Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala sakal
पुणे

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्‍वरांच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात प्रस्थान

भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सायंकाळी सव्वा सातला पंढरीच्या दिशेने शनिवारी प्रस्थान ठेवले.

विलास काटे

आळंदी - टाळमृदंगाचा टिपेला पोचलेले गजर....देहभान विसरून नाचणारे वैष्णव... माउली नामाचा जयघोष अशा मंत्रमुग्ध वातावरणात आळंदीकर ग्रामस्थांनी वीणा मंडपातील पालखी बाहेर आणली अन लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल’चा गजर झाला. भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सायंकाळी सव्वा सातला पंढरीच्या दिशेने शनिवारी प्रस्थान ठेवले. यंदा नेहमीपेक्षा एक तास उशिराने प्रस्थान झाले.

टाळ मृदंग वीणा हाती घेऊ ।

पांडुरंगा तुझे गुण गाऊ ।।

ही भावना उरी ठेवून माउलींच्या सहवासाची आणि विठूराया चरणी सेवा वारी रुजू करण्याची आस बाळगून राज्यभरातून लाखो वैष्णवांच्या भक्तीचा महापूर लोटला होता. वैष्णवांच्या दिंड्यांच्या पताकांचा भार देऊळवाड्यात फुलून दिसत होता. टाळमृदंगांचा टिपेला पोचलेला निनाद, वैष्णवांचे चाललेले खेळ उपस्थित भक्तांचे डोळ्यांचे पारणे फेडत होता. पहाटे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक या नैमित्यिक कार्यक्रमानंतर प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली.

दरम्यान इंद्रायणी काठी जमलेल्या सुमारे दोन लाख वैष्णवांच्या मेळ्याने आज अलंकापुरी दुमदुमली होती. दुपारी सव्वा एक नंतर समाधी दर्शन बंद करण्यात आले. मग तयारी सुरू झाली ती देऊळवाड्यातील पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याची. गाभाऱ्यात माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून गळ्यात तुळशीचा, गुलाबपुष्पाचा हार घालून डोक्यावर चांदीचा मुकुट ठेवून ती ब्रह्मवृंदांनी सजविली.

पावणे तीनच्या दरम्यान रथापुढील मानाच्या २७ दिंड्या आणि रथामागील २० दिंड्या महाद्वारातून सोडण्यास सुरूवात झाली. दिंडीतील वारकऱ्यांच्या मुखातून माउलीनामाचा जयघोष सुरू होता. वारकऱ्यांचे झिम्मा, फुगडी, फेर, हुतूतू असे खेळ माउलीनामाच्या गजरात सुरू झाले.

माउलींच्या अश्‍वांनी देऊळवाड्यात पावणे पाच वाजता प्रवेश केला. त्यानंतर गुरू हैबताबाबा यांच्यावतीने मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या वतीने मानाची आरती झाली. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे उपस्थित होते. त्यानंतर वीणा मंडपातील सजविलेल्या पालखीत योगी निरंजननाथ यांनी पादुका ठेवल्या.

आरफळकर आणि देवस्थानच्या वतीने दिंडीप्रमुख आणि मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला. मानपानाच्या कार्यक्रमानंतर व्यापारी मित्र मंडळांनी वीणामंडपातील फुलांनी सजविलेली पालखी ‘पुंडलिकवरदा हरी विठ्ठल हरी विठ्ठल’चा घोष करीत आळंदीकरांनी खांद्यावर घेतली. सव्वा सातला पालखी मंदिराबाहेर येताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. हरिनामाच्या गजरात माउलींचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

प्रस्थानावेळी सहभागी होणारे पहिलेच मुख्यमंत्री

माउलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शविली. त्यांनी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी इंद्रायणी नदी घाट परिसरातील स्वच्छतेची पाहणी त्यांनी केली. माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात उपस्थित राहणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सव्वा दोन तास मंदिर परिसरात प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच वारकऱ्यांसमवेत फुगडीही खेळली.

तुकोबारायांच्या पालखीचे मुख्यमंत्र्यांकडून सारथ्य

पिंपरी - देहूतून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता. २८) प्रस्‍थान ठेवले. देहूकरांचा निरोप घेऊन शनिवारी (ता. २९) सायंकाळी सव्‍वासहा वाजता पालखीचे उद्योगनगरीत आगमन झाले. निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकातून लोकमान्य टिळक चौकात आलेल्‍या पालखीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन सारथ्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT