पुणे : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन झाल्यास बांधकाम व्यवसायावर त्याचा अनिष्ट परिणाम होईल. थोडं फार सुरू झालेलं रूटीन पुन्हा विस्कळित झालं, तर काहींचे व्यवसायच कायमस्वरूपी बंद पडतील अन् अनेकजण देशोधडीला लागतील. त्यामुळे राज्य सरकारने गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण आणावे परंतु, सरसकट लॉकडाऊनचा अघोरी पर्याय निवडू नये, असा स्पष्ट सूर बांधकाम क्षेत्राने गुरुवारी (ता.२६) व्यक्त केला.
राज्य सरकारमधील काही जबाबदार मंत्र्यांनी लॉकडाऊनचा पुन्हा विचार करण्याचे मत व्यक्त केले आहे. त्याबद्दल उद्योग क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. तसेच व्यापारी आणि दुकानदार संघटनांनीही लॉकडाऊनची पुन्हा अंमलबजावणी करण्यास तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांनीही पुन्हा लॉकडॉऊन राज्य सरकारने करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात मजूर मोठ्या प्रमाणावर गावाकडे परत गेले होते. त्यातील अजून सुमारे 30 टक्के मजूर परतलेले नाहीत. त्यातच सिमेंट, स्टिल यांचा पुरवठा मधल्या काळात विस्कळित झाल्यामुळे त्यांचे दरही वाढले. तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांचा पूर्णत्त्वाचाही कालावधीही लांबला होता. त्याचा फटका ग्राहकांबरोबरच व्यावसायिकांनाही बसला.
लॉकडाउन टप्प्याटप्याने शिथिल झाल्यावर दसरा, दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांचा अनेक प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच घर घेण्यासाठी बॅंका, वित्त संस्थांनीही आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. त्यातच राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात (स्टॅंम्प ड्यूटी) भरघोस सवलत दिल्यामुळेही बांधकाम व्यावसायिकांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन झाल्यास बांधकाम क्षेत्रावर विपरित परिणाम होईल अन् त्याचा फटका थेट ग्राहकांना बसेल, अशी भीती बांधकाम व्यावसायिकांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी, राज्य सरकार लॉकडाऊनचा पुन्हा निर्णय घेईल, असे वाटत नाही. मात्र, लॉकडाऊन झाल्यास केवळ बांधकाम व्यावसायिकांचीच नव्हे, तर अन्य उद्योग- व्यावसायिकांचीही परिस्थिती वाईट होईल. त्यांना रिकव्हर होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्याचा बाजारपेठेवरही अनिष्ट परिणाम होईल.
- सतीश मगर (अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल)
रिअल इस्टेट क्षेत्र म्हणजे मशीन नाही. केव्हाही बटन दाबावे आणि सुरू अथवा बंद करावे. सध्या थोडे चांगले दिवस आले आहेत. ग्राहक साईटवर येऊ लागले आहेत, पण पुन्हा लॉकडाऊन झाला, तर बांधकाम क्षेत्राची अपरिमित हानी होईल. राज्य सरकारला हवं असेल, तर त्यांनी बांधकाम साईटवरील मजुरांची कोरोनाची चाचणी करून घ्यावी. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक नक्कीच सहकार्य करतील.
- सुहास मर्चंट (अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो)
बांधकाम साईटसवर अजूनही पुरेसे मनुष्यबळ नाही. कोरोनाच्या भीतीमुळे कामगार पुन्हा गावी परतले तर परिस्थिती बिकट होईल. त्यातून बांधकाम प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी लांबेल; त्यामुळे ग्राहकांनाही व्याजाचा भुर्दंड पडेल. तर, व्यावसायिकांवरीलही कर्जाचा बोजा वाढेल. मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ दिल्यामुळे या क्षेत्राला दिलासा मिळाला. गर्दी होणार नाही, यासाठी विविध प्रकारे नियंत्रण आणावे परंतु, पुन्हा लॉकडाऊन नको.
- ज्ञानेश्वर ऊर्फ नंदु घाटे (अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना)
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited By: Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.