पुणे - महापालिका प्रशासन ‘पावसाळापूर्व कामे’ या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करते. पण पहिल्याच पावसात शहराची दैना होते. गटारांची साफसफाई केली असा दावा केला जात असला, तरी रस्त्यांच्या बाजूला खरंच गटारे आहेत का? असा प्रश्न पडावा अशी संतापजनक स्थिती आहे.
रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा का होत नाही, याची कारणे शोधण्याचा प्रयत्नही कोणी करत नाही. शेवटी ‘यंदा सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस झाला’ असे पावसावरच खापर फोडून अधिकारी जबाबदारी झटकतात. यंदाही असेच झाले. त्यामुळे कोट्यवधींचा निधी मुरतो कोठे, हा प्रश्न निरुत्तरितच राहतो.
गटारे पाण्यासाठी की केबलसाठी?
जुन्या हद्दीतील रस्त्यांची एकूण लांबी १४०० किलोमीटर आणि त्यावर पावसाळी गटारे केवळ २६८ किलोमीटर लांबीची आहेत. समाविष्ट ३४ गावांमध्ये तर पावसाळी गटारांचा पत्ताच नाही अशी स्थिती आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अपुरी व्यवस्था असताना दुसरीकडे त्यांची व्यवस्थित साफसफाई न करणे, ओएफसी केबल टाकून गटार बंद करणे यामुळे पुणे तुंबत आहे. महापालिका प्रशासनाने या केबल तोडल्यानंतर आता या कंपन्यांकडून पुन्हा केबल टाकल्या जात आहेत.
टिळक चौक, डेक्कन जिमखाना परिसर, नळ स्टॉप, कर्वे पुतळा, गुंजन टॉकीज, जेधे चौक स्वारगेट, स. प. महाविद्यालय चौक, फिनिक्स मॉल विमाननगर, कोथरूड कचरा डेपो, गणेशखिंड रस्ता, बाणेर रस्ता, सिंहगड रस्ता, पानमळा, पु. ल. देशपांडे उद्यान, माणिकबाग, शेलारमामा चौक घोले रस्ता, दीप बंगला चौक, राजाराम पूल, महेश सोसायटी चौक, नीलायम टॉकीज चौक, सोपानबाग वानवडी, भारत फोर्ज, लुल्लानगर, टिंबर मार्केट, लोहिया नगर यासह हडपसर, कोंढवा, मुंढवा भागात अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे.
या भागातील २६८ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची, चेंबरची स्वच्छता करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. संबंधित ठेकेदार एकदाच स्वच्छता करतात, त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. मलनिस्सारण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालये यांच्यात समन्वय नसल्याने ही कामे व्यवस्थित होत नाहीत.
शहरात इंटरनेटसाठी ओएफसी केबल टाकण्यासाठी महापालिकेने कंपन्यांना परवानगी दिलेली आहे. त्यासाठी त्यांना खोदाई शुल्क भरावे लागते. मात्र पावसाळी गटारांच्या पाइपमधून केबल टाकण्यात आल्या आहेत. सिंहगड रस्त्यावर एकाच वेळी १० ते १५ केबल स्वतंत्रपणे टाकल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचत आहे. अशा प्रकारे संपूर्ण शहरात ओएफसी केबल टाकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान महापालिकेने केबल तोडल्यानंतर अवघ्या काही वेळातच या केबल जोडण्यासाठी कंपन्यांचे कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले.
का असं होतं?
ओढे-नाल्याची सफाई वेळेवर नाही
सफाईचा ठेका दिला जातो, परंतु देखरेख होत नाही
अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, कारवाई नाही
राडारोडा टाकण्याचे प्रमाण अधिक
सीमाभिंतीच्या कामाचा दर्जा चांगला नाही, अनेक ठिकाणी अर्धवट कामे
शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर नाले-ओढे वळविण्याचे प्रकार
उपाययोजना
नाले- ओढ्यावरील अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई अपेक्षित
वर्षातून किमान दोन वेळा साफसफाई
सीमाभिंत उभारणे आवश्यक
अरुंद नाले रुंद आणि खोल करणे आवश्यक
राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई अपेक्षित
मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागांत पाणी तुंबले होते. नागरिकांना वेळेवर मदत मिळणे आवश्यक आहे, त्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयासह मुख्य विभागाला समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळा संपेपर्यंत ठेकेदाराकडून वारंवार नालेसफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता केली जाईल. पावसाळी गटारात ओएफसी केबल टाकणाऱ्यांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका
रस्तेबांधणीतच चूक!
सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हे करताना रस्त्याचा उतार, पावसाळी गटारांची बांधणी आणि पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक नियमांना धाब्यावर बसविण्यात आले आहे. प्रशासनाने रस्ता आणि ड्रेनेज बांधणीत केलेल्या चुकांमुळे पुणेकरांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
वर्षानुवर्षे पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, अलीकडच्या काळात क्षणार्धात रस्ते जलमय होत असून काही ठिकाणी अक्षरशः ओढ्यांचे स्वरूप प्राप्त होत आहे. यासाठी नगररचना मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. त्यातही रस्त्यांच्या बांधणीत अक्षम्य चुका झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नगररचना विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रदीप रावळ सांगतात, ‘शहरातील बहुतेक रस्त्यांचे उतार विचारात न घेता बांधकाम झाले आहे. पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांच्या बांधकामात त्रुटी असल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचत आहे. पदपथांचे रुंदीकरण करताना किंवा रस्त्याची डागडुजी करताना पावसाळी गटारांकडे दुर्लक्ष होत आहे.
शहराला एक अर्बन ड्रेनेज प्लॅनिंग करणाऱ्या माणसाची गरज असून, रस्त्यांचे बांधकाम करताना पाण्याच्या निचऱ्यासंबंधी काळजी घ्यायला हवी.’’ स्थानिक स्तरावरील उताराचा विचार करून पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. तसे केल्यावरच पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, असे मत डॉ. रावळ यांनी व्यक्त केले.
तातडीच्या उपाययोजना
सर्व रस्त्यांच्या उतारांचा अभ्यास करत पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक बदल करणे
पावसाळी गटारांची बांधणी व रस्त्यावरील जाळीची तपासणी करणे
जिथे पाणी साचते तेथेच पावसाळी गटारांचे झाकण हवे. बुजलेली झाकणे उघडी करणे
नेहमी पाणी साचणाऱ्या जागेसाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करत उपाय शोधणे
नवीन रस्ते बांधताना पावसाळी ड्रेनेजची शास्त्रीय बांधणी करणे
आवश्यक तेथेच रस्ता सिमेंटचा करणे
सोसायट्यांत रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी उपाययोजना करणे
अजूनही उपाययोजना शक्य
नेहमी पाणी साचणाऱ्या भागाची पाहणी करत, स्थानिक गरजेनुसार उपाययोजना करता येतील. सर्वांत प्रथम जिकडे उतार आहे त्या बाजूला पावसाळी गटारांत पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करणे. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे झाकण रस्त्याच्या वर आहे, ते रस्त्याच्या बरोबर आणणे. गटारात साठलेला कचरा काढणे, ती मोठे करणे आदी उपाययोजना करता येतील. पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक रेन गार्डनही उभारता येतील, अशी माहिती डॉ. रावळ यांनी दिली.
भीतीच्या सावटाखाली जगावं लागतंय
पा वसाळा आला की सर्वांत जास्त भीती बसते, ती शहरातील नाले आणि ओढ्याच्या काठी असलेल्या सोसायट्या व वस्त्यांमधील नागरिकांना. ओढ्या-नाल्याला पूर येईल. भिंत कोसळेल आणि घरात पाणी शिरेल, या भीतीने जीव मुठीत धरून चार महिने काढावे लागतात. मेट्रोसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता दर पावसाळ्यात पुणेकरांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे.
चार वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याबरोबरच नागझरी नाला आणि भैरोबा नाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागाला दणका दिला. या तिन्ही नाल्यांना पूर आल्याने त्यांच्या काठाने राहणाऱ्या वस्त्या आणि सोसायट्यांचे अतोनात नुकसान केले. मागील आठवड्यात हीच परिस्थिती झाली. प्रचंड पाऊस झाला आणि वडगाव शेरी, कळस, धानोरी, आंबेगाव बुद्रुक, चव्हाणनगर आदी उपनगराच्या भागात अनेक सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरले.
चव्हाणनगरमधील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्याने घरात अडकलेल्या तीन लोकांचे जीव वाचले. परंतु गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात कोणत्या ना कोणत्या भागाला फटका बसतो. पाणी शिरते आणि नागरिकांचे अतोनात नुकसान होते. मागील अनुभव पाहता, महापालिका त्यांच्या कारभारात सुधारणा करण्यास तयार नाही.
कुठे बसतो फटका
पुणे शहरात सहा प्रमुख ओढे-नाले आहेत. त्यामध्ये आंबिल ओढा, भैरोबा नाला, माणिक नाला आणि नागझरी नाला हे प्रमुख नाले शहराच्या मध्यवर्ती भागातून जातात. या तिन्ही नाल्यांच्या कडेने असलेली वस्ती देखील खूप मोठी आहे. २५ सप्टेंबर २०१९मध्ये आंबिल ओढ्याला आलेल्या पुराने हाहाकार माजविला. तर १५ ऑक्टोबर २०२०च्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने या ओढ्याबरोबरच भैरोबा आणि नागझरी नाल्यांनी मध्यवस्तीतील नागरिकांना दणका देत आपले अस्तित्व दाखवून दिले होते.
नागझरी नाल्यामुळे मंगळवार पेठ, रविवार, गणेश पेठ परिसरात, तर भैरोबा नाल्यामुळे घोरपडी, वानवडी, विकासनगर, पुणे कॅन्टोमेन्टच्या परिसरातील शिंपी आळी, कुंभारबावडी, भीमपुरा, न्यू मोदी खाना, सोलापूर बाजार आदी परिसराला फटका बसतो. आंबिल ओढ्यामुळे कात्रज, धनकवडी, सहकारनगर, दत्तवाडी आदी भागाला धोका निर्माण होतो. यापूर्वी रामनदीला आलेल्या पुराने बाणेर, बावधन, पाषाण आणि औंध भागाला फटका बसला होता.
ओढ्या-नाल्यांची एकूण संख्या
छोटे-मोठे मिळून सुमारे २४०
मध्यवस्तीतून जाणाऱ्या प्रमुख ओढ्यांची संख्या- एकूण सहा
सर्व नाल्यांची मिळून एकूण लांबी ३४० किलोमीटर
उतार एका बाजूला, अन् चेंबर दुसरीकडेच
शहरात ५७ हजारांपेक्षा जास्त पावसाळी गटारांचे चेंबर आहेत. त्यातून पाण्याचा निचरा होतो. पण महापालिकेचे ठेकेदार, अभियंते चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने अनेक चेंबरमध्ये पावसाचे पाणी जातच नाही. चेंबरच्या झाकणाच्या दिशेने उतार असणे अपेक्षित असताना तेथे चढ असतो, त्यामुळे पावसाचे पाणी दुसऱ्या बाजूने वाहून जाते. तसेच रस्त्याच्या ज्या बाजूने उतार आहे तेथे पावसाळी गटार, चेंबर न टाकता, चढाच्या दिशेने असल्याने पाणी रस्त्यावरच थांबते.
...डोळे उघडले
शहरात काही माजी नगरसेवक हे डक्टमध्ये ओएफसी केबल टाकण्याचे काम कंपन्यांकडून करून घेऊन त्यातून कोट्यवधी रुपये कमावत आहेत. राजकीय वजन वापरून रात्रीच्या वेळी पावसाळी गटारातून केबल टाकून घेतात. त्यामुळे कोणीही आत्तापर्यंत आक्षेप घेतलेला नाही. मात्र, आता शहर तुंबल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले आहेत.
इतकी वर्षे दुर्लक्ष का?
शहरात ओएफसी केबल टाकलेल्या आहेत. महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळी गटारांची स्वच्छता केली जाते त्यावेळी या केबलची अडचण होत असतानाही त्याकडे प्रशासनाने इतके वर्ष का दुर्लक्ष केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेळीच या गोष्टींना मज्जाव केला असता, कंपन्यांना मोठा दंड ठोठावून, गुन्हे दाखल केले असते तर हे प्रकार थांबले असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.