पुणे - ‘‘एका ग्रामीण भागातून येऊन ३६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळता येणार आहे, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेत मी नक्कीच चांगली कामगिरी करेन,’’ असा विश्वास ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेते तथा अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांनी व्यक्त केला.
चौधरी हे मूळ जळगाव जिल्ह्यातील सायगावचे (ता. चाळीसगाव) सुपुत्र. सध्या ते पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहेत. कॅनडातील विनिपेग शहरात २८ जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या ‘वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम’ स्पर्धेत कुस्ती गटात ते देशाचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत.
स्पर्धेविषयी...
‘वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम’ स्पर्धा दोन वर्षांनी होते. यात विविध देशांतील पोलिस सहभागी होतात. ऑलिंपिक आणि कॉमनवेल्थनंतर या स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू भाग घेतात.
नोव्हेंबर २०२२ मध्ये वानवडी येथे अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा झाली, त्यात हरियाना, पंजाब व जम्मू-काश्मीरच्या कुस्तीपटूंना अस्मान दाखवत त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच वेळी माझी या स्पर्धेसाठी निवड झाली होती. तेव्हापासून माझा सराव सुरू आहे.
असा आहे दैनंदिन सराव
चौधरी यांचा कात्रजमधील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात तीन ते चार महिन्यांपासून सराव सुरू आहे. परदेशी खेळाडूंचे व्हिडिओ बघून ते सराव करतात. शिवाय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे दैनंदिन कामकाजातून सरावासाठी सवलत मिळाली आहे. तसेच आधीपासून प्रशिक्षक असलेले हिंद केसरी विजेते रोहित पटेल यांच्याकडून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
कुटुंबीयांना आनंद
या स्पर्धेसाठी निवड झाल्याचे जेव्हा घरी कळाले, तेव्हा वडील पहिलवान नथू चौधरी यांना खूप आनंद झाला. प्रामाणिकपणे कष्ट केल्याचे हे फळ आहे, असे त्यांचे वडील म्हणाले. विजय चौधरी हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी कुस्तीला सुरुवात केली. ‘‘राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा खेळलो; पण आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो नव्हतो. या स्पर्धेच्या निमित्ताने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे,’’ असे चौधरी म्हणाले.
एकतिसाव्या वर्षी मला पोलिस खात्यात नोकरी मिळाली; पण माझ्या दैनंदिन सरावात खंड पडला नाही. कोरोना काळात अनेक अडचणी आल्या, त्यावर मात करत सराव सुरू ठेवला. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते आहे, हे सर्व त्याचेच फलित आहे.
-विजय चौधरी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी, तथा अपर पोलिस अधीक्षक
‘हिंद केसरी’चे लक्ष्य!
गतवर्षी दोनच स्पर्धा खेळलो. हैदराबाद येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिल्लीच्या कुस्तीपटूशी खेळताना पराभव झाला.
त्यामुळे आगामी काळात हिंद केसरी हा मानाचा किताब जिंकण्याचा माझा मानस आहे. जोपर्यंत अंगात मेहनत करायची क्षमता आहे, तोपर्यंत मी कुस्ती खेळून पोलिस दलाचे नावलौकिक करणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.