शिक्रापूर : तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी शिरुर हवेलीतून आपण उभे रहावे अशी जोरदारपणे जाहीर मागणी केली. त्याबद्दल मी आत्ताच काही बोलणार नाही. सोमवारी (ता.१९) रात्री महायुतीच्या सर्व घटकपक्षांची बैठक होवून त्यात राज्यातील सर्व मतदार संघाची बैठक घेवून कुठले-कुठले मतदार संघ आपल्याला (राष्ट्रवादी) येतील त्यावर आपण शिरुर-हवेलीचे पाहू असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शिरुर-हवेलीमधील उमेदवारीबद्द्ल स्पष्ट निर्णय देण्याऐवजी आणखीनच सस्पेन्स वाढविला.
शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार अशोक पवार हे उमेदवार म्हणून कामाला लागले असून महायुतीकडून नेमके कोण याबाबत ना राष्ट्रवादी बोलेना ना भाजपा. पर्यायाने हा मतदार संघ महायुतीकडून कोणत्या पक्षाला जाणार याबाबत महायुतीचे सर्वपक्षीय पदाधिकारी संभ्रमात आहेत. एकीकडून भाजपाकडून नेमके कोण कळेना आणि दूसरीकडे राष्ट्रवादीकडून घोडगंगाचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे, तालुकाध्यक्ष रवी काळे इच्छुक तर आहेच शिवाय जागा राष्ट्रवादीला गेल्यास शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष माऊली कटके हे राष्ट्रवादीत येवून उमेदवारी घेणार असल्याचेही बोलले जातेय.
अशातच काल (ता.१८) उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे दोघेही सणसवाडीत आल्याने हीच संधी साधून तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी श्री तटकरे व श्री पवार यांचेकडे पाहून दादा तुम्ही आता शिरुर-हवेलीमधून उभे रहा, असे जोरकसपणे जाहीर सांगितले आणि उपस्थितांमधून जोरदार टाळ्या पडल्या.
यानंतर श्री पवार आपल्या भाषणात नेमके काय म्हणतात त्याची उत्सूकता होती. मात्र अजित पवार बोलायला उभे राहताच त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले की, रवी काळे जे बोलत होते त्यावर माझे पूर्ण लक्ष नसले तरी मला ते काय म्हणतात ते समजले. यावर एवढेच सांगतो की, उद्याच (ता.१९) रात्री उशिरा आम्ही महायुती म्हणून एकत्र बसणार असून त्यात कुठल्या जागा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, सदाभाऊ खोत, विनय कोरे, रामदास आठवलेंसह सर्व सहकारी घटक पक्षांना द्यायच्या आहेत त्याचा निर्णय घेणार आहोत.
यात राष्ट्रवादीला येणा-या जागांचा निर्णय घेताना इलेक्टीव्ह मेरीट पाहूनच उमेदवारी दिली जाईल एवढेच सांगतो म्हणत शिरुर-हवेलीबाबत जाहीरपणे बोलणे टाळले. अर्थात सभेनंतर श्री पवार यांना शिरुर-हवेलीबाबत छेडले असता पाहू थोडे थांबा असे म्हणून शिरुर-हवेलीचा सस्पेंस आणखी वाढविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.