‘काही चुकलं तर माझ्या कोकराला सांभाळून घ्या.’ भर मांडवात साश्रूनयनांनी बाबांनी व्याह्यांसमोर हात जोडले आणि सुजाताला गलबलून आलं.
‘काही चुकलं तर माझ्या कोकराला सांभाळून घ्या.’ भर मांडवात साश्रूनयनांनी बाबांनी व्याह्यांसमोर हात जोडले आणि सुजाताला गलबलून आलं. ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला. बराचवेळ ती ‘बाबाऽऽऽबाबाऽऽ’ एवढंच म्हणून रडू लागली.
‘माझं कोकरू फार लाडात वाढलंय. तिला काही कमी पडू देऊ नका. काही चुकलं तर समजावून सांगा. तिच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, एवढी काळजी घ्या...’ असे म्हणून बाबांनी अश्रू थोपवून धरले.
‘काळजी करू नका. आता ती माझी मुलगी आहे.’ तिच्या सासऱ्यांनी बाबांच्या खांद्यावर हात ठेवत आधार दिला आणि सुजाताच्या डोळ्यांसमोर प्रत्येकवेळी भक्कम आधार देणारे बाबा उभे राहिले. आठ- दहा महिन्यांचे असताना अडखळणाऱ्या पायांना सावरणारे, बोट धरून चालायला शिकवणारे, मऊ मऊ वरणभात स्वतःच्या हाताने खाऊ घालणारे, रात्री उशीरापर्यंत शेतात पाणी धरून घरी आल्यानंतर आपण रडायला लागल्यानंतर खांद्यावर जोजवणारे, शाळेच्या पहिल्या दिवशी धीर देणारे, तिसरी- चौथीत असताना सायकलचे कॅरेज पकडून सायकल शिकवणारे, वाढदिवशी तालुक्याच्या गावी जाऊन केक आणणारे, स्वतः फाटकी कपडे घालून, लेकीला नवीन कपडे घेणारे, क्लासमधून यायला उशीर झाल्यानंतर घराबाहेर काळजी करत फेऱ्या मारणारे, अपयश आल्यानंतर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अशी बाबांची अनेक रूपे तिच्यासमोर उभी राहिली.
‘बाबा, काळजी घ्या.’ असं म्हणून सुजाता बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली.
‘अगं, लहान मुलांसारखं कोणी रडतं का? तुला सासर खूप चांगलं मिळालंय. सगळ्यांशी गोडी- गुलाबीनं वाग. तुला काहीही कमी पडणार नाही.’ बाबांनी तिच्या पाठीवर हात ठेवत म्हटले. त्यानंतर सुजाताची पाठवणी त्यांनी केली.
‘लग्न चांगलं झालं. कोणाला काही कमी पडलं नाही. वरपक्षही खुश होता. जेवणासह इतर बाबींचे नियोजन उत्तम होतं.’ पाहुण्यामंडळींपैकी एकानं अशी दाद दिल्यानंतर बाबांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. गेल्या काही महिन्यांपासून आपण राबल्याचं चीज झालं, असं त्यांना वाटलं. सहज त्यांनी मंगलकार्यालयात चक्कर मारली. आचाऱ्यांपासून वाढप्यांपर्यंत सगळ्यांचे त्यांनी आभार मानले. घरी जाण्यासाठी त्यांचे पाय जड
झाले होते. थोड्यावेळाने ते घरी आले आणि एकांतात जाऊन बसले. सुजाताच्या आवाजाशिवाय त्यांना घर सुनंसुनं वाटू लागलं.
त्यांना कोणाशी काही बोलावेसे वाटेना. सुजाताच्या आठवणींचा फेर त्यांच्या मनाभोवती नाचू लागला. पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाणारी सुजाता आपल्याला ‘बाय बाय, बाबा’ म्हणतेय, हे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर हटेना. ‘माझं कोकरू केवढुसं होतं, लग्न होऊन सासरी गेलंय, यावर विश्वासच बसेना’ असं म्हणून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
‘काय हो, काय झालं?’ त्यांच्या बायकोनं विचारलं.
‘अगं डोळ्यांत कचरा गेला.’ असे म्हणून त्यांनी डोळे पुसले. तेवढ्यात सुजाताचा फोन आला.
‘बाबा, मला माहिती आहे, की तुम्ही आता काय करताय? आधी डोळे पुसा.’ सुजाताने प्रेमाने दटावले.
‘बेटा, तुला कसं माहिती. मी रडतोय ते.’ बाबांनी म्हटले.
‘बाबा, मी तुमची लेक आहे. तुमच्या मनात काय चाललंय, हे मी इथं बसून ओळखू शकते. आता अजिबात रडायचं नाही.’ सुजाताने असं म्हटलं आणि तीच बाबांच्या आठवणीने ढसाढसा रडू लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.