पुणे - पाणी बचतीसाठी महापालिकेने गुरुवारी पाणी बंद ठेवले, त्यात परत रात्रभर अनेक भागातील बत्ती गुल झाल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला. पाण्याच्या टाक्या भरण्यास उशीर झाल्याने शुक्रवारी (ता. १९) सकाळी नागरिकांना वेळेत पाणी मिळाले नाहीच. पण ज्यांना मिळाले त्यासाठी पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने भर उन्हाळ्यात पाण्यासाठी हैराण झाली.
खडकवासला धरणातील पाणी साठा कमी झाल्याने व पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने महापालिकेने दर गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीचा हा पहिलाच गुरुवार (ता. १८) होता. पाणी बंद ठेवल्याने दुसऱ्या दिवशी शहराच्या विविध भागात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. कमी दाबामुळे अनेक भागात पाणीच जात नाही. हा त्रास कमी व्हावा यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या होत्या.
जलवाहिनीतील हवा काढण्यासाठी २० ठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले. जलकेंद्राच्या टाक्या नेहमीपेक्षा दोन तास आधीच भरणे सुरू करून जलवाहिनीत पाणी सोडले जाणार होते. त्यामुळे पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता होती. मात्र, गुरुवारी रात्री वीज वितरणाच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने अनेक भागातील वीज गेली होती. पहाटे वीज आल्यानंतर टाक्यांमध्ये पाणी भरणे सुरू केले. त्याचा ही परिणाम महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर झाला. येरवडा, खराडी, बाणेर, बालेवाडी, नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ या परिसराच्या भागात शुक्रवारी पाणी आले नाही. वडगाव जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या कात्रज, गोकुळनगर व लगतच्या परिसरातही शुक्रवारी कमी पाणीपुरवठा झाला.
महापालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे हिंगणे होम, वारजे परिसरातील तक्रारी कमी झाल्या, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता, पुलाची वाडी, कॅम्पचा काही भाग, हडपसर येथील ओरायन पार्क सोसायटी परिसर, चुडामण तालीम परिसर, कात्रज, गोकुळनगर, पटवर्धन बाग, मदर टेरेसा नगर येरवडा, आकाशवाणी हडपसर आदी परिसराच्या काही भागातून पाणी पुरवठ्याविषयी तक्रारी आल्या.
‘वीज पुरवठा खंडित होणे व कमी दाबाने पाणी येणे यामुळे नागरिकांच्या तक्रारी आल्या. ८० टक्के भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. ज्या भागात पाणी कमी आले आहे, तेथे टँकर पाठवून, एअर वॉल्व्हचा वापर करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.’
- अनिरुद्ध पावसकर, विभाग प्रमुख, पाणी पुरवठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.