किरकटवाडी (पुणे) : पुणे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका मुख्याध्यापिकेने कर्जासाठी तारण ठेवलेली सदनिका आणि शेतजमीन परस्पर विकून सिंहगड रस्त्यावरील नांदेड येथील रामेश्वर पतसंस्थेची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात संबंधित मुख्याध्यापिका आणि त्यांच्या पती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आशालता गोकुळ कटके आणि गोकुळ नामदेव कटके (दोघेही रा. कटकेवाडी ता. पुरंदर जि. पुणे) अशी या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून पतसंस्थेच्या वतीने महेश प्रफुल्ल बागडे यांनी फिर्याद दिली आहे. धक्कादायक म्हणजे आशालता कटके या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे अधिक माहिती अशी की, 2017 साली आशालता कटके आणि त्यांचे पती गोकुळ कटके यांनी जयप्रकाश नारायण नगर, नांदेड, ता. हवेली येथील रामेश्वर पतसंस्थेत कर्जासाठी अर्ज केला होता. त्यासाठी बाणेर येथील वीरभद्र नगरमधील एका इमारतीतील सदनिका आणि मौजे आंबळे, ता. पुरंदर येथील गट नं. 721 मधील शेतजमीन तारण ठेवल्यानंतर पतसंस्थेने 18 लाख रुपये कर्ज मंजूर केले. वेळेवर हप्ते न भरल्याने सद्यस्थितीत आशालता कटके आणि गोकुळ कटके हे मुद्दल आणि व्याज मिळून एकूण 25 लाख रुपये रामेश्वर पतसंस्थेचे देणे लागत आहेत.
पतसंस्थेचे हप्ते थकल्याने वसुली पथक तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या ठिकाणी गेले असता अनेक दिवसांपूर्वीच त्या मालमत्ता परस्पर इतरांना विकण्यात आल्याचे व त्यांच्या खरेदी-विक्रीचे नोंदणीकृत दस्तही झाल्याचे वसुली पथकाच्या निदर्शनास आले. पतसंस्थेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधीत मुख्याध्यापिका आणि त्यांच्या पती विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.