Sharad Pawar - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सोबत सत्तेत सहभागी झाल्याने पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला.
तसेच भाषणामध्ये भाजपवर कडाडून टीका करताना अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळले. या बैठकीला राष्ट्रवादीचे संघटनेतील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. पण दोन्ही आमदारांसह महापालिकेत राष्ट्रवादीकडून वारंवार नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेतेपद भूषविलेल्या माननीयांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, प्रकाश म्हस्के, भगवान साळुंखे, रवींद्र माळवदकर,
नीलेश मगर, नीलेश निकम, दीपाली धुमाळ, डॉ.सुनील जगताप, सतीश म्हस्के, काका चव्हाण, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब धनकवडे, श्रीकांत पाटील, वनराज आंदेकर, संतोष फरांदे, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, मृणालिनी वाणी, अनिता इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वंदना चव्हाण म्हणाल्या, २०१४ पासून देशात धार्मिक तेढ निर्माण केले जात आहे. आजपर्यंत आपण ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच आपले सहकारी गेले याचे दुःख आहे. पक्षातील घडामोडींमुळे जे लोक संभ्रमावस्थेत आहेत त्यांनी पवार साहेबांसोबत उभे राहावे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
अॅड. गायकवाड म्हणाले, शरद साहेब यांची भीती वाटत असल्यानेच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीत फूट पाडली आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीला आपणास नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या सोबत उभे राहणे आवश्यक आहे.
शहराध्यक्षांनी प्रशांत जगताप यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या शहरातील आजी माजी आमदारांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या बैठकीला हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे अनुपस्थित होते.
याबाबत जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, बैठकीचे निरोप सर्व माजी नगरसेवक आजीमाजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. काही व्यक्तीगत कारणांमुळे दोन्ही आमदार हजर राहू शकले नाहीत. त्यांचा कोणता निरोपही नाही. मात्र, मुंबईत होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहतील.
‘‘ज्यांच्या विरोधात आम्ही आजवर लढलो, त्यांच्या सोबत जाण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही पवार साहेबांच्या सोबतच राहणार आहोत. राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयावर दुसऱ्या गटाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही पोलिस तक्रार करू.
या कार्यालयाचा करारनामा पक्षाच्या नाही तर माझ्या नावाने आहे. आजच्या बैठकीसाठी सर्व आमदार, माजी नगरसेवकांनी निमंत्रण दिले होते. ते काम अनुपस्थित राहिले हे हे माहिती नाही. कदाचित मुंबईतील बैठकीला उपस्थित राहातील.’’
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
बैठकीत झाले तीन ठराव
- लोकनेते शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेतृत्व आहे, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू
- मुंबईत होणाऱ्या बैठकीला पुण्यातून सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे
- प्रदेशकार्यकारिणीने पाठवलेल्या आराखड्यानुसार मोठ्या संख्येने प्रतिज्ञापत्र भरून घ्यावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.