‘जी २०’ परिषदेत शहरीकरण या विषयावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. शहरे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी २० देशांमधील विविध प्रयोगांचे आदानप्रदान होणार.
‘जी २०’ परिषदेत शहरीकरण या विषयावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. शहरे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी २० देशांमधील विविध प्रयोगांचे आदानप्रदान होणार. परिषदेच्या निमित्ताने पुणे शहराला एक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, तिचा लाभ सर्वच पातळ्यांवर घ्यायला हवा.
पुण्याला स्वतःची एक संस्कृती, इतिहास आहे. शिक्षणाचे माहेरघर, क्रीडानगरी, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगाची पंढरी म्हणून या शहराने स्वतःला सिद्ध केले आहे. शिक्षण, उद्योग, संशोधनाला चालना मिळेल असे वातावरणही या शहरात आहे. गरज आहे ती या सर्वांची एकत्रित मोट बांधण्याची. शहर म्हणून एकात्मिक विचार करून धोरणं आखण्याची आणि त्याची तेवढ्याच ताकदीने अंमलबजावणी करण्याची. ‘जी २०’च्या निमित्ताने या समृद्ध शहराच्या चांगल्या बाजू जगासमोर जाव्यात. जगातील चांगले बदल स्वीकारण्याची लवचिकता आपल्यात यावी आणि शहरीकरणाचे आदर्श मॉडेल म्हणून पुणे जगासमोर जावे, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
भारताच्या ‘जी २०’ अध्यक्षतेच्या काळात ‘जी २०’ पायाभूत सुविधा कार्यगटाचा वापर शहरांना भेडसावणाऱ्या समस्या आणि नजीकच्या भविष्यात शहरे निर्माण करणार असलेल्या संधी यावर चर्चा करण्यासाठी आणि शहरांना अधिकाधिक राहण्यायोग्य बनविणारा एक आराखडा तयार करण्यासाठी एक मंच म्हणून केला जाणार आहे. यात पुण्याची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. ‘जी २०’ पायाभूत सुविधा कार्यगटाची (IWG) पहिली बैठक पुण्यामध्ये १६-१७ जानेवारीला होत आहे. या मंचावर आयडब्लूजी सदस्य देश, अतिथी देश आणि भारताने निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना पायाभूत सुविधा जाहीरनाम्यावर चर्चा करणार आहेत. यात नक्कीच पुण्यातील पायाभूत सुविधांवर, इथल्या प्रयोगावर चर्चा होईल.
शहरे ही वृद्धीचे आर्थिक केंद्र बनविल्याशिवाय यापुढे त्यांना टिकून राहणे अवघड होईल. यासाठी पायाभूत सुविधा वाढविणे आवश्यक आहे. या परिषदेतही पायाभूत सुविधांसाठी अर्थसाहाय्य कसे उभारता येईल यावर हे सर्व देश एकत्रित चर्चा करणार आहेत, ही पुण्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे. शाश्वत पायाभूत सुविधांना खासगी अर्थपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय गुंतवणुकीला दिशा देण्यावर आणि सामाजिक असंतुलन कमी करण्यावर परिषदेत मसुदा ठरेल. पुणे हे या सर्व प्रयोगासाठी आदर्श आहे.
पुण्यात नव्याने गावांचा समावेश झाल्याने शहराचे क्षेत्रफळ हे राज्यात सर्वांत मोठे झाले आहे. एकाबाजूला पुण्याचा भौगोलिक विस्तार झाला आहे. त्यासोबतच ‘पीएमआरडीए’च्या स्थापनेनंतर शहराच्या भोवतालच्या गावांचा विकास शास्त्रशुद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे समाविष्ट गावे आणि पीएमआरडीए क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.
‘जी २०’च्या निमित्ताने जगभरात चांगल्या शहरांचे नियोजन, त्यांनी उभारलेल्या पायाभूत सुविधा, त्यासाठी मिळवलेले अर्थसाहाय्य, खासगी वित्तीय संस्था, नागरिकांचा सहभाग या सर्वांचा अभ्यास करून स्वतंत्र पुणे मॉडेल विकसित करणेही शक्य होणार आहे. ज्या पद्धतीने शहर गेल्या आठवडाभरात सजवले आहे, ते कायम ठेवण्याची क्षमता या शहरात आहे. ‘जी २०’ हे निमित्त समजून पुण्याने आता स्वतः ला सिद्ध करण्याची ही चांगली संधी असेल. तिचे आपण सोनं करू अशी अपेक्षा आहे.
हे नक्की करा....
पायाभूत सुविधा वाढविण्याचा रोड मॅप
मिळकतकराशिवाय आर्थिक उत्पन्न स्रोत
शैक्षणिक संस्थांचे ब्रॅण्डिंग
उद्योगांना आकर्षित करणारे धोरण
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.