पुणे - आमचीदेखील शंभर वर्षे जुनी मंडळे आहेत. सामाजिक, ऐतिहासिक आणि समाज प्रबोधनपर देखावे आम्हीही सादर करतो. परंतु, देखावे पाहण्यासाठी नागरिक येणार नसतील, तर काय उपयोग? पूर्व भागातील गणेशोत्सव केवळ पोलिसांच्या हेकेखोरपणा व चुकीच्या नियोजनामुळे संपुष्टात येत असल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. पूर्व भागावरील अन्याय कधी दूर होणार? असा सवालही त्यांनी केला.
शहराच्या मध्यवर्ती भागात १८ पेठांचा परिसर आहे. त्यापैकी बहुतांश पेठांचा भाग शहराच्या पूर्व भागात मोडतो. या भागात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव मंडळे आहेत. सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनपर देखावे सादर करणारे अनेक नामवंत मंडळे पेठांच्या परिसरात आहेत.
काही मंडळांना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास आहे. अशा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’मध्ये आयोजित बैठकीत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. दरवर्षी पोलिसांकडे होणाऱ्या बैठकीत याकडे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांपासून उत्सवात गर्दीच्या काळात पोलिसांकडून शिवाजी रस्ता बंद केला जातो. भाविकांना लाल महालापासून थेट मंडईपर्यंत नाइलाजास्तव सरळ जाणे भाग पडते. सिटी पोस्ट (बेलबाग चौक) चौकातून लक्ष्मी रस्त्यावरच्या वरील बाजूस अथवा सोन्या मारुती चौकाकडे (खालील बाजूस) जाण्यासाठी पोलिसांकडून अडथळे टाकून बंदी घातली जाते.
त्यामुळे पूर्व भागात जाण्यासाठी नागरिकांना बुधवार पेठेतून जावे लागते. अशीच परिस्थिती लक्ष्मी रस्त्यावरून बेलबाग चौकाकडे जाण्यासाठी बंदी घातली जाते. त्यामुळे नागरिकांना श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे येण्यासाठी मोठा वळसा घालून यावे लागते.
शनिपार चौकातून मंडई अथवा अप्पा बळवंत चौकातून मजूर अड्डा चौकाचा पर्याय ठेवला जातो. परिणामी पूर्व भागात जाण्यासाठी कोणताही सोईचा मार्ग नसल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागरिकही या भागाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे या भागातील गणेशोत्सवाला उतरती कळा येऊ लागली आहे, अशी तळमळ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
‘पर्यायी मार्ग उपलब्ध करावा’
पूर्व भागातील मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी नागरिकांना सोईचे व्हावे, असे नियोजन पोलिसांनी करावे.
त्यासाठी सरसकट शिवाजी रस्त्यावर अडथळे न घालता काही ठिकाणांहून पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावे, अशा पद्धतीने विचार करून नियोजन करावे. जेणेकरून पूर्व भागातील गणेशोत्सव मंडळांची शंभर वर्षांहून अधिक काळ असलेली परंपरा कायम राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.