पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा दर काही प्रमाणात कमी झाला असला तरी यापुढील काळात रुग्ण दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच निर्बंध पुणे पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात लागू राहतील. तसेच, शाळा आणि महाविद्यालय येत्या 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
कोरोना उपाययोजना संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (ता. 25) आयोजित बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे काही सवलती देण्यात आलेल्या आहेत. सध्या रुग्ण संख्या कमी झाली असली तरी यापुढील काळात रुग्ण दर वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात सध्या आहेत तेच निर्बंध पुढेही सुरू राहतील. शाळा-महाविद्यालयांच्या बाबतीत निर्णयात बदल करण्यात आला असून, आता शाळा-महाविद्यालये येत्या 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या संदर्भात नंतर आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील.
सध्या पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असून, शहर आणि ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असून, आपल्या देशातही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी आणि नियोजन करण्यात येत आहे. परंतु नागरिकांनीही अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. पर्यटन आणि खरेदीच्या निमित्ताने लोक घराबाहेर मोठ्या प्रमाणात पडत आहेत. तिसर्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. लग्न समारंभामध्ये वाढणारी गर्दी हा सध्या चिंतेचा विषय असून, संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मंगल कार्यालय आणि हॉटेलचालकांनी नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
काही खासगी रुग्णालयांकडून उपचारासाठी वाढीव बिले आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ईडी कारवाईबाबत अधिक बोलण्यास नकार :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीने केलेल्या कारवाईबाबत वळसे पाटील म्हणाले, 'याबाबत जास्त बोलू इच्छित नाही, संबंधित यंत्रणा तपास करीत आहेत.' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सीबीआयमार्फत कारवाई करण्यात यावी, असा ठराव भाजपच्या कार्यकारिणीत करण्यात आला आहे. या संदर्भात 'भाजपने त्यांच्या कार्यकारिणीत काय निर्णय घ्यायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. मुळात राज्यात सध्या कोरोनासारखे गंभीर विषय आहेत,' असे वळसे पाटील यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.