सिंहगड : 'आम्हाला 'शासन आपल्या दारी' या कार्मक्रमाची खुप तयारी करायची आहे , सगळीकडे बोर्ड लावायचे आहेत त्यामुळे तुमच्या कामासाठी सध्या वेळ नाही, सर्वांनी पुढील आठवड्यात किंवा गुरुवारनंतर या' असे उत्तर हवेली तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी देत असल्याने विद्यार्थी, शेतकरी व इतरांची मोठी गैरसोय होत आहे.
कागदपत्रांसाठी लांबून आलेल्या नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होत असून रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे हवेली तालुक्यात 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमामुळे नागरिकांची सोय होण्यापेक्षा सध्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे.
पुणे जिल्ह्यात येत्या गुरुवारी जेजुरी येथे शासन आपल्या दारी हा शासनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शासनाकडून या कार्यक्रमाची प्रसार माध्यमांतून मोठी जाहिरातबाजी सुरू आहे.
सर्व शासकीय विभागांना या कार्यक्रमाची जाहिरात करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या असल्याने महसूल, ग्रामविकास, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पुरवठा विभाग व इतर सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी यासाठी कामाला लागल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामाकाजावर झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले घेण्यासाठी तहसील कार्यालयात किंवा तलाठ्यांकडे जावे लागत आहे. तसेच शेतकरी व इतर नागरिक कागदपत्रांसाठी हवेली तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत
मात्र आम्हाला सध्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या तयारीची गडबड असल्याचे उत्तर संबंधित अधिकारी-कर्मचारी देत असल्याने नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे. त्यामुळे जर दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन 'शासन आपल्या दारी' या कार्मक्रमाचा दिखावा होत असेल तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
"उताऱ्यावरील नाव दुरुस्तीचे प्रकरण प्रलंबित असल्याने सकाळपासून तहसील कार्यालयात थांबून होतो परंतु आम्हाला 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने वेळ नाही असे संबंधित अधिकारी सांगत होते.
शेकडो नागरिक व विद्यार्थी आलेले होते परंतु सगळ्यांना हेच सांगण्यात येत होते. दैनंदिन कामाकाजावर परिणाम होणार असेल तर 'शासन आपल्या दारी'चा 'फार्स' कशासाठी?"
विजय मते, नागरिक, खडकवासला.
"मुलीच्या शाळा प्रवेशासाठी 'ईडब्ल्यूएस' चा दाखला लागत होता. त्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता परंतु पंधरा दिवस उलटून गेले तरी तहसीलदारांची सही राहिल्याने दाखला मिळाला नाही. शासन आमच्या दारी येण्यापेक्षा सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियमितपणे त्यांच्या जागेवर बसून काम केले तरी आमचे हाल होणार नाहीत."
अंकुश हगवणे, नागरिक, किरकटवाडी.
"शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही. हवेली तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने याबाबत सांगण्यात येईल व आलेल्या विद्यार्थी, शेतकरी नागरिक यांना आवश्यक दाखले, कागदपत्रे देण्यात येतील."
संजय आसवले, उपविभागीय अधिकारी, हवेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.