Six and half crore rupees from state government for protection ancient excavation site Inamgaon Sakal
पुणे

Pune News : इनामगाव येथील प्राचीन उत्खनन स्थळाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाकडून साडे सहा कोटी रुपये निधी

राज्यशासनाच्या एकछत्र योजनेतून अंदाजपत्रकास मान्यता; गावकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

दत्ता कदम

मांडवगण फराटा : महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत उत्खननात सापडलेल्या इनामगाव (ता. शिरूर ) येथील जागा संरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती ग्रामसंस्कृती दर्शन प्रकल्प समितीचे अध्यक्ष तुकाराम मचाले यांनी दिली.

प्राचीन संस्कतीचा ठेवा असलेल्या इनामगाव येथील जागतिक किर्तीच्या उत्खनन स्थळावर, संशोधन ठिकाणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी, उत्खनन क्षेत्राभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एकछत्र योजनेतून सहा कोटी एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार पाचशे आठहत्तर रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यशासनाच्या एकछत्र योजनेतून अंदाजपत्रकास मान्यता मिळाली असून येथील गावकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश आले आहे.

शिरूर पासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर इनामगाव हे गाव आहे. या ठिकाणी १९६७ मध्ये झालेल्या संशोधनातून अतिप्राचीन काळात मानवी जीवनाची सुरवात कशी झाली त्या काळचे नागरिक, त्यांचे जनजीवन, राहणीमान, शेती, संस्कृती कशा प्रकारची होती तसेच या ठिकाणी केलेल्या उत्खननात जुन्या काळातील अनेक भांडीही सापडली होती आणि तेथून पुढे इनामगाव हे गांव प्रकाशझोतात आले होते.

तेव्हापासून गावकन्यांनी या संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती. त्या मागणीला आता काही प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे. गावातून दोन किलोमीटरचा रस्ता पार केल्यानंतर घोड नदीच्या किनारी या ऐतिहासिक आणि पुरातन संस्कृतीच्या खाणागुणा आजही दिसून येत आहेत.

इनामगाव आणि परिसरात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे व बदलत्या हवामानामुळे येथे अस्तित्वात असणारी प्राचीन मानवी संस्कृती नष्ट झाली होती. हजारो वर्षांचे हे अवशेष काळाच्या ओघात खाली गाडले गेले.

१९६७ मध्ये ही मानवी संस्कृती गावकऱ्यांच्या हाती लागली. त्यातूनच पुढे १९६७ ते १९८२ अशी सलग १५ वर्षे पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने या टेकडयांचे उत्खनन करून संशोधन झाले.

त्या काळची भांडी, कालव्याद्वारे पाणी नेऊन शेती करण्याची अत्याधुनिक पध्दत, शिकारीसाठीची हत्यारे, मृत व्यक्तींना रांजणाच्या आकाराच्या भांडयात दफन करण्याची पद्धत यावरून ही संस्कृती किती प्रगत होती याचे पुरावे हाती लागले होते. तेथून पुढे देशभरातील संशोधकांच्या नजरा इनामगाव कडे वळल्या इनागावकडे अभ्यासक आणि संशोधकांची रांग लागली.

याठिकाणी शोध लागलेल्या संस्कृतीचे आर्य आणि द्रविड संस्कृतीबरोबर व्यापारी संबंध आणि देवाणघेवाण होती हे ही सिद्ध झाले आहे. ही मानवी वसाहत सुमारे ३००० वर्षापूर्वीची व ताम्रपाषाणयुगीन असल्याचा निष्कर्ष निघाला.

महाराष्ट्रातील आद्य शेतकन्यांची पहिली वसाहत याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. मातृपितृ देवतांच्या मूर्ती व स्वस्तिक चिन्ह त्या काळीही अस्तित्वात होते यांचा उलगडा झाला. घोड नदीचे विस्तीर्ण पात्र, त्याकडेला असणाऱ्या मातीच्या उंच सखल टेकडया, विविध रंगी पक्ष्यांचे थवे, निसर्गरम्य परिसर हे सर्व पाहिल्यावर ही जागा मानवी वसाहतीसाठी किती योग्य होती यांचा अंदाज येतो.

विविध दंतकथांनी प्रसिद्ध असलेली व अस्तित्वात असणाऱ्या कुलदेवतांचे साजरे होणारे सण, वसाहतीच्या ठिकाणी आज सापडणारे पुरातन काळातील मातीच्या भांडयांचे तुकडे पाहताना मन भारावून जाते. उत्खननात सापडलेल्या वस्तू १९८२ मध्ये लंडन येथे भारवलेल्या जागतिक प्रदर्शनात ठेवल्या होत्या. पुण्यातील डेक्कन कॉलेज, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय व नगर येथील संग्रहालयात येथील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. आजही या ठिकाणी देश-विदेशातील हजारो संशोधक भेटी देऊन या ठिकाणची माहिती घेताना दिसत आहेत.

'पुरातत्त्व'च्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व -

येथे शेतात वेगवेगळी धान्ये घेतली जात होती. मृतांचे दफन करण्याची वेगळी पद्धत त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिली कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्याची पद्धत याच ठिकाणी अस्तित्वात होती. अस्थी कुंभात दफन करण्याच्या येथील पद्धतीमुळे यांचा द्रविड संस्कृतीशीही संबंध येतो. तसेच या उत्खननात मातृदेवता, पितृदेवता या मूर्ती मिळाल्या आहेत. या उत्खनन व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उजेडात आले आहेत. त्यामुळे येथील उत्खननास भारतीय पुरातत्वाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी !

गेल्या अनेक वर्षांपासून हे अतिप्राचीन ठिकाण, येथील संस्कृती, उत्खननात सापडलेली भांडी यांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी ग्रामस्थ, अभ्यासक, संशोधक यांची मागणी होती. या साठी १९८२ सालापासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु होते. सन १९८४ मध्ये या ठिकाणाला राज्य संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळाला.

पुढे देश विदेशातील हजारो संशोधक या ठिकाणाला भेट देऊन गेले. आता ग्रामस्थांसह सर्वांच्याच मागणीचा विचार करून शासनाने एकछत्र योजनेतून सुमारे साडे सहा कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार आणि यापुढे शासनाकडून या ठिकाणास जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी अशी आमची मागणी आहे - तुकाराम मचाले ( इतिहास अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते, इनामगाव )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT