यंदा कसल्याही परिस्थितीत आपल्या हाताला मेंदी लागली पाहिजे, असा ‘पण’ शेखरने केला होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाताला मेंदीऐवजी पुन्हा सॅनिटाटझर लावायची वेळ त्याच्यावर आली. असंच काही ना काही कारणामुळे लग्न लांबत राहिल्यास, हाताऐवजी डोक्याला मेंदी लावावी लागते की काय, अशी भीती त्याला वाटू लागली. ‘तुझं कोठं जमलेलं असल्यास सांग, आम्ही धुमधडाक्यात लग्न लावून देऊ,’ असं आई- वडिलांनी त्याला अनेकदा सांगितलं. मात्र, हे बोलणं ऐकून, खुश होण्याऐवजी तो नाराज होऊ लागला. ‘आपलं लग्न आई- वडिल ठरवतील.’ अशी एकमेव आशा त्याला होती. मात्र, आई- वडिलांच्या या भूमिकेमुळे `आपल्याला आता अंगाला राख फासून हिमालयात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही,’ अशी समजूत त्याने करून घेतली. खरं तर प्रेमविवाह करण्याचे त्याने अनेक प्रयत्न केले होते. मात्र, सगळेच अंगलट आले होते. (SL Khutwad Writes about Love and Marriage)
पाऊस पडायला लागल्यानंतर शेखर मुद्दाम मोठी छत्री घेऊन बाहेर पडायचा. हेतू हा की एखादी तरूणी भिजत चालली असल्यास तिला छत्री द्यावी व नंतर दोघे एकाच छत्रीत ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ हे गाणं म्हणत जावे. पण कोणत्याही तरूणीने त्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही. ‘प्रेम कोठे जमेना आणि स्थळ काही येईना’, या कात्रीत तो अडकला. आपले लग्न फेसबुक व व्हॉटस अप जुळवू शकते, अशी आशा त्याला वाटू लागली. त्यामुळे फेसबुकवरील तरूणींच्या अनेक पोस्टला तो लाईक करू लागला. त्यांच्या फोटोचे तोंड भरून कौतुक करू लागला. ‘नाईस डीपी’ असं सारखं म्हणू लागला. मात्र, कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. अनेकींनी तर त्याला ब्लॉक केले. मात्र, सुश्मिताने त्याला एकदा ‘थॅंक यू’ म्हटल्याने, त्याची कळी खुलली. त्यामुळे आपलं प्रेम जमून, लग्नही झाल्याची स्वप्ने पडू लागली. मग मात्र सुश्मिताच्या मागील तीन- चार वर्षांच्या फोटोला तो लाईक करत सुटला. तिची छायाचित्रे त्याने मोबाईलमध्ये साठवली. एकांतात तो तिच्या फोटोंशी बोलायचा. सुखी संसाराची स्वप्ने तो रंगवू लागला. मध्येच तो तिला ‘सुश्मिता, ऑफिसमधून दमून आलोय, एक कप चहा दे. त्यानंतर आपण तुझ्यासाठी दागिने खरेदी करायला जाऊ’, असं म्हणू लागला. त्याने सुश्मिताविषयी सगळी माहिती काढली. आपण केलेल्या कौतुकावर ती ‘थॅंक यू’ म्हणत आहे, याचा अर्थ ती आपल्यावर फिदा आहे. आपण आता पुढाकार घेतला पाहिजे, असे त्याने ठरवले. ‘तिला हटके प्रपोज कर’ या मित्रांच्या सल्ल्यानुसार तो संधी शोधू लागला. सुदैवाने ती एकदा रस्त्यात दिसली. ‘सुश्मिता, कशी आहेस’? असा प्रश्न त्याने विचारला. मात्र, शेखरला तिने ओळखलं नाही.
‘कडक निर्बंधामुळे माझी आई घरी एकटीच असते.’ शेखरने सुरवात केली.
‘मग मी काय करू?’ सुश्मिताने विचारले.
‘एकटी असल्याने तिला खूप कंटाळा येतो.?’
‘मग मी काय करू?’ टोन बदलून, वैतागत सुश्मिताने म्हटले.
‘तू माझ्या आईची सून बनून, तिच्याशी गप्पा मारायला आमच्या घरी कायमची येशील.? तिचा कंटाळा घालवण्यास मदत करशील?’’ शेखरने असे हटके प्रपोज केल्यानंतर सुश्मिताचा रागाचा पारा चढला. तिने त्याच्या कानाखाली लावली. ‘वाट्टेल ते बोलतोस’? असे म्हणून लाथांनी त्याला तुडवले. त्यानंतर परत तीन- चार कानाखाली लावल्या. या हल्ल्याने शेखर जमिनीवर कोसळला. तरीही गाल चोळत तो म्हणाला, ‘‘मग याचा अर्थ मी नकार समजू? का अजून काही आशा ठेवू?’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.