पुणे लोकसभा निवडणुकीत कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकांत या मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी ४६ ते ४९ टक्के मते मिळविणाऱ्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून साधारण ५० टक्के मते घेणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीत आघाडी मिळेल, अशी शक्यता आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ५३.१३ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत ४८.७९ टक्के मतदान या मतदारसंघातून झाले होते.
मागील २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे कँटोन्मेंटमधील मतदारांनी भाजपला कौल दिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही बहुतांश मतदारांचा कल भाजपकडे राहिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात तुल्यबळ लढत झाली. त्यामुळे या निवडणुकीत येथील मतदारांचा कौल कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी आणि भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्यात थेट लढत झाली होती. पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एक लाख सात हजार ४२७ इतके मतदान झाले होते. त्यापैकी ५२ हजार ६७१ (४९ टक्के) मते कलमाडी यांना मिळाली होती. तर शिरोळे यांना २५ हजार ५८७ (२३.८० टक्के) मते मिळाली होती.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात एक लाख ३९ हजार ४६४ इतके मतदान झाले होते. त्यापैकी ६३ हजार ७९० (४६ टक्के) मते भाजपचे अनिल शिरोळे यांना मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांना ४९ हजार ८५९ (३६ टक्के) मते मिळाली होती. मनसे, आम आदमी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला १५ टक्के मते घेतली होती. त्यात मनसेचे दीपक पायगुडे यांनी १२ हजार ७१२ (९ टक्के), आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष वारे यांना चार हजार ७०२ (३ टक्के), तर बहुजन समाज पक्षाचे इम्तियाज पिरजादे यांना तीन हजार ९९६ (३ टक्के) मते मिळाली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात एक लाख ३९ हजार २६ मतदान झाले होते. भाजपचे गिरीश बापट यांना ६७ हजार १७७ (४८.३२ टक्के) मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मोहन जोशी यांना ५४ हजार ४४४ (३९.१६ टक्के) मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांनी १४ हजार ६९९ (१०.५७ टक्के) मते मिळवली होती.
महत्त्वाचे असे काही
विद्यमान आमदार भाजपचे असल्याने मताधिक्याची अपेक्षा
मागील दोन लोकसभा निवडणुकांत मतदारसंघाचा भाजपला कौल
२००९ मध्ये काँग्रेसला या भागातून मताधिक्य
मागील विधानसभा निवडणुकीतही मतदारांचा कल भाजपकडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.