पुणे : शहरातील खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातून चोरीस गेलेल्या मौल्यवान दागिन्यांसह लॅपटॉप, असा दोन कोटी ३१ लाखांचा ऐवज नागरिकांना सुपूर्त करण्यात आला. पोलिस आयुक्त कार्यालयात सोमवारी दुपारी आयोजित कार्यक्रमात पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या हस्ते नागरिकांना मुद्देमाल सुपूर्त करण्यात आला.
परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाच्या परवानगीने नागरिकांना मुद्देमाल परत करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी फरासखाना विभागाच्या सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे, विश्रामबागचे सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, फरासखानाचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे, खडकचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड, समर्थचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील, शिवाजीनगरचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि डेक्कनचे वरिष्ठ निरीक्षक विपिन हसबनीस उपस्थित होते.
पोलिस ठाणे व फिर्यादींना परत केलेला मुद्देमाल
फरासखाना दोन कोटी १५ लाखांचे दागिने
समर्थ तीन लाख ९४ हजारांचे दागिने व रोकड
खडक दोन लाख ७९ हजारांचे दागिने व ३७ लॅपटॉप
शिवाजीनगर आठ लाख २२ हजारांचे दागिने
डेक्कन एक लाख ६४ हजारांचे दागिने
परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांतील जप्त केलेला दोन कोटी ३१ लाखांचा ऐवज नागरिकांना परत केला. लवकरच इतर परिमंडळातील जप्त केलेला ऐवज परत करण्यात येईल. घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गस्त वाढविण्याचा आदेश दिला आहे. कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांची तपासणी करण्यात येत आहे.
- प्रवीण पवार, पोलिस सहआयुक्त
धनकवडीहून चिंचवडला पीएमपी बसमधून जाताना माझी अडीच तोळ्यांची सोन्याची बांगडी चोरीस गेली होती. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी मला दागिने परत मिळवून दिले. दागिने परत मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे.
- मंदाकिनी फुगे, फिर्यादी, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.