ५० मि.मी.), वेळू (६ मि.मी.) आणि निगुडघर (५६ मि.मी.).
अवर्षणप्रवण क्षेत्रामुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण मुळातच कमी आहे. परंतु, यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तथापि पावसाने ओढ दिल्याने विहिरींची पातळी खोल गेली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ११ टॅंकर सुरू केले आहेत.
— महेश डोके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरूर
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने मुळातच पेरण्या कमी झाल्या होत्या. बाजरीचे क्षेत्र प्रमाणापेक्षा अधिक घटले असून, बाजरी व मुगाची सरासरी २५ टक्केच पेरणी झाली आहे. मुगाच्या पेरण्या वाया गेल्या असून, बाजरी काही प्रमाणात हाती लागू शकते.
— सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.