पुणे

आठवे सोहळ्याचा थाट, आनंदे पार करी दिवे घाट

शंकर टेमघरे

दोन दिवस मुक्कामी असलेले पंढरीचे वाटसरू पुणेकर उठायच्या आधीच पुण्यनगरीचा निरोप घेतात. दोन दिवसांची विश्रांती झाल्याने वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला असतो. पालखी विठोबा मंदिरातून माऊलींचा सोहळा सकाळी सहा वाजता मार्गस्थ होतो. शिस्तीनुसार दिंड्या आपापल्या जागेवर चालू लागतात. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील सर्वांत मोठा टप्पा म्हणजे पुणे- सासवड हा प्रवास. त्यात त्या दिवशी एकादशी असते. त्यामुळे उपवास असतो. लांबचे अंतर असल्याने पावलांना वेगळे सांगायची गरज नसते. ती झपाझप चालत राहतात.

भाविक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे असतात. थोड्या- थोड्या अंतरावर रथ दर्शनासाठी काही सेकंदच थांबविला जातो. रथ थांबताच त्या भोवती भाविकांचा गराडा पडतो. काही क्षणांचाच अवघी… पण तेवढ्यात कोणी पादुकांना स्पर्श करतो तर कोणी पालखीला हात लावतो. काही जण गर्दीत घुसायला घाबरतात. रथाला हात लागला तरी माऊलींचे दर्शन झाल्याचा आनंद मानत गर्दीतून बाहेर पडतात. वानवडीला शिंदे छत्रीजवळ माऊलींचा रथ थांबतो. तेथे आरती होते. तेथून पुढे पुणेकरांचा निरोप घेत सोहळा हडपसरजवळ थांबतो. अर्ध्या तासाचा विसावा घेऊन सोहळा पुन्हा सासवडची वाट चालू लागतो.

हडपसरपर्यंत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीसोहळा एकामागे एक चालत असतो. हडपसरला तुकोबारायांचा सोहळा सोलापूर महामार्गाने मार्गस्थ होतो, तर माऊलींचा सोहळा सासवड रस्त्याने चालू लागतो. फुरसुंगीचा विसावा घेऊन सोहळा दुपारी एक- दीडच्या सुमारास दिवे घाटाच्या पायथ्याला विसावतो. पिशव्यांमधील फराळाचे पदार्थ बाहेर निघतात. एकमेकांना वाटत फराळ केला जातो आणि थोडीफार झाडाची सावली किंवा घर, दुकानाच्या आडोशाला वारकरी विसावतात. या विसाव्यानंतर दिवे घाटाची अवघड चढण चढायची असते. या वडकी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील शेतकरी आपले बैल रथाला पुढे जुपतात. दहा किंवा अकरा जोड्या लावल्या जातात. माऊली… माऊली... असा गजर होतो आणि माऊलींच्या रथासह सोहळा चालू लागतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका वर्षी मी दिंड्याच्या आधी चालत वर गेलो, तर कमालीचा थकवा जाणवला. मध्येच पावसाची सर आली. पण मला काही घाट रस्त्याची चाल उरकता उरकेना. तेव्हा प्रश्न पडला निम्म्यात वाकलेले वयोवृद्ध आजी- आजोबा घाट कसे काय चढतात..? काय आहे रहस्य..? म्हणून अंदाज काढायला अनेक वयस्कर वारकऱ्यांना विचारत राहिलो. पण उत्तर मिळेना. मग एका आजोबांना थेट प्रश्न केला. मी थकलो, तुम्ही कसे नाही थकलात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, तू थकलास म्हणजे तू दिंडीत चालला नाहीस. मी लगेच ‘हो’ म्हणालो. तेव्हा ते आजोबा म्हणाले, माऊली एकदा दिंडीत चालून घाट चढा मग सांगा. त्या वर्षी तर तो प्रयोग मला शक्य नव्हता. पुढच्या वर्षी मात्र मला वडकीला आल्यावर ते आजोबा आठवले. मग आम्ही पत्रकार मंडळी दिंडी क्रमांक तीनमध्ये चालू लागलो. पहिल्याच वळणाला माऊली.. माऊली.. म्हणत वारकरी वेगात धावू लागले. चालताना उजव्या बाजूला, डाव्या बाजूला झुकत होते. तोंडाने भजन म्हणणे सुरूच होते. तेव्हा लक्षात आले, हे सारे गणित भजनाच्या तालावर चालते. भजनाच्या ठेक्याने पायांना थकवा जाणवत नाही. त्यात पावसाची सर आली आणि कोलाहल उठला. माऊली.. माऊली.. म्हणत वारकरी देहभान विसरून नाचू लागले.

पाऊस हा वारकऱ्यांचा अतिशय आवडता सवंगडी. मीही मृदंग वाजवत असल्याने त्या भजनात मी रमलो आणि घाट चढून आलो. आता मी थकलेलो नव्हतो. तेव्हा तो गुरुमंत्र देणारे ते आजोबा दुसरे कोणी नव्हे, तर विठुरायाच नव्हता ना, अशी भावना मनाला चाटून गेली. तेव्हापासून वारीत चालताना वारीच्या पुढे किंवा मागे कधीही चालायचे नाही, असे ठरविले. भजनाच्या सुरात आणि टाळ मृदंगाच्या ठेक्यात पाय आपोआप चालतात. दिवे घाटाबद्दल खूप अनुभव आहेत. पण यंदाचा अनुभव काही निराळाच आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने दिवेघाटाने हिरवी शाल पांघरलीय. तो नटून बसला आहे. माऊलीच्या स्वागताला... अन्य वारकऱ्यांबरोबर तोही वाट पाहत असतो या सोहळ्याच्या आगमनाची. त्या दिवशी माउलींच्या या लेकरांचे ओझे तो सहन करतो. कारण त्याच्या अंगाखांद्यावरून माऊलींचा स्पर्श होणार असतो. त्यामुळेच तो आल्हाददायक वातावरणाने या वाटसरूंचे चढणे हलके करतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजही सारे वातावरण तसेच होते. पण दिवेघाटाला ना दिसले वारकरी.. ना दिसला सोहळ्याचा थाट.. ना झाले माऊलींचे दर्शन.. त्यालाही आज चुकल्यासारखे झाले असेल. अगदी आपणा सर्वांना होते तसेच. उलट त्यापेक्षाही अधिक असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण वर्षातून याच दिवशी तो संतांच्या सहवासाचा लाभ अनुभवतो. अन्य दिवशी तो साऱ्या जगाचे बरेवाईट ओझे वाहतच असतो. भक्तिरसात चिंब झालेल्या वैष्णवांचा त्याला बोजा होत नाही. तो आज वाट पाहत होता. त्या भजनांची.. त्यात तल्लीन होऊन नाचणाऱ्या वारकऱ्यांची. त्यांच्यात निर्माण होणाऱ्या ऊर्जेची.. तो वाट पाहत होता, त्या रुबाबात चालणाऱ्या शितोळे सरकारांच्या अश्वांची... तो वाट पाहात होता, त्या ऐश्वर्यवंत रथाची.. त्यात विराजमान असलेल्या साक्षात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींच्या पादुकांची. या विश्वात.. चराचरात ईश्वर सामावलेला आहे, असे संत सांगतात ना.. मग या दिव्याच्या घाटाला का नसेल ही भक्तिभावना… वारीला अभ्यासक अनेकदा चमत्कार अशी उपमा देतात. पण मला थोडा शब्द बदलून वारी हा आविष्कार आहे, असे वाटते. सगुण भक्तीचा आविष्कार.

यावर्षी आणखी एक नवी गोष्ट सांगायची राहिली. ती म्हणजे विजय कोल्हापुरे आणि बाबासाहेब कोल्हापुरे या बंधूंनी घाटाच्या माथ्यावर विठ्ठलाची साठ फुटी भव्य मूर्ती साकारली आहे. घाटाच्या खालूनच ती मूर्ती दिसते. त्यामुळे यंदा पालखी सोहळा असता तर त्या लांबूनही दिसणाऱ्या या विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांची वाट निश्चितच सुकर झाली असती. यंदा तो विठुरायाही हिरमुसलेला वाटला. कारण त्याचे भक्तगण त्याला कुठेच दिसले नाही. दिवे घाटातील वाटचाल अतिशय अवघड, मात्र ती तितकीच आनंददायी असते. या आनंदाला मुकल्याने यंदा मीही निराश झालो... दिवे घाट आणि घाटावरील हिरमुसलेल्या विठ्ठलाइतकाच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT