आळंदी - राज्यभरातून लाखोंच्या संख्येने आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता वारी काळात महत्त्वाची आहे. त्यासाठी पोलिस पथकाला दक्ष राहावे लागते. प्रस्थानाच्या सोहळ्याला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी बंदोबस्ताबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान शनिवारी (ता. २९) देऊळवाड्यातून होणार आहे. या निमित्ताने आळंदीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांचा तगडा फौजफाटा असतो. मागील वर्षी प्रस्थानाच्या वेळी काही लोकांकडून हुल्लडबाजीचा प्रयत्न झाला. यामुळे यंदाच्या वर्षी पोलिस अधिक सतर्क आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना आळंदी पोलिसांनी सांगितले की, शहरात वारकरी येण्याची सुरुवात दोन दिवसांत होईल. मंदिर परिसरात वाहनांची गर्दी होऊ नये, घातपातासारख्या घटना घडू नयेत यासाठी चारचाकी वाहनांना मंदिर परिसरात मंगळवार (ता. २५) पासून बंदी करण्यात येत आहे.
मंदिराकडे येणाऱ्या प्रत्येक चौकात लोखंडी बॅरिकेडिंग करून चारचाकी वाहने सरसकट प्रवेश बंद ठेवण्यात येईल. प्रदक्षिणा रस्ता, चावडी चौक, पालिका चौक, जुना एसटी स्टॅन्ड भागात चारचाकी वाहने रस्त्यावर उभी करण्यास बंदी केली जात आहे. तर महाद्वार, भराव रस्ता, गणेश दरवाजा, आजोळघर, हनुमान दरवाजा याठिकाणी चारचाकी वाहनांसह दुचाकीस प्रतिबंध केला जाणार आहे.
वारी काळात आळंदीत येणारी वाहतूक बाह्यमार्गाने वळविण्यात येणार आहे. पुण्याहून मरकळ धानोरे चाकण शिक्रापूर औद्योगिक भागात जाणाऱ्या वाहनांना मोशी येथील नाशिक महामार्गाचा किंवा नगर महामार्गाचा वाघोली मार्गे प्रवास करावा लागणार आहे.
शनिवारी (ता. २९) माउलींच्या पालखीचा प्रस्थानाचा सोहळा असल्याने आळंदी शहरात वाहनांना प्रवेशबंदी राहील.
तर रविवारी (ता. ३०) माऊलींचा पालखी सोहळा आळंदीतून पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने पुण्याहून येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी असेल. पालखीसोहळा दिघीच्या पुढे गेल्यानंतर आळंदीची वाहतूक पूर्ववत केली जाईल.
अशी असेल यंत्रणा
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून वारीसाठी पोलिसांचा बंदोबस्त मंजूर केला आहे. यामध्ये पाच सहाय्यक पोलिस आयुक्त, पंचवीस पोलिस निरीक्षक, एकशे आठ पोलिस उपनिरीक्षक, आठशे पन्नास पोलिस अंमलदार, एसआरपीएफच्या दोन कंपन्या, बॉम्बशोधक पथक असणार आहे. पालखी प्रस्थान होईपर्यंत दोन सत्रांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येईल. यामध्ये महाद्वारात तीस पोलिस, मंदिरात सत्तर, भराव रस्त्यावर चाळीस, प्रदक्षिणा मार्गावर दीडशे पोलिस असतील.
अशी घ्या दक्षता
भाविकांनी संशयित वस्तूंना हात लावू नये
कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी
महाद्वारात वाहने उभी करण्यास बंदी असल्याची स्थानिकांनी दखल घ्यावी
मंगळवार (ता. २५) ते रविवार (ता. ३०) या काळात मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी
इंद्रायणी घाटावर चोऱ्या रोखण्यासाठी विशेष पथक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.