पूर्वी काँग्रेस राजवटीत, दारू हा कायम चर्चेचा विषय असे. बहुसंख्य पुढाऱ्यांनाच दारू दुकानांचे परवाने बक्षीस मिळत. त्यामुळे मद्य, मद्यपी, व्यसनाधीनता यावर फारशी काथ्याकूट होत नव्हती. गावठी दारू, खोपडी अथवा ताडी-माडी प्यायल्याने कुठे कोणी दगावले की तेव्हढ्यापुरती प्रसारमाध्यमे तुटून पडत. नशाबंदी म्हणा की दारूबंदी खाते हे निव्वळ ‘खाते’ असल्याने त्यांनाही त्याचे सोयरसूतक नसे. २ ऑक्टोबरच्या महात्मा गांधी जयंतीपुरता ‘ड्राय डे’, बाकी ३६४ दिवस तळीरामांचे राज्य. हे सर्व भेसूर सामाजिक चित्र गल्ली ते दिल्ली भाजप सत्तेत आल्याने बदलेल, अशी एक भाबडी अपेक्षा होती. सगळे मुसळ केरात गेले. राज्यभर प्लॅस्टिकबंदी झाली, पण कित्येक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या दारूवर कायमची बंदी घालायचे कोणीही नाव घेत नाही. अगदी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’सुद्धा चुप्पी साधून आहे. उलटपक्षी कधी नव्हे इतके दारू गुत्यांची संख्या वाढली आहे. हेच सरकार आल्यानंतर, मुंबईत विषारी दारूप्राशनाची सर्वांत मोठी दुर्घटना होऊन अनेकजण दगावले. आता तीन वर्षांनंतर लक्षात येते, की एकूणच ‘कारभार’ कोणत्या दिशेने जाणार याचे ते निदर्शक होते, असे नाइलाजाने म्हणावे लागते. आज शहरात दारूगुत्त्याशिवाय झोपडपट्टी अशक्य झाली आहे. गल्लोगल्ली हातभट्टीचे अड्डे वाढलेत. पिंपरी- चिंचवड शहरातील हातभट्टीचे गुत्ते पहिल्यापेक्षा दुप्पट झाले. दारूच्या दुष्परिणामांवर चर्वितचर्वण भरपूर झाले, कृती मात्र कोणीच करत नाहीत. आता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते असल्याने त्यांच्याकडून काहीतरी कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.
दारूगुत्ते उद्ध्वस्त करा
भोसरी औद्योगिक वसाहतीमधील बालाजीनगर, महात्मा फुलेनगर, खंडेवस्ती, शांतिनगर, भोसरी एमआयडीसी अशा कष्टकऱ्यांच्या वसाहतींत तब्बल २८ गुत्ते आहेत. या भागात केवळ दारूच्या व्यसनामुळे २० लोकांचा मृत्यू झाला. कर्ते पुरुष गेल्याने घरे उघडी पडली. यातले भीषण वास्तव म्हणजे मृतांमध्ये आठ तरुणांचा समावेश आहे. १२ महिलांचे सौभाग्य पुसले. ज्यांची घरे उजाड झाली त्यांना आता दारूचे माहात्म्य माहीत आहे. हप्तेखोर पोलिसांना ते कळणार नाही. भोसरीतील ४०० रुपयांच्या किरकोळ चोरीचा गुन्हा ते तत्काळ दाखल करतात, पण एकाही हातभट्टीवाल्याच्या विरोधात साधी तक्रारसुद्धा घेत नाहीत. या विषयावर अनेक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, व्यक्तींनी अर्ज, विनंत्या केल्या. मोर्चे, निदर्शने केली. उलटपक्षी ज्यांनी तक्रार केली त्यांना दारूविक्रेत्यांनी दमदाटी केल्याचे दाखले आहेत. दुर्दैव असे, की याच मुद्यावर आवाज उठविणाऱ्या काही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचेही दुकान चालते. सज्जनांनी मनावर घेतले तर हे चित्र बदलू शकते. विचार करा.
इंद्रायणी किनारी सर्व हातभट्या
शहरातील महापालिकेच्या भाटनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात जागोजागी हातभट्टी चालते. पोलिसांची जुजबी कारवाई होते आणि हप्तेबंदी झाली की काम ‘जैसे थे’ असते. चिंचवड स्टेशनला आनंदनगर, इंदिरानगर, वेताळनगर, दत्तनगर झोपडपट्टीमध्ये दारूचे फुगे घेऊन ठिकठिकाणी धंदा मांडतात. सुजाण नागरिकांना हे खटकते, पण पोलिसांना रातांधळेपणा असल्याने त्यांना यातले काहीच दिसत नाही. बथ्थड पोलिस यंत्रणेतील, काही महाभागांनी आज कायद्याचाच बाजार मांडला आहे. कष्टकरी जनतेपेक्षा त्यांना हातभट्टीवाले जवळचे वाटतात. कमीजास्त प्रमाणात संपूर्ण शहरात आज हीच स्थिती आहे. देहू-आळंदी या तीर्थक्षेत्राचे पवित्र राखण्यासाठी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर अनेक संस्था, संघटना काम करतात. कचरा जलपर्णी काढण्याचा अखंड उपक्रम राबवितात. सांगायला वाईट वाटतो, की आज याच इंद्रायणीच्या काठावर मावळ तालुक्यातील बहुतेक ठिकाणी तसेच देहूरोड, तळवडे, चिखली, निघोजे अशा दुतर्फा हातभट्यांचे सर्वांत मोठे धंदे चालतात. एका उद्योजकाने तळवडे-निघोजे दरम्यानच्या इंद्रायणी पुलाजवळ चालणाऱ्या हातभट्टीचे फोटो दाखवले. आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारीही त्याबाबत खेद व्यक्त करतात. पोलिस मात्र शहर की ग्रामीण असा खेळ करत कारवाईबाबत चालढकल करतात. भट्ट्या कुठे चालतात, गुत्ते कुठे आहेत याची जंत्री पोलिसांच्या वसुली पंटरकडे असते, नवीन सांगण्याची गरज नाही. भाजपच्या नेते मंडळींना थोडीफार फिकीर असेल तर ते या हातभट्या, गुत्ते बंद करतील. अन्यथा, आज लोक म्हणू लागलेत भाजपपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी परवडली. सत्ताधाऱ्यांनो, गरिबांचे संसार वाचविण्याचे पुण्य मिळवा, बस्स !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.