Anniversary-Day-Special 
पुणे

उद्योगनगरीतील साहित्यकला

प्रदीप गांधलीकर

महासाधू मोरया गोसावी यांचा वारसा पिंपरी-चिंचवडला लाभला आहे. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्‍लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालौघात त्यापैकी बरेचसे नष्ट झाले.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या प्रयत्नातून कवी मनोहर यांच्या काही दुर्मीळ रचना प्रकाशात आल्या. देश स्वातंत्र्यावेळी झालेल्या फाळणीतून सिंधी समाज मोठ्या प्रमाणात भारतात स्थायिक झाला. पिंपरीत श्रीचंद संघदिल या सिंधी साहित्यिकाने काही ग्रंथरचना केल्या होत्या.

पिंपरी-चिंचवडमधील साहित्य चळवळीची सुरवात १९७२ मध्ये स्थापन झालेल्या ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ने झाली. प्रा. द. मा. मिरासदार समितीचे अध्यक्ष आणि गिरीश प्रभुणे कार्यवाह होते. या समितीने साहित्यविषयक उपक्रम राबवले. अनेक प्रथितयश साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले. स्मारक समितीने ‘क्रांतिदूत’ हा हस्तलिखित अंक प्रकाशित केला. पुढील वर्षी राज्यस्तरीय कथास्पर्धा घेऊन कथा विशेषांक छापील स्वरूपात आणला. १९७३ मध्ये प्रभुणे यांनी ‘मधुमिलिंद’ नावाचे पहिले नियतकालिक मासिक सुरू केले; परंतु एका वर्षानंतर ते बंद पडले. १९७९ मध्ये अशोक त्रिभुवन यांनी ‘पिंपरी-चिंचवड साहित्य संघ’ सुरू केला. शहरात पहिले साहित्य संमेलन ‘दलित साहित्य संमेलन’ नावाने चिंचवडला १९७९ मध्ये झाले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. डॉ. गंगाधर पानतावणे अध्यक्ष होते. गंगाधर गाडगीळ उद्‌घाटक आणि गो. नी. दांडेकर प्रमुख पाहुणे होते. सर्व साहित्य प्रवाहातील साहित्यिक सहभागी झाले होते. २६ जुलै १९८१ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा स्थापन झाली. तिचे उद्‌घाटन प्रा. वसंत कानेटकर यांनी केले. पहिले शाखाध्यक्ष गिरीश प्रभुणे होते. कवयित्री पद्मा गोळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. ३० व ३१ जानेवारी १९८२ रोजी चिंचवड येथे साहित्य परिषदेने शाहिरी संमेलन घेतले. शाहीर योगेश आणि शाहीर हिंगे यांनी पुढाकार घेतला. २८ ऑगस्ट १९८८ रोजी एचए सभागृहात प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. त्यात नामवंतांसह नवोदित स्थानिक कवी सहभागी झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने ३ व ४ जून १९८९ रोजी कविवर्य वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली पहिले विभागीय साहित्य संमेलन झाले. अनेक प्रतिभावंत साहित्यिक आणि स्थानिक साहित्यिकांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात हे साहित्य वातावरण निर्मितीला पोषक ठरले. साहित्य परिषदेने यानंतर अनेक साहित्यविषयक उपक्रम राबवले. भोसरीत कवी कालिदास प्रतिष्ठानने फेब्रुवारी १९९४, डिसेंबर १९९६ आणि फेब्रुवारी १९९८ अशी तीन साहित्य संमेलने यशस्वी करून दाखवली. बंधुता साहित्य परिषदेने वैचारिक बांधिलकी हा स्थायीभाव ठेवत पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रातील अन्य भागात दरवर्षी साहित्य संमेलन घ्यायला सुरवात केली. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन प्रत्येक महिन्याला बंधुता प्रतिष्ठानने घेतलेला ‘काव्यपंढरी’ हा उपक्रम अतिशय प्रभावी ठरला. नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘नक्षत्रांचं देणं’ हा काव्यमंच बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. शब्दगंध साहित्य कला सहयोग ही संस्था साहित्यिक उपक्रम तसेच ‘छांदसी’ हे अनियतकालिक चालवत असे. 

बजाज ऑटोमधील गुणवंत कामगार पुरुषोत्तम सदाफुले यांनी कामगारांमधील सुप्त प्रतिभेला वाव मिळावा; या ध्यासाने अथक प्रयत्न केले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) १ मे या कामगारदिनाचे औचित्य साधून दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या (पिंपरी-चिंचवड शाखा) माध्यमातून ग्रामसंस्कृती आणि शिवार साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे काव्यजागर संमेलन घेतले जाते. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे हे कामगारविश्‍वात ‘मास्तर’ नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी शिक्षक प्रतिभा संमेलनाचे आयोजन करण्यात येते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषदेच्या माध्यमातून श्रम उद्योग परिषद घेतले जाते.दिग्गज साहित्यिक, विचारवंत यांची मते-मतांतरे ऐकण्याची संधी श्रोत्यांनी मिळते. त्रिमिती, कीर्तिश्री सांस्कृतिक कलामंच यासारख्या अनेक संस्था बंद झाल्या; तरी त्यांची जागा नवीन संस्थांनी भरून काढली. नवयुग साहित्य व शैक्षणिक संस्थेने रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण केली असून, श्रावणी काव्यस्पर्धा, कविता आणि साहित्यप्रकारांवरील कार्यशाळा, वैशिष्ट्यपूर्ण कविसंमेलने आणि साहित्यिक मेळावे हे संस्थेचे उपक्रम अव्याहतपणे सुरू आहेत.

अमावास्येच्या रात्री स्मशानात कविसंमेलन, उंटावर बसून कवितावाचन, भर पावसात छत्री उघडून कविता सादरीकरण, चालत्या लोकलमध्ये कविसंमेलने घेणे. नवोदितांमधील प्रतिभेचा शोध घेणे, या उद्देशाने शब्दधन ही संस्था अठरा वर्षांपासून कार्यरत आहे. शब्दब्रह्म ही संस्थादेखील बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहे. दहा वर्षांपासून समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) प्रतिवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलने, ‘कवितेकडून कवितेकडे’ हा उपक्रम आणि काव्यमैफल करंडक अशा कार्यक्रमांनी कार्यशील आहे. मधुश्री, अनुष्का, स्वानंद, अहिराणी कस्तुरी आणि स्वयंसिद्धा या महिला संचलित साहित्य संस्था वेगळेपण टिकवून आहेत. भारतरत्न सरदार वल्लभभाई प्रतिष्ठान व शब्द साहित्य मंडळ साहित्य संमेलनांचे आयोजन करतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेने दर्जेदार संमेलने आयोजित करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

पिंपरी येथे १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत एकोणनव्वदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘न भूतो न भविष्यती’ अशा दिमाखदारपणे संपन्न झाले. साहित्य चळवळीने शहराला अनेक प्रतिभावंत साहित्यिक दिले. विपुल पुस्तके लिहिणारे प्रभाकर मराठे, रहस्य कथाकार विजय देवधर, दर्जेदार कथालेखक बशीर मुजावर, कथालेखिका विनिता ऐनापुरे ही काही प्रातिनिधिक नावे घेता येतील. 

अनिल दीक्षित हे खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय कवी म्हणून प्रसिद्धीला आलेले आहेत. ग्रंथव्यवहार हा साहित्य चळवळीतला महत्त्वाचा भाग आहे. सुमारे पाचशे पुस्तकांची निर्मिती करणारी सुयश प्रकाशन तसेच कुसुमाग्रज यांच्या हस्ते मुंबईत प्रारंभ करून नंतर चिंचवडला स्थलांतरित झालेली संवेदना प्रकाशन या काही ठळक प्रकाशन संस्था आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT