कात्रज : जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने गुरुवारी कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, याचा फटका नागरिकांना बसला असून गुरुवारी तर नाहीच पण शुक्रवारीही पाणी मिळाले नाही. तर, पाणीपुरठा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारीही पाणी मिळण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी रविवारची वाट पाहावी लागणार आहे.
परिसरातील कात्रज, सुखसागर नगर, साईनगर, कोंढवा रस्ता, राजस सोसायटी, भारती विद्यापीठ आदी भागात दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत होता. मोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी साठवण्याच्या क्षमतेच्या तुलनेत नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळे साठवण क्षमता आणि लागणारे पाणी यामध्ये मोठा फरक असल्याने त्यांना या विस्कळितपणाचा मोठा त्रास सहन करावा लागला.
दर गुरुवारी पाणी न येण्याचा त्रास आहे. त्यात अधून मधून पाणी पुरवठा बंद करतेवेळी दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे सांगण्यात येते परंतु, दोन-तीन दिवस पाणीपुरवठा सुरळित होत नसल्याचे नंदकुमार कमलापुरे यांनी म्हटले. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन क्लोजरच्या नावाखाली सलग तीन-चार दिवस होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी अरविंद मोरे यांनी केली आहे.
गेले एक महिना झाले आम्हाला होणाऱ्या नियमित पाणीपुरवठ्यामध्ये कपात केली गेली. त्यामुळे रोज पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. कोणाला पाण्याविषयी विचारले तर, थोड्या वेळाने येईल, वरतीच पाणी कमी आहे, असे सांगण्यात येते. दर दोन-तीन आठवड्यांनी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली क्लोजर घेण्यात येतो. मात्र पाण्याचे नियोजन तीन-चार दिवसांसाठी विस्कळीत होते. - गणेश निगडे, सचिव, गंगा ओसियन पार्क, सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता
गुरुवारी विद्युत विभागाच्या आणि प्रभाग क्रमांक ४१मधील कामांसाठी क्लोजर घेण्यात आला होता. प्रभाग क्रमांक ३८मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. मात्र ज्या कामासाठी क्लोजर घेण्यात आला, ते काम खूप उशिरापर्यंत चालल्याने अडचण निर्माण झाली. आज जास्तीत ठिकाणी पाणीपुरवठा सुरळित करण्यात आला आहे. उद्या प्रामुख्याने ज्याठिकाणी पाणीपुरठा झाला नाही, त्याठिकाणी सुरळित करण्यावर आमचा भर असेल. - संदिप मिसाळ, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.