Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपसोबत युती होणार नसल्याचे स्पष्ट केलं. कुणी कुणाला भेटलं म्हणून युती होत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान सिन्नर टोलनाका फोडल्याच्या घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी राज ठाकरे आक्रमक झाले. ते म्हणाले, अमित राज्यभर दौरे करत आहेत, तो प्रत्येक ठिकाणी टोल फोडत चालला असे नाही.
टोल फोडल्यानंतर भाजप नेते टीका करत आहे. यावर राज ठाकरे म्हणाले, "एका टोलनाक्यावर असा प्रकार घडला. फास्टॅग असून अमितला अडवले. यावेळी समोरून एकजण उद्धट बोलत होता. त्यामुळे अॅक्शनला आलेली ती रिअॅक्शन आहे. भाजपने निवडणुकीत टोलमुक्त महाराष्ट्र घोषणा दिली होती. त्याचं पुढे काय झालं?. म्हैसकर कुणाच्या जवळचे आहेत?, त्यांनाच सर्व कंत्राट कसे मिळतात."
"समृद्धी महामार्गाचे उद्घाटन घाईत कशाला केले. समृद्धीवर ४०० लोक गेले, याची जबाबदारी भाजप घेणार का?, महामार्ग सुरू करण्यापूर्वी काळजी का घेतली नाही. रस्ता बनला नाही अन् टोल बनवत आहात. लोक मेले तर मरुद्यात, असं सध्या सुरू आहे", असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील रस्त्यावर खड्डे आहेत अन् तुम्ही कशावर टोल कर कशावर घेता?, यावर भाजप बोलणार का? हे प्रश्न भाजपला विचारले पाहिजेत. १७ वर्ष झाले मुंबई-गोवा रस्त्याचे काम सुरु आहे. १७ वर्ष कोणत्या रस्त्याला लागतात का? रस्त्यावर खड्डे पडले टोल कसले घेताय?, असा आक्रमक सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील टोला लगावला. केंद्रात महामार्गाचा मंत्री मराठी, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातील रस्त्यावर खड्डे आहेत. टोलचे पैसे नेमके कुणाला मिळतात, यावर भाजप काही बोलणार आहे का?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.