Ashadhi Wari 2024 eSakal
पुणे

Ashadhi Wari 2024 : पालखी मुक्कामांच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी; पुणेकरांकडून वारकऱ्यांची सेवा

Ashadhi Wari 2024 Latest News : संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. लाखो पुणेकरांनी सोमवारी दिवसभर रांगेत थांबून कुटुंबासह दर्शन घेण्यास प्राधान्य दिले. त्याचबरोबर, वारकऱ्यांसाठी अन्नदानापासून विविध प्रकारचे उपक्रम राबवीत पुणेकरांनी विठ्ठलचरणी आपली सेवा रुजू केली. पालखीमुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेल्या भवानी पेठ व नाना पेठेमध्ये वारकऱ्यांसह शहरातील नागरिकांनीही खरेदीचा आनंद लुटला.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी रविवारी रात्री नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे मुक्कामी पोचल्या. सोमवारी पहाटे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुकांची महापूजा सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांच्या हस्ते झाले. तर, संत तुकाराम महाराज पादुकांची श्री निवडुंगा विठोबा मंदिर ट्रस्ट, दीपक मानकर, अक्षय भोसले, सीताराम गोळे यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर दोन्ही मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली.

पुणे शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर रांगा लावल्या होत्या. दर्शन रांगेत गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी बॅरीकेडस्‌ लावून महिला व पुरूषांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली होती. दर्शनसाठी वेळ लागत असला तरीही, दर्शन सुरळीत होत असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. बहुतांश नागरिक आपल्या कुटुंबांसमवेत दर्शनासाठी आले होते. अनेक महिला, तरुणींनी खास नऊवारी साडी परिधान केली होती, तर लहान मुले वारकरी, विठ्ठल, रुक्मिणीच्या वेशभुषेमध्ये दर्शनासाठी दाखल झाले होते. सेवाभावी संस्था, राजकीय पक्षांकडून रांगेत थांबलेल्या नागरिकांना फराळाचे पदार्थ, पाणी, चहा दिला जात होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांकडून पालखी मुक्कामाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर होती.

दरम्यान, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनीही संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. दिंड्या उतरलेल्या ठिकाणी सकाळपासूनच वातावरण भावभक्तीने भारून गेले होते. प्रत्येक दिंड्यांमध्ये सकाळी काकड आरती व सायंकाळी हरिपाठ संपन्न झाला. वारकरी दिवसभर भजन-कीर्तनामध्ये दंग झाले होते. वारकऱ्यांनी विविध प्रकारचे खेळ खेळण्याचाही आनंद लुटला. तर अनेक नागरिकांनी वारकऱ्यांसमवेत खेळांमध्ये सहभागी होत त्यांचा उत्साह वाढविला. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांसह महाविद्यालयीन तरूण-तरूणींचे समूह देखील दर्शनानंतर पालखी परिसरात फिरण्याचा आनंद घेत होते. वारकऱ्यांना शहरातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळे, बागा, उद्याने, प्राणिसंग्रहालयाची माहिती देत होते. त्यांच्यासह मोबाईलमध्ये सेल्फी घेण्यासही तरुण विसरले नाहीत. नाना पेठेत मुख्य चौकात संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे शिल्प साकारण्यात आले होते. भाविकांकडून तेथेही दर्शन करण्यासाठी गर्दी करण्यात आली होती.

पुणेकरांकडून विठ्ठलचरणी सेवा रुजू!

आपल्या दारी आलेल्या वारकऱ्यांचा पुणेकरांनी प्रथेप्रमाणे पाहुणचार केला. स्वादिष्ट भोजनासह वारकऱ्यांना चप्पल, कपडे, पिशव्या शिवून देणे, केस कापणे, पायांना मसाज करण्यापासून त्यांना वारीसाठी फराळाचे पदार्थ, बिस्किटे देण्यासही नागरिक विसरले नाहीत. अनेक गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मंडळे, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, कंपन्या, व्यापारी वर्ग यांनी वारकऱ्यांसाठी भोजन ठेवले होते.

नागरिकांनी घेतला जत्रेतील खरेदीचा आनंद

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नाना पेठ परिसरामध्ये दरवर्षी जत्रा भरते. या जत्रेत लहान मुलांनी खेळणी खरेदी करण्याचा आनंद लुटला. तर महिला, तरुणींनीही जत्रेतील विविध प्रकारच्या वस्तु खरेदी केल्या. ज्येष्ठ नागरिकांनीही जत्रेचा आनंद लुटला.

"दरवर्षी आम्ही गावकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतो. यावर्षीही पायी पंढरपूर वारी करण्यासाठी आम्ही १० ते १५ जण आलो आहोत. वारीतुन पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याचा आनंद वेगळा आहे. पुण्यात सगळ्या सोई सुविधा मिळतात. इथे खूप आनंदाने पाहुणचार केला जातो.' - किरण वानखेडे, चंद्रपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT