‘हल्ली आपल्या मनातलं गुपीत कोणाला सांगायची सोय राहिली नाही. कितीही विश्वासू व्यक्तीला सांगा. तासाभरात गावभर झालंच म्हणून समजा.
‘हल्ली आपल्या मनातलं गुपीत कोणाला सांगायची सोय राहिली नाही. कितीही विश्वासू व्यक्तीला सांगा. तासाभरात गावभर झालंच म्हणून समजा. भिंतीला कानच काय पण जीभही असते, यावर माझा विश्वास बसलाय.’ मानसी घरात एकटीच आहे, असं पाहून प्राजक्ताने तिला आज सकाळी गाठले होते व तिच्यापुढं ती अनेक गुपितं उघड करू लागली होती. ‘तू सांगितलेलं कोणतं गुपित एवढं फुटलं?’’ मानसीने उत्सुकतेने विचारलं. त्यावर प्राजक्ता सावरून बसली.
‘अगं काल मी सहज सरलावहिनींच्या घरी गेले होते. मला बाई त्या अनघाबाईसारखं दुसऱ्यांच्या घरी जायला आवडत नाही. कामं-धामं सोडून दुसऱ्यांच्या घरी गप्पा मारायला, त्यांना कसा वेळ मिळतो कोणास ठाऊक? मी आपली तुमच्यासारख्या आठ-दहा विश्वासू मैत्रिणींच्याच घरी जाते.’’ प्राजक्ताने लांबड लावली. ‘अगं तू काहीतरी गुपिताचं सांगत होतीस.’ मानसीने तिला आठवण करून दिली. त्यावर प्राजक्ता म्हणाली, ‘‘मी सरलाबाईंकडे सहज गेले होते.
त्यावेळी त्यांना सांगितलं, की तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. ‘सुमनताईंची मुलगी ड्राइवरबरोबर पळून जाणार आहे’. त्यानंतर पुढच्या चार-पाच तासांत सोसायटीभर खबर पसरली होती. दोघी-तिघींनी तर मलाच ‘तुम्हाला कळलं का? सुमनताईंची मुलगी कोणाबरोबर पळून जाणार आहे...’ असं म्हणून मलाच ‘गोपनीय’ माहिती दिली.’ प्राजक्ताने कपाळावर हात मारीत सांगितलं. त्यावर मानसी म्हणाली, ‘आपलं गुपित हे गुपितच राहावं, असं मला वाटते, त्यावेळी मी खुशाल माझ्या नवऱ्याला ते सांगते.’ ‘खरंच, तुझा नवऱ्यावर एवढा विश्वास आहे?’ प्राजक्ताने उत्सुकतेने विचारले.
‘अगं मी काय सांगतेय, याच्याकडेच माझ्या नवऱ्यांचं कधीच लक्ष नसतं तर तो दुसऱ्यांना काय डोंबलाचं गुपित सांगणार आहे. पण आपण कोणाला तरी गुपित सांगितलंय, याचं समाधान मिळतं. मी त्याला कितीही गोपनीय गोष्ट सांगितली तरीही तो चेहऱ्यावरची इस्री बिघडू न देता...हो का? बरं. ठीक आहे.’’ एवढंच म्हणतो. थोड्यावेळानं तीच गोष्ट सांगितली तरी तो पहिल्यांदाच ऐकतोय, असे समजून पुन्हा तीच कॅसेट लावतो. त्यामुळं आपण सांगितलेलं गुपित हे गुपितच राहतं.’’ मानसीनं म्हटलं. त्यानंतर थोड्यावेळानं प्राजक्तानं साऱ्या गल्लीभर, ‘मानसीचा नवरा कसा नंदीबैल आहे’, बायकोच्या ‘हो’ ला ‘हो’ कसा करतो, हे ‘कोणालाही सांगू नका’ या अटीवर सांगितलं. संध्याकाळी मानसी प्रमोदला आणखी एक गुपित सांगू लागली, ‘‘अहो, आपल्या ए विंगमध्ये नवीन कुटुंब राहायला आलंय. त्या बाईचा नवरा फारच पेताड आणि खादाड आहे म्हणतात.
एक आख्ख्या फ्रिजमध्ये देशी-विदेशीच्या असंख्य दारुच्या बाटल्या आहेत. रोज मटण, चिकनशिवाय काही खात नाही, असं प्राजक्ता सकाळीच सांगत होती.’’ त्यावर प्रमोदने नेहमीप्रमाणे ‘हो का? बरं. ठीक आहे.’ एवढाच म्हणाला. काही दिवसांनी प्राजक्ता नेहमीप्रमाणे मानसीच्या घरी आली. ‘‘तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस’’ अशी सुरवात केली. ‘‘आपल्या सोसायटीतील ए विंगमध्ये नवीनच आलेले मोढवे व तुझ्या मिस्टरांचे चांगलंच गुळपीठ जमलंय. दोघेही अनेकदा बरोबरच असतात. रोज दोघांची मटण आणि दारुपार्टी चालू असते. पण हे कोणाला तू सांगू नकोस.’’ प्राजक्ताने हळू आवाजात म्हटले. त्याचवेळी डायट चालू असल्यामुळे आपण रात्रीचं जेवण बंद केलंय, या प्रमोदने सांगितलेल्या कारणामागील उलगडाही मानसीला झाला आणि आपण सांगितलेल्या सगळ्याच गुपितांकडे तो दुर्लक्ष करीत नव्हता, हेही तिला उमगलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.