वाघोली (पुणे) : वाघोली परिसरामध्ये मास्क न वापरणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 200 जणांवर लोणीकंद पोलीस व ग्रामपंचायत यांनी कारवाई केली. एका दिवसातील ही कारवाई आहे. त्यामुळे नागरिकानों जरा भान ठेवून आपली व दुसऱ्याची काळजी घ्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. वाघोली गावच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून गुरुवार पासून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पोलीस व ग्रामपंचायत यांनी कडक कारवाई सुरू केली आहे. या पूर्वीही 400 पेक्षा अधिक जणांवर मास्क न वापरल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
गुरुवारी दिवसभरात 200 जणांवर कारवाई करण्यात आली. तरीही नागरिक सुधारण्याचे नाव घेत नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरही बंदी आहे. मात्र, तरी नागरिक थुंकतात. सामाजिक अंतर पाळणे सुरक्षित असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. सध्या वाघोलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 87 वर गेला आहे. त्यातील 25 रुग्ण ठणठणीत बरे झाले असले तरी 62 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. हवेली तालुक्यातील रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनाला 20 गावे पूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावी लागली. मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे असा बेफिकीरपणा नागरिक करीत आहेत.
आपल्यासह दुसऱ्यांची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र, बेफिकीरपणा होत असल्यानेच कारवाई करण्याची गरज पडते. प्रत्येकाने आता स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे. सॅनिटायझर, मास्क, सामाजिक अंतर पाळले पाहिजे.
- प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे.
वाघोलीतील वाढती रुग्ण संख्या बघता प्रत्येकाने शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे. आपल्या सुरक्षितेतसाठीच हा आटापिटा आहे. या संकटातून लवकर बाहेर पडायचे असल्यास सूचना काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत.
- अनिल कुंभार, ग्रामविकास अधिकारी. व वसुंधरा उबाळे, सरपंच, वाघोली.
.
मागील तीन दिवसांपासून पोलिस व ग्रामपंचायतीचे कर्मचारी विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. दुकानदारांकडून 500 रुपये तर नागरिकांकडून 100 रुपये प्रत्येकी दंड वसूल करण्यात आला आहे. वाघोलीतील दुकानदार व नागरिकांनी मास्क घातल्याशिवाय बाहेर फिरू नये अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते असे आवाहन प्रशासनाच्या करण्यात आले आहे.
भाजी विक्रेत्यांकडून होतोय हलगर्जीपणा
वाघोलीत भाजी विक्रेत्यांची संख्या भरपूर आहे. लॉकडाउनमध्ये या संख्येत अजून वाढ झाली आहे. बहुतांश भाजी विक्रेते मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. काही ग्राहकही विना मास्क त्यांच्याकडे खरेदीला जातात. याबाबत वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत मास्क वापराकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन केले आहे. ग्राहकांनी ही खरेदीला जाताना विना मास्क जाऊ नये तसेच दुकानदार अथवा भाजी विक्रेते यांना मास्क घालण्याची विनंती करावी नंतरच खरेदी करावी. असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ नागसेन लोखंडे यांनी केले आहे.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दी न करणे, गर्दीत जाणे टाळणे, सहा फुटाचे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या बाबींचे काटेकोर पालन केल्यास कोरोना आपणापासून दूर राहील.
-डॉ. वर्षा गायकवाड, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली.
Edited by- Gayatri Tandale
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.