पुणे : संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि पारशी धर्मग्रंथ अवेस्ता यांचा सखोल अभ्यास असलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळ यांचे बुधवारी (ता.१९) वृद्धापकाळाने निधन झाले. वयाची शंभरी त्यांनी पूर्ण केली. त्यांना 102 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मेहेंदळे यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवी मिळवली आणि नंतर १९४३ साली डेक्कन कॉलेजमधून पीएच.डी. संपादन केली. काहीच वर्षांत त्यांचा प्राकृत शिलालेखांचे ऐतिहासिक व्याकरण हा पीएचडीचा शोधप्रबंध त्याच कॉलेजने प्रसिद्ध केला. हे त्यांनी वयाच्या तिशीतच संपादन केले.
कर्नाटक आणि गुजरातमधील महाविद्यालयांत, त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषय शिकवला. त्यांनी जर्मनी आणि अमेरिकेतील संस्थांमध्येही अभ्यास केला.
डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर डॉ. रा.ना. दांडेकर यांच्या आग्रहावरून भांडारकर संस्थेत ते रुजू झाले. तेथे त्यांनी महाभारतावर कोणताही मोबदला न घेता संशोधन केले. त्यांनी
संस्थेसाठी महाभारताच्या चिकित्सक संपादित आवृत्तीसाठी आणि महाभारताची सांस्कृतिक सूची या विषयांवर काम केले.
डॉ. मेहेंदळे यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध संदर्भासाठी उपयुक्त आहेत. शब्द आणि त्यांचे संदर्भानुसार बदलणारे अर्थ यांवरही त्यांचे निबंध आहेत. सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आणि मुंडकोपनिषदातील सत्यमेव जयते नानृतं यांतील संदर्भानुसार बदलणारा अर्थ त्यांनी दाखवून दिला आहे. प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती या विषयावरील त्यांच्या व्याख्यानमालेला वाईच्या प्रज्ञापाठशाळेने छापले व याच शीर्षकाचा ग्रंथही प्रकाशित केला. या ग्रंथामध्ये महाभारतातील कथा, रूपके तसेच वेदांतील वृत्र कथा, वेद आणि अवेस्था अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण परंतु समजण्यास सोप्या अशा पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे.
कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत आणि डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स हे त्यांचे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मेहेंदळे यांनी मराठी, इंग्लिश आणि संस्कृत अशा तिन्ही भाषांतील ग्रंथलेखन, संशोधन निबंध लिहिलेले आहेत.
डॉ. मेहेंदळ यांच्या ग्रंथसंपदेत अशोकाचे भारतातील शिलालेख (मराठी, १९४८), कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत (इंग्रजी), डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी), मराठीचा भाषिक अभ्यास (मराठी), रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी), वरुणविषयक विचार (मराठी), वेदा मॅन्युस्क्रिप्ट्स (इंग्रजी), प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती (मराठी), हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत (इंग्रजी) यांचा समावेश आहे. त्यांना दिल्लीतील साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.