राजगुरूनगर : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या आणि त्यानंतर या राजकीय घडामोडींना लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, उद्या ( ३१ मे ) राजगुरूनगरमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पोलिसांसह, राज्य राखीव दल व दंगा काबू पथकाचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
खेडचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर एकूण १४ पंचायत समिती सदस्यांपैकी ११ जणांनी अविश्वास ठराव दाखल केलेला असून त्यासाठी उद्या (३१ मे) सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात मतदान घेण्यात येणार आहे. हा अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर ते ११ सदस्य पुण्याजवळच्या डोणजे या ठिकाणी एका रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी (ता. २७ मे रोजी) पहाटे सभापती व त्यांच्या समर्थकांनी राडा केला. त्यानंतर सभापती पोखरकर व अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी सभापतींना अटकही झाली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये व त्याबरोबर आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या राजगुरूनगरमध्ये १४४ कलमांतर्गत संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पंचायत समिती इमारतीच्या आसपास अर्धा किलोमीटरपर्यंत कोणासही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाण्याची टाकी ते मारुती मंदिर दरम्यानचा वाडा रस्ता आणि तिन्हेवाडी रस्त्याचा टेल्को काॅलनीपर्यंतचा भाग, सकाळी ६ वाजल्यापासून ते सभेचे कामकाज संपेपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे, असे गुरव यांनी सांगितले. सभापती भगवान पोखरकर हे अटकेत असले तरी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना या ठरावाच्या सभेस उपस्थित ठेवण्यासाठी हवेली पोलीस घेऊन येणार आहेत. अतिशय तणावपूर्ण वातावरणात होत असलेल्या या ठरावावरील मतदानाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले असून शिवसेनेचे सदस्य काय भूमिका घेतात, याबाबत विशेष औत्सुक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.