बारामती : शाळा बुडवून मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या चार अल्पवयीन मुली बारामती शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा सुखरूप आपल्या पालकांच्या कुशीत विसावल्या.....एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावा असा किस्सा बुधवारी बारामतीत घडला.
शहरातील एका शाळेतील 13 ते 15 वर्षे वयोगटातील चार मुली बुधवारी (ता.7) शाळेत जातो असे सांगून घरातून निघाल्या, मात्र शाळेत न जाता मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी शहरातील पुनावाला गार्डन गाठले.
मुली शाळेत आल्या नाही, म्हणून शाळेकडून पालकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पालकांनी मुलींचा शोध सुरू केला. त्यापैकी एका पालकाला या मुली पुनावाला गार्डन परिसरात दिसल्या. मात्र त्याच वेळेस मुलींनीही पालकांना पाहिले.
या चार मुलींपैकी एकीकडे असलेल्या दुचाकी वरून त्यांनी पळ काढला. पालक रागावतील या भीतीपोटी या चारही मुली दुचाकीवरून थेट बारामतीहून पुण्याला जाऊन पोहोचल्या. दरम्यानच्या काळात पालकांनी देखील मुली सापडत नाही म्हटल्यावर शोध सुरू केला.
रात्री नऊच्या सुमारास बारामती शहर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीने तांत्रिक विश्लेषण सुरू केले.
दरम्यानच्या काळात मुलींनी देखील पुण्यातील रोशन पंजाबी या मुलाच्या मोबाईल वरून पालकांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला व मुलींना तेथे थांबवण्याची विनंती केली.
त्यानंतर पालकांनी पुण्याला जाऊन मुलींना ताब्यात घेतले. पोलिसांनी तातडीने हालचाल केल्यामुळे तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी देखील या प्रकरणी सहकार्य केल्यामुळे या चारही मुली आपल्या पालकांच्या कुशीत सुखरूप विसावल्या. बारामती शहर पोलीस ठाण्याचे फौजदार युवराज घोडके पोलीस कर्मचारी श्रीकांत गोसावी बापू इंगोले यांनी तातडीने हालचाली केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.