नवी सांगवी - सुजलाम् सुफलाम् देशाच्या संस्कृतीचा तसेच लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी सांगवीतील पाच बुलेटवीरांनी सांगवी-सिक्कीम व्हाया नेपाळ अशी बुलेटवारी केली. या वारीत चोवीस दिवसांत तब्बल साडेसहा हजार किलोमीटरची ईशान्य भारताची भ्रमंती केली. आजवर निम्म्या देश हिंडलेल्या या वीरांचा सबंध देशच या निमित्ताने अनुभवण्याचा मानस आहे.
सध्या ‘बुलेट रायडिंग’ची क्रेज आहे. रविवारी ‘बुलेटवरून रायडिंग’ करताना अनेक ग्रुपही दिसतात. वीरेश ढोकले-पाटील, संतोष मांडेकर, विशाल बहिरट, नंदकुमार शितोळे, प्रशांत सस्ते हे सांगवीतील रहिवासी. दर रविवारी ते शहरातील काही भागात सायकलिंग करतात. व्हॉट्सॲपवर चर्चा करताना बुलेटवर ‘लाँग रायडिंग’वर जाण्याबाबत चर्चा झाली. पहिलीच मोहिम लेह लडाखची निश्चित झाली. त्यात त्यांनी पूर्व भारतातील लोकजीवन जवळून अनुभवले. २०१६ मध्ये कन्याकुमारीची वाट धरली. या पंचवीस दिवसांत त्यांनी साडेचार हजार किलोमीटर प्रवास करून दक्षिण भारताच्या संस्कृतीचे अनोखे रूप अनुभवले. यंदा सिक्कीमला जाण्याबाबत एकमत झाले.
तशी ही अतिशय अवघड मोहीम. मात्र या वीरांनी २४ दिवसांत साडेसहा हजार किलोमीटर अंतर कापून ही मोहीमही पूर्ण केली. त्यात बिहारसह सर्व राज्यांतून प्रवास केला. बिहारबाबत अन्यत्र अनेक चुकीच्या पद्धतीने बोलले जाते. मात्र त्यांना सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याच काळात उत्तर प्रदेशमध्ये छटपूजेचा सण जवळून पाहण्याचा योग त्यांना आला.
याच वाटेवरून त्यांनी सिक्कीमला जाताना नेपाळहून जाण्याचा निर्णय घेतला. नेपाळ पाहून दार्जिलिंगहून या रायडर्संनी सिक्कीम गाठले.
सिक्कीममध्ये गेल्यावर महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची भेट घेण्याचे ठरले. प्रयत्नांती झालेली त्यांची भेट अविस्मरणीय ठरली. ओळख नसतानाही त्यांनी केवळ महाराष्ट्रातून आल्याबद्दल दाखविलेला आपलेपणा आणि जिव्हाळा याला तोड नव्हती. त्याच काळात सिक्कीममध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा सुरू होती. त्यांचे प्रमुख पाहुणे राज्यपाल होते. तेथे बुलेटवर आलेल्या महाराष्ट्राच्या वीरांचे मोठ्या अभिमानाने स्वागत केले. तसेच मॅरेथॉनमध्ये सहभागीही करून घेतले. पाटील यांच्या माध्यमातून त्यांना फिरण्याचा तसेच राहण्याचा मौका मिळाला. सिक्कीम हे वाहतुकीसाठी अत्यंत शिस्तप्रिय राज्य असून, सिग्नल नसताना कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी येथे होत नाही. तेथील कारभार अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी आहे. तेथील कारभाराविषयी आलेल्या अनुभवाचे पाचही जणांनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर त्यांनी परतीची वारी सुरू केली. चहा-नाश्ता आणि दोन वेळचे जेवण सोडून दररोज नऊ ते दहा तास ‘बुलेट रायडिंग’ करीत २४ व्या दिवशी बुलेटवीर सांगवीत परतले.
सिक्कीमचे निसर्गसौंदर्य आणि येथील संस्कृती पाहण्यासाठी महाराष्ट्रातून बुलेटवरून आलेल्या पाच जणांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. त्यांचे स्वागत करून मी महाराष्ट्राच्या सुपुत्रांच्या धाडसाचा सन्मान केला आहे. त्यात मला मनस्वी आनंद आहे.’’
- श्रीनिवास पाटील, राज्यपाल, सिक्कीम
मी गेल्या तीन वर्षांपासून देशात बुलेटवरून भ्रमंती सुरू केली आहे. राष्ट्रगीतात आपण देशाचे गुणगान गातो, पण हा आपला देश नेमका कसा आहे, त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेत नाही. निरनिराळ्या प्रांतांतील संस्कृती, राहणीमान, भाषा, जेवण याबाबतचे तेथे येणारे प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला जीवनात अनेक गोष्टी शिकवून जातात.
- वीरेश ढोकले-पाटील, बुलेटवीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.