राहुल देशपांडे Sakal
पुणे

राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप

राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाने आज १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाने आज १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप झाला. तर पूर्वार्धात निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवादनाने पुणेकरांनी ढोलकीच्या तालावर ठेका धरला. डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या वतीने आणि गोखले कन्सट्रक्शन्सच्या सहकार्याने स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा येथे यावर्षीच्या वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

वसंतोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध ढोलकीवादक निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या एकल ढोलकीवादन व ढोलकी जुगलबंदीने झाली. त्यांच्या ढोलकीने आज पुणेकर रसिकांच्या काळजाचा ठेका चुकवत त्यांना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडले.

एका कार्यक्रमात वडील पांडुरंग घोटकर आणि मी एकत्र ढोलकी वाजवत असताना आपल्याला महाराष्ट्राची ढोलकी आवडते, तुम्ही मला ती द्याल का, असे प्रसिद्ध कथकगुरू पं. बिरजू महाराज यांनी विचारले असता वडिलांनी उत्कृष्ट ढोलकी त्यांना भेट म्हणून दिली अशी आठवण सांगत कृष्णा घोटकर मुसळे यांनी पं बिरजू महाराज यांना काही गत, तुकडे सादर करीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

'घर आया मेरा परदेसी...', ' इन्ही लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा', ' चूप चूप खडे हो जरूर कोई बात है...' या हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतांपासून 'वाजले की बारा' या लावणी पर्यंत अनेक गाण्यांचे ढोलकीवर सादरीकरण या दोघांनी केले आणि पुणेकरांनी शिटी आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना साथ दिली. त्यांना सत्यजीत प्रभू यांनी की बोर्ड तर अमर ओक यांनी बासरीवर साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

यानंतर अनुप जलोटा यांचा भजन, गझल व सदाबहार गीते यांचा कार्यक्रम झाला. 'ऐसी लागी लगन...' या गीताने त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ' बोलो राम...', ' राधा का भी श्याम, मीरा कभी श्याम...' , ' चाहे कृष्ण कहो या राम...', ' गोविंद जय जय, गोपाल जय जय... ' ही भजने सादर केली. 'आज जाने की जिद ना करो... या गझलने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना पियूष पवार (संतूर), हिमांशू तिवारी (गिटार), देवेंद्र भरती (तबला), लीना बोस व भूषण तोष्णीवाल (स्वरसाथ) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाची सांगता राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग शंकरामध्ये विलंबित एकतालातील ' सो जानू रे जानू ...' ही दृत बंदिश सादर केली.

मी राग शंकरा गावा अशी माझ्या वडिलांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. १९९० साली आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांच्या पुण्यतिथीला कुमार गंधर्व काकांचा राग शंकरा मी ऐकला होता. त्यानंतर अनेक वर्ष मला फक्त त्यांच्या सारखा सूर लावायचा होता, फक्त त्यांच्यासारखं गायचं होतं. मी ते केलही, मात्र एका वयात दुसऱ्याची गोष्ट आपण मिरवू शकत नाही हे लक्षात आलं असं सांगत राहुल देशपांडे यांनी कुमार गंधर्व आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी सांगितल्या.

ते म्हणाले, "मी आजोबा आणि कुमार गंधर्व यांमध्ये कधीच फरक केला नाही. त्या दोघांचे एकमेकांवर निरातिशय प्रेम होते. नात्या पलीकडचे हे ऋणानुबंध होते. कुमारकाका घरी आजोबांना भेटायला यायचे तेव्हा आजोबा दारात त्यांना साष्टांग लोटांगण घालायचे. या दोघांचं नातं हे प्रेमाचं होतं गुरूशिष्याच देखील होते.दोघांची शैली वेगळी असली, मांडणी वेगळी असली तरीही मूल्ये तीच होती.''

आजही माझ्याकडे कुमार गंधर्वांची ५० ते ६० पत्र आहेत. मी ही नवी गोष्ट केलीये, तुला कधी ऐकवतोय असं झालंय हेच या सगळ्या पत्रात ते आजोबांना सांगत आहेत. यावरून या दोघांचे नाते उलगडते, असेही ते म्हणाले.

मी अनेक मैफलीत शास्त्रीय गातो मात्र वसंतोत्सवात गायचं मला नेहमीच दडपण येतं मात्र त्यावर मात करत माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेर जात मी या महोत्सवात गात असतो, असेही राहुल देशपांडे यांनी आवर्जून नमूद केले.

आपले आजोबा पं वसंतराव देशपांडे यांची ' ए री सखी, कल ना परे...' ही ठुमरी त्यांनी यानंतर सादर केली. मला नाट्यगीते गायला आवडतात असे सांगत राहुल देशपांडे यांनी मानापमान नाटकातले 'रवी मी...' हे नाट्यपद गायले. गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेलं आणि राहुल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेले 'मी वसंतराव' या चित्रपटातील ' कंठात आर्त ओळी डोळ्यांत प्राण आले...' हे निर्गुणी भजन गात त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या भैरवीने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप झाला.

राहुल देशपांडे यांना निखिल फाटक (तबला), डॉ केशवचैतन्य कुंटे (संवादिनी), नारायण खिलारी, जिग्नेश वझे (तानपुरा) तर डॉ निमिष उत्पात यांनी स्वरसाथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT